सोलापूर पाणीपुरवठा : पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा | पुढारी

सोलापूर पाणीपुरवठा : पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांची गेल्या बर्‍याच वर्षांपासून असलेली एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे.

शहरातील स्मार्ट सिटीच्या एबीडी भागामध्ये पुढील आठवड्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. त्या द़ृष्टीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

शहरास तसेच हद्दवाढ भागास एक दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. यासंदर्भात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, नागरिक तसेच नगरसेवकांकडून आवाज उठवला जात होता.

या विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक वेळा गोंधळ झाला.

मात्र, पाण्याचे नियोजन व्यविस्थत होत नसल्यामुळे एक दिवसाआड पाण्याऐवजी चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

शहरास होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने आणि अवेळी होत असल्यामुळे नागरिकांमधून संताप देखील व्यक्त होत आहे.

नागरिक आणि नगरसेवकांकडून होणार्‍या सततच्या मागणीमुळे आयुक्तांनी शहरास एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासंदर्भात नियोजन चालू केले होते.

शहरास पाणीपुरवठा हा प्रामूख्याने पाईपलाईन द्ववारे होत असून पाईप लाईन अनेक ठिकाणी गळती होत होती.

ही गळती रोखण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न केले. गळती रोखून वाया जाणार्‍या पाण्याचे नियोजन करण्यात आले. या नियोजनातून वाया जाणारे 20 टीएमसी पाण्याची बचत होवून हे अधिकचे पाणी उपलब्ध झाले आहे.

यामुळे प्रायोगिक तत्वावर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकसित केलेल्या एबीडी भागामध्ये पुढील आठवड्यापासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.

एक तास हा पाणी पुरवठा चालू राहणार असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

Back to top button