कुरुंदवाड : मुसळधार पावसात मुस्लिम बांधवांनी हिंदू मंदिरातच केली पीर प्रतिष्ठापणा | पुढारी

कुरुंदवाड : मुसळधार पावसात मुस्लिम बांधवांनी हिंदू मंदिरातच केली पीर प्रतिष्ठापणा

कुरुंदवाड : जमीर पठाण; कुरूंदवाड येथे बागवान पिराच्या प्रतिष्ठापनेचा नालविधी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. पिराच्या बांधणीला सुरूवात करणार इतक्यात अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाली. या अचानक आलेल्या पावसाने पिराचे पटके (कपडे) भिजू नयेत म्हणून, भक्तांनी झेपेल तितके पटक्याचे गठ्ठे घेऊन दिसेल त्या घरात प्रवेश केला. यातील काहीजणांनी शेजारीच असलेल्या सावता माळी मंदिरात प्रवेश केला. तेव्हा या मंदिरात भजन सुरू होते. या भक्तांची उडालेली धांदल पाहून मंदिरातील भजन अचानक थांबले. भजन करणाऱ्या भक्तांनी आपल्याकडील जमखाना पीर प्रतिष्ठेसाठी अंथरून देत, सावता माळी मंदिरातच पिराची प्रतिष्ठापणा करण्याची इच्छा व्यक्त केली.

हिंदू भक्तांच्या इच्छेला मान देत, सर्व पीर भक्त पटक्याचे गठ्ठे डोक्यावर घेऊन मंदिरात आले. यानंतर एकीकडे पीर प्रतिष्ठापनेला सुरूवात झाली तर दुसरीकडे भजनी मंडळाने आपल्या भजनातून ‘ विठ्ठला…,अन् भरला, सावताच्या मंदिरात पटक्यांचा मेळा’… असे भजन गात पिराची प्रतिष्ठापणा केली. या कृतीतून त्यांनी समाजाला सामाजिक सलोख्याचा एक अनोखा संदेश दिला आहे.

बागवान पिराची प्रतिष्ठापना बागवान गल्लीत मंडपात केली जाते. याठिकाणीच पिराची बांधणी केली जाते. परंतु यावेळी सावता माळी मंदिरात बुधवारी (दि.०३) रात्री ९ वाजता नालविधी संपन्न झाला. पिराच्या बांधणी, भजन याबरोबर मेघ गर्जणेसह वरून राजाने देखील यावेळी हजेरी लावली. कुरुंदवाड शहर हे धार्मिक एकात्मतेचे माहेरघर आहे. याठीकाणी मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना देखील केली जाते.

हेही वाचा:

 

Back to top button