कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास नागपुरात सुरुवात | पुढारी

कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास नागपुरात सुरुवात

नागपूर : विशेष प्रतिनिधी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कान्होलीबारा आणि कळमेश्वर येथील धापेवाडा येथून आधार प्रमाणीकरण योजनेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांच्या हस्ते शुभारंभ प्रसंगाच्या नोंदी करण्यात आल्या. 

नागपुर जिल्ह्यातील ५० हजार २३२ पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर कान्होलीबारा व धापेवाडा येथील अनुक्रमे २१२ व ७७ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली. ही यादी संबंधित बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आली. दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरळीतपणे सुरु आहे. यावेळी हिंगण्याचे सहाय्यक निबंधक चैतन्य नासरे तर धापेवाडा येथे जिल्हा मध्यवती सहकार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाईक उपस्थित होते. तसेच यावेळी गजानन काशिनाथ सायम, रमेश कृष्णाजी लाड, हनुमान माणिक बुधवाडे, रामाजी वऱ्हाडे या शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेच्या जलद अंमलबजावणीसाठी समाधान व्यक्त केले.

वाचा : अहमदनगर : सायेब, फक्त अंगठा दिला अन् काम झालं!

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या दृष्टीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु करण्यात आली. या योजनेनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठित कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम दोन लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे ही कर्जमुक्ती देताना शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नाही याचाच अर्थ अल्पभूधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवाय जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

वाचा : पाच दिवसांचा आठवडा; मात्र, जेवणासाठी नाही मिळणार अधिक वेळ!

कान्होलीबारा व धापेवाडा येथील २८९ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण सुरळीतपणे सुरु आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची त्रुटीपुर्तता केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी यावेळी सांगितले.

Back to top button