बेळगाव : भाजीपाला नेण्यास मुभा, परंतु, चालक मालकांचीच उपासमार! | पुढारी

बेळगाव : भाजीपाला नेण्यास मुभा, परंतु, चालक मालकांचीच उपासमार!

बेळगाव : प्रतिनिधी   

शहरात लॉकडाऊनच्या काळात एपीएमसी भाजी मार्केटमधील गर्दी टाळण्यासाठी मोजक्‍याच भाजी वाहून येणाऱ्या ट्रक चालकांना प्रशासनाने पास दिले आहेत. मात्र, भाजी घेऊन कोल्हापूर, पुणे, गोवा येथे जाताना वाटेमध्ये टपरी, धाबा हॉटेल बंद असल्याने चालक आणि मालकाची उपासमार होत आहे. भाजी बेळगाव एपीएमसी मार्केटमधून भरून घेऊन जाण्यास परवानगी आहे. मात्र, येताना गाडी खाली (साहित्याविना) असायला हवी, असा दंडक आहे.

कोल्हापूरहून भाजी भरून घेऊन बेळगाव येथील एपीएमसी मार्केटमध्ये आल्यास कोल्हापूरला पुन्हा जाताना गाडी खालीच असायला हवी. असा दंडक लादल्यामुळे ट्रकचालकांना व मालकांना गाडी खाली न्यावी लागत आहे. सध्या पुणे, मुंबई, केरळ व गोवा येथून ट्रक चालक भाजी मार्केटमध्ये भाजी घेऊन जाण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र, भाजी खरेदीदार एमपीएससीमध्ये न पोहोचल्याने दुपारपर्यंत ट्रकमध्ये ते कोणत्याही प्रकारचा भाजीपाला भरण्यात आला नव्हता.

त्यामुळे काही ट्रक चालक बेळगावतच थांबून आहेत. येथून परराज्यात जायला भाडे नाही. त्यातच उपासमारीची वेळ त्यांच्यावर ती आली आहे. काही ट्रक चालक मालकांनी गाडीतच स्वयंपाकाची व्यवस्था केली आहे. भाजी वाहून नेताना चालकासमवेत केवळ दोघांनाच परवानगी देण्यात आली आहे. वाटेत पर राज्यातील नोकरवर्ग परिवहन खात्याच्या बस बंद असल्याने चालत मार्गस्थ झाला आहे. बेळगावहून कोल्हापूरला व कोल्हापूरहून बेळगावला भाजी वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांना चालत येणारे प्रवासी रस्त्यावर थांबून हात जोडून विनंती करत आहेत. मात्र, पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मनात असूनदेखील चालत येणाऱ्या प्रवाशांना आपण ट्रकमध्ये घेऊ शकत नाही, अशी खंत ‘पुढारी’च्या प्रतिनिधीसमोर परराज्यातून येणाऱ्या चालक आणि मालकांनी व्यक्त केली.

 

Back to top button