बाधितासह तिघांचा बळी; 19 पॉझिटिव्ह | पुढारी

बाधितासह तिघांचा बळी; 19 पॉझिटिव्ह

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सोमवारी दिवसभरात बाधितांसह अन्य दोन असे तिघांचे बळी गेले तर 19 जण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये सातारा शहर व परिसरातील 6 जणांचा समावेश आहे. बाधित रुग्णांच्या सहवासात आलेल्या तब्बल 535 जणांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले असून त्यांच्या रिपोर्टची धास्ती लागून राहिली आहे. दरम्यान, सोमवारी 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांनी 1 हजारांचा आकडा पार केला असल्याने आणि सोमवारी एका बाधितांसह अन्य दोघांचे बळी गेल्याने कोरोना पुन्हा वेग घेतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

सोमवारी जिल्हा रुग्णालयात कराड  येथील शनिवार पेठ येथील 75 वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मलकापूर ता. कराड येथून येथील सारी आजारामुळे दाखल झालेल्या 85 वर्षीय महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जैतापूर रोड देगाव येथील 37 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने कोविड संशियत म्हणून या दोघांचा नमुना पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

रविवारी रात्री आलेल्या बाधितांमध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळेची युवती, जावली तालुक्यातील रामवाडी येथील 3 महिला, 1 बालक, आखेगणी येथील वृद्ध व महिला, बिरामनेवाडीतील पुरुष, कराड तालुक्यातील गोळेश्‍वर येथील पुरुष, चचेगावातील 5 महिला, 2 युवक,  उब्रंज येथील 2 पुरुष व 1 महिला, मसूर येथील 4 पुरुष, 1 महिला, पाटण तालुक्यातील सांघवड येथील पुरुष, फलटण तालुक्यातील जिंती येथील महिला, रविवार पेठ येथील 5 महिला व 1 बालक आणि अलगुडेवाडी येथील पुरुष, वाई तालुक्यातील वाघजाईवाडी व पसरणीतील महिला, कवठे येथील पुरुष, सातारा तालुक्यातील नागठाणेतील पुरुष, कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी येथील पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पुरुष अशा 39 जणांचा समावेश आहे. 

सोमवारी रात्री जावली तालुक्यातील रामवाडीतील 4 पुरूष व 2 महिला, बामणोली तर्फ कुडाळ येथील 1 पुरूष, आखेगणीतील एक युवक, शिरवळ येथील वृध्द व एक महिला, सातारा शहरातील दौलतगरमधील पुरूष, रेल्वे स्टेशन कॉर्टर एक पुरूष, जिहेत एक वृध्द, लिंब येथील दोन पुरूष, क्षेत्र माहुलीतील एक पुरूष, वाई तालुक्यातील धर्मपुरीतील पुरूष तर ब्रम्हपूरीतील महिला व माण तालुक्यातील खडकी पाटोळे येथील महिला अशा 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे.

दरम्यान, विविध हॉस्पिटल व कोरोना कोविड सेंटर येथून 10 दिवसानंतर 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 1031 झाला असून आतापर्यंत 720 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 43 जणांचा मृत्यू झाला आहे. 249 बाधितांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.

Back to top button