मानव, बिबट्यातील संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज  | पुढारी

मानव, बिबट्यातील संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज 

वारणावती : आष्पाक आत्तार 

चांदोली परिसरासह शिराळा, कराड, शाहुवाडी, पन्हाळा आदी तालुक्यात बिबट्यांचे वारंवार दर्शन होऊ लागले आहे. बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्लेही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या चांदोली व कोयना अभयारण्य परिसरामध्ये साधारण 45 ते 50 च्या दरम्यान बिबटे आहेत. त्याहून अधिक बिबटे सध्या प्रकल्प क्षेत्राबाहेर असण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी वारंवार या बिबट्यांचे होणारे दर्शन पाळीव प्राण्यांवरील हल्ले यामुळे हे स्पष्ट होत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात तर दररोज कोठे ना कोठे तरी बिबट्याचे दर्शन होत आहे. तर अनेक ठिकाणी तो पाळीव प्राण्यांना भक्ष करत आहे.

अलीकडे मानवावर ही तो आक्रमण करू लागला आहे…

मार्च महिन्यापासून कोरोनामुळे परिसर वारंवार लॉकडाऊन होत आहे. परिसर निर्मनुष्य झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार झाले आहे. बिबट्याच्या वावरासाठी हे वातावरण अनुकूल असल्यामुळे ठिकठिकाणी त्याचे दर्शन होऊ लागले आहे. गेल्या दोन दशकांत तर बिबट्याने आपले आश्रय स्थानच बदलले आहे. अनेक बिबट्या मादीने उसाच्या रानामध्ये आपल्या पिलांना जन्म दिला आहे. जंगल हे या पिल्लांना माहीतच नाही उसाचं रान म्हणजेच आपलं जंगल आहे ही भावना त्यांच्यामध्ये रुजू झाली आहे. शिवाय जवळपासच शिकार ही त्यांना सहज उपलब्ध होत आहे. जंगलामध्ये अनेक किलोमीटरचा पाठलाग करून मिळणारी शिकार त्याला मानवी वस्तीत सहजासहजी मिळू लागली आहे. कुत्रे हे तर त्याचे प्रमुख आवडते खाद्य आहे. ही शिकार त्याला मानवी वस्तीत सहज मिळू लागल्यामुळे या ठिकाणी त्याचे अस्तित्व वाढू लागले आहे. परिणामी जंगल हे त्याचं असणारं आश्रयस्थान आता मानवी वस्तीत झालं आहे. परिणामी मानवी वस्तीतील बिबट्यांची ही संख्याही वाढू लागली आहे.

वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी प्राणी गणना केली जाते. वाघ व बिबट्याची विष्ठा, पाऊलखुणा, झाडांवरील ओरखडे याद्वारे वाघ व बिबट्यांची संख्या निश्चित केली जाते. अशीच गणना सामाजिक वनीकरण विभागात करणे सध्या गरजेचे आहे. जेणेकरून प्रकल्पात तसेच प्रकल्पा बाहेर सध्या किती बिबटे आहेत याची निश्चित आकडेवारी समजेल.

सध्या या बिबट्यांचे पाळीव प्राणी तसेच मानवावरील होणारे हल्ले सध्या चिंतेचा विषय बनू लागला आहे. बळीराजाचेही पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत मिळत आहे. मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.

मानवी वस्ती मध्ये बिबट्यांचा वाढलेला वावर प्राण्यांवर तसेच मानवावर होणारे हल्ले याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने तज्ञांची समिती नेमून यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यामध्ये मानव व बिबट्या यांचा संघर्ष अटळ आहे.

बिबट्याने आपल्या राहणीमानात बदल केला आहे. शिवाय गावालगत त्याला सहज शिकार मिळू लागली आहे. त्यामुळे त्याने आपले आश्रयस्थान बदलले आहे. आता तो अभयारण्या पुरता मर्यादित राहिलेला नाही. उसाची शेती हेच त्याचं आश्रयस्थान बनू लागले आहे. त्यामुळे परिसरात त्याचे वारंवार दर्शन होऊ लागले आहे.


गोविंद लंगोटे


 वनक्षेत्रपाल चांदोली राष्ट्रीय उद्यान

Back to top button