कोल्हापूर :शालेय पोषण आहाराची ‘शाळा’ | पुढारी

कोल्हापूर :शालेय पोषण आहाराची ‘शाळा’

कोल्हापूर : प्रवीण मस्के

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार योजनेसाठी पात्र पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून, घरपोच पोषण आहाराचे शंभर टक्के वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. उन्हाळ्यातील लॉकडाऊन काळातील 34 दिवसांचे वाटप केले जात आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणे आवश्यक असल्याने पोषण आहार योजनेच्या नियमित अंमलबजावणीचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शाळांमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन पोषण आहाराचे पहिली ते आठवीच्यापर्यंच्या पात्र विद्यार्थ्यांना वाटप केले जात आहे. शिक्षण विभागाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या धान्यांची तालुकास्तरावरुन येत्या काही दिवसांत मागणी देण्याच्या सूचना केल्या आहेत. धान्याचा पुरवठा होताच विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले. 

महापालिका व खासगी अशा 187 शाळा असून पोषण आहार पात्र 45 हजार विद्यार्थी आहेत. शहरात सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषण आहार दिला जात होता. कोरोनातही उन्हाळयातील धान्य स्वरुपातील पोषण आहाराचे 90 टक्के वाटप झाले आहे. लवकरच सर्व पोषण आहाराचे वाटप पूर्ण होईल. 15 जूननंतरच्या पोषण आहारासाठी शाळांना मागणी देण्याबाबत सांगितले आहे, अशी माहिती मनपा प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी दिली. 

बेरोजगारीची कुर्‍हाड

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ग्रामीण भागात महिला बचत गट व मदतनीस यांचे काम बंद झाल्याने त्या बेरोजगार झाल्या आहेत. शहरातील शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करणारे सेंट्रल किचनचे ठेकेदार, संस्था अडचणीत सापडल्या आहेत. जागेचे भाडे यासह अन्य गोष्टींचा त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

Back to top button