संत रामदास महाराज जाधव यांचे निधन | पुढारी

संत रामदास महाराज जाधव यांचे निधन

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

येथील राष्ट्रसंत कैकाडीबाबांचे पुतणे ह.भ.प. रामदास महाराज जाधव (वय 72) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनाने एक परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

वारकरी संप्रदायामध्ये कैकाडीबाबांचे स्थान मोठे आहे. त्याच कैकाडीबाबांचा आध्यत्मिक वारसा ह.भ.प. रामदास महाराज चालवत होते. 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली म्हणून उपचारासाठी अकलूज येथे दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना रामदास महाराज यांची शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या भक्तगणांत शोककळा पसरली आहे. 

 संत कैकाडीबाबा, ह.भ.प. कोंडिराम काकांचे आध्यात्मिक कार्य रामदास जाधव महाराज यांनी अतिशय नेटाने पुढे चालवले होते. संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रचार, बहुजन समाजातील 

युवकांना जागृत करण्याचे मोठे काम रामदास महाराज यांनी सुरू केले. संत तुकाराम महाराज बीजेच्यानिमित्ताने देहूला पंढरीतून विठ्ठलाचा पालखी सोहळा, संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मनमाडहून पालखी सोहळा त्यांनी सुरू केला होता. 

पंढरपूर येथील विष्णू पुण्यधाममधून जगाला आध्यात्म व विज्ञान यांचे दर्शन देणारी अभिनव सृष्टी त्यांनी उभारुन संत कैकाडीबाबा,  कोंडीराम काकांचे स्वप्न पूर्ण केले होते. समाजातील अंधश्रध्दा, अनिष्ठ रुढी, प्रथा-परंपरा यावर रामदास महाराज कठोर शब्दांत प्रहार करीत होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

Back to top button