कोल्हापूर :मिळकत 3 हजार; कर्ज 5 लाख | पुढारी

कोल्हापूर :मिळकत 3 हजार; कर्ज 5 लाख

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

शेतात मोलमजुरी करणार्‍या महिलेची दिवसाला शंभर रुपये मजुरी, महिन्याला तीन हजार रुपये मिळकत आणि मायक्रो फायनान्स  कंपन्यांनी दिले पाच लाख रुपये कर्ज, एका कंपनीचा हप्‍ता महिन्याला चौदा हजार रुपये. एकाच कर्जदाराला बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या कंपनीकडून कर्ज वाटपाचे अनेक प्रकार आता उघडकीस येऊ लागले आहेत. 

मायक्रो फायनान्सकडून 50 हजार रुपयांचे कर्ज वाटपाची मर्यादा आहे. व्याजासह 80 हजार रुपयांपर्यंत ही रक्‍कम भरावी लागते; पण काही एजंटांनी महिलांच्या आर्थिक सहाय्यतेचा फायदा घेत त्यांना पाहिजे तेवढे कर्ज देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांच्या कर्जाची खैरात वाटली आहे. पट्टणकोडोली येथील  एक लाभार्थी महिलेने सुरुवातीला एका कंपनीकडून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले. नंतर हप्‍ते तटले म्हणून पुन्हा दुसर्‍या कंपनीचे कर्ज तिच्या गळ्यात मारले. त्याचे पण हप्‍ते तटले तेव्हा अन्य कंपनीकडून 1 लाख रुपयांचे कर्ज काढले. अशा प्रकारे पाच कंपन्यांचे पाच लाख रुपये कर्ज घेतले आहे. या प्रकरणात कर्ज घेणारी महिला दोषी की देणारी कंपनी हा वेगळा विषय आहे; पण एकच व्यक्‍ती जिचे उत्पन्‍न महिन्याला तीन हजार रुपये तिला पाच लाख रुपयांचे कर्ज कसे दिले गेले याचा शोध घेण्याची गरज आहे. 

चंदगडमध्ये पंधरा लोकांना आठ कंपन्यांनी लाखो रुपयांचे कर्ज दिले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांची आरबीआयकडे नोंदणी आहे. कर्जदारांची तसेच त्यांच्या थकीत कर्जाची नोंद कंपन्यांकडे होत असते. काही अधिकृत कंपन्यांकडून असे कर्ज वाटप होत असताना थकीत कर्जाची सेबीलला नोंद असेल तर अन्य मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज दिलेच कसे? केवळ एका कंपनीची कर्जफेड होते म्हणून दुसर्‍या कंपनीचे कर्ज दिले गेले का, यासाठी नियमांचे पालन का केले गेले नाही असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. किती कर्ज घेतले, व्याज किती, कालावधी किती याची लेखी कागदपत्रे देणे कंपनीला बंधनकारक आहे, पण बहुतेक कर्जदार महिलांकडे कोणतीच कागदपत्रे नाहीत केवळ एका वहीत हप्त्यांच्या नोंदी आहेत. त्या वह्या पण काही वेळा कंपनीचे एजंट घेवून जातात. त्यामुळे नेमके किती पैसे भरायचे आणि किती भरून घेतले जातात याचा कोणताही हिशेब नाही.         

 पन्‍नास हजारची मर्यादा; 

पाच लाखांचे कर्ज

कर्ज हप्त्याची नोंद नाही

कोणतीही अधिकृत 

कागदपत्रे नाहीत

थकीत हप्‍ते तरीही 

कर्जवाटप सुरूच           

Back to top button