कोल्हापूर : बँड...बाजा...बारात! | पुढारी | पुढारी

कोल्हापूर : बँड...बाजा...बारात! | पुढारी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘नको आम्हाला अनुदान, द्या आमच्या हाताला काम’ यासह अन्य मागण्यांसाठी मंडप, कॅटरिंग, बँड-बँजो, फ्लॉवर डेकोरेशन, रथवाले, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर, इव्हेंट व्यावसायिक सोमवारी रस्त्यावर उतरले. कोल्हापूरसह जिल्ह्यातील व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मूक मोर्चा काढला. सरकारने व्यावसायिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, व्यवसायाला परवानगी द्यावी; अन्यथा आंदोलनाचा वणवा दिल्‍लीपर्यंत पेटेल, असा इशारा व्यावसायिकांनी दिला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  

ऑल इंडिया टेंट वेल्फेअर असोसिएशन संलग्‍न, ऑल महाराष्ट्र टेंट वेल्फेअर ऑर्गनायझेशनअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकात जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून व्यावसायिक एकत्र जमले. दुपारी बारानंतर मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात व्यावसायिकांनी काळे टी-शर्ट, काळे मास्क, डोक्याला काळी पट्टी व गांधी टोप्या घातल्या होत्या. महिला व मुलींनी काळ्या साड्या व ड्रेस परिधान करून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्‍त केली. 

रथ, घोडे, बग्गीवाले, डोलीवाले, कलापथक, विदूषक, बँडवाले, बँड-बँजो, सनई-चौघडा, तुतारी, ढोल-ताशा, हलगीवाले यांनी वेशभूषेसह मोर्चात सहभागी होत लक्ष वेधून घेतले. कार्यक्रम एक, कुटुंब चालती अनेक, हमको रोटी कमाने दो, जिंदा हमें रहने दो, कोरोना-कोरोना, मायबाप सरकार हमारा भी कुछ करोना आदी मागण्यांच्या फलकांद्वारे व्यावसायिकांनी व्यथा मांडल्या. सामाजिक कार्यक्रमांत मंडप, लॉन, मंगल कार्यालय, हॉल क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांची आसन क्षमता किंवा पर्यायी पाचशे व्यक्‍तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी. लॉकडाऊनमधील शासकीय कर, लॉन, मंगल कार्यालय, गोडावून, दुकानांवरील कर माफ करावा. बँक कर्जावरील व्याज माफ करावे आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली. मोर्चात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. 

यावेळी कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, ऑल इंडिया टेंट डिलर्स असोसिएशनचे चेअरमन सागर चव्हाण, उपाध्यक्ष तुकाराम पाटील, विजय सूर्यवंशी, सुनील व्हनागडे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, नगरसेविका जयश्री चव्हाण, दुर्वास कदम, विनायक सूर्यवंशी, श्याम बासरानी, महावीर सन्‍नके, उदय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशन, जिल्हा सामाजिक सेवा व सांस्कृतिक कार्यालय संघ, इव्हेंट मॅनेजमेंट, प्लॅनर्स असोसिएशन, कोल्हापूर कॅटरर्स वेलफेअर असोसिएशन, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.

सर्व पक्षीय नेत्यांचा मोर्चास पाठिंबा…

महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी आ.चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, पक्ष प्रतोद दिलीप पोवार, माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, शाहू कारखान्याचे व्हा.चेअरमन अमरसिंह घोरपडे, दलितमित्र अशोकराव माने यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चाला पाठिंबा दिला. 

गेले आठ महिने व्यवसाय बंद असून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्या झाल्या आहेत.शासनाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर एकाचवेळी मोर्चाचे आयोजन केले आहे. राज्यव्यापी आंदोलनाचे सरकारने दखल घ्यावी. सरकारने हक्‍काचा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल.

प्रमुख मागण्या…

जीएसटी 18 टक्क्यांऐवजी 5 टक्के करण्यात यावा

भाड्याने घेतलेल्या गोदाम, बँक्‍वेट हॉल, मंगल कार्यालयांचे भाडे घेऊ नये 

कर्जधारकांचे व्याज माफ करावे; काही काळ 

‘ईएमआय’ बंद ठेवावेत

टेंट, मंडप व्यवसायास उद्योगाचा दर्जा द्यावा

टेंट, सत्कार समारोहसंबंधित व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी

आर्थिक पॅकेज जाहीर करावे

Back to top button