मुंबई, ठाणे, नागपूरसह ९ पालिका हद्दीत फटाक्यांवर बंदी! | पुढारी

मुंबई, ठाणे, नागपूरसह ९ पालिका हद्दीत फटाक्यांवर बंदी!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या  पार्श्‍वभूमीवर आणि दिवाळीतील फटाक्यांमुळे निर्माण होणार्‍या प्रदूषणामुळे महाराष्ट प्रदुषण महामंडळाच्या परिपत्रकानुसार  मुंबईसह नागपूर, चंद्रपुर, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिविली, वसई विरार, आदी नऊ पालिका हद्दीत फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे. तर  फटाक्यांवर बंदी घातल्यासंदर्भात राज्यातील सुमारे 23 पालिकांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.अशी माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. राज्यात फटाके विक्री आणि फटाके वाजविण्यास मनाई करावी अशी मागणी करणार्‍या याचिकेवर राज्य  सरकारच्या वतीने अ‍ॅड. प्रियभूषण काकडे यांनी फटाक्यांसंदर्भात महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परिपत्रिकेची अंमलबजावणी  करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

कोरोना रुग्ण आणि कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दिवाळीत उडविण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे फुफ्फुसाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी फटाके उडविण्यावर यंदा बंदी घातली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही यावर्षी दिवाळीमध्ये फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात यावी अशी विनंती करणारी जनहित याचिका सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्यावतीने अ‍ॅड.निरंजन भावके, अ‍ॅड.अमित कार्ले आणि असीम नाफडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल मेनन आणि एस.व्ही तावडे यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड.असीम नाफडे यांनी दरवर्षी पीएमपीएमएलच्या कार्यशाळेत काम करणारे कर्मचारी, महापालिकेचे सफाई कर्मचारी तसेच वाहतूक पोलिस यांसारख्या अनेक घटकांना हवेतील प्रदूषण व दिवाळीतील फटाक्यांच्या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असतो. त्याच कोरानाच्या संसर्गामुळे कोरोना रुग्ण आणि कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना दिवाळीत उडविण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे फुफ्फुसाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. अशी भिती व्यक्त करताना, दिल्ली, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांनी यापूर्वीच फटाक्यांना बंदी घातली आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. या राज्यांप्रमाणेच पुण्यासह महाराष्ट्रातही फटाके उडविण्यास बंदी घालावी अशी विनंती केली.

त्यावर राज्य सरकारच्यावतीने मुख्य सरकारी वकिल अ‍ॅड.प्रियभूषण काकडे यांनी भूमीका स्पष्ट करताना राष्ट्रीय हरित लवादाने प्रदुषणाच्या पार्श्‍वभूमीवर हवेच्या गुणवत्ते नुसार फटाक्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्गवारी करून 9 नोंव्हेबर रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार 10 नोव्हेबर ते 30 नोव्हेंबर च्या काळात मुंबईसह नागपूर, चंद्रपुर, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, वसई विरार,,कल्याण आदी नऊ पालिका हद्दीत फटाक्यांना बंदी घातली आहे. तर अकोला, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, जळगांव, जालना,  कोल्हापूर , लातुर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, उल्हासनगर आदी पालिकांना फटाक्यांवर बंदी घालण्या संदर्भात निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. राज्य सरकारने या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, संबंधीत पालिकांना  तशा सुचना दिल्याअसल्याचे न्यायालयात सांगितले. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली.

Back to top button