पुणे : लोहियानगर झोपडपट्टीत आग, २ सिलेंडरचा स्‍फोट  | पुढारी

पुणे : लोहियानगर झोपडपट्टीत आग, २ सिलेंडरचा स्‍फोट 

पुणे :  पुढारी वृत्तसेवा

लोहियानगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री आग लागली. यावेळी दोन सिलेंडरचा स्फोट झाला. तसेच आठ ते दहा घरांचे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन आगीच्या ठिकाणी असलेल्या घरातील सिलेंडर तात्काळ बाहेर काढल्याने  मोठी हानी टळली. 

अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रासमोर लोहियानगर झोपडपट्टी असून, रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात आली. आग लागल्यानंतर या भागात घबराट उडाली. या परिसरातील रहिवाशी मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले होते.  लोहियानगर झोपडपट्टीत रात्री साडेनऊच्या सुमारास बैठ्या घरात आग लागली. या भागात दाटीवाटीने बैठी घरे आहेत. आग लागल्यानंतर शेजारील घरांना आगीची झळ पोहोचली.

अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रासमोर असलेल्या छोट्या गल्लीत आग लागल्यानंतर त्वरीत आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. छोट्या गल्लीत बंब पोहचू शकत नसल्याने मदतकार्यात अडथळे आले. त्यामुळे पाईप एकमेकांना जोडून पाण्याचा मारा करण्यात आला. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, शिवाजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आग आटोक्यात आणण्यात आली.  6 अग्निशामक दलाच्या गाड्या आणि 3 पाण्याच्या टँकरच्या  मदतीने आग विझविण्यात आली.

Back to top button