लोकल प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; दहा महिन्यांत १८९ विनयभंगाचे गुन्हे दाखल | पुढारी

लोकल प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; दहा महिन्यांत १८९ विनयभंगाचे गुन्हे दाखल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

लोकल प्रवासात तरुणीचा विनयभंग करीत तिला चालत्या रेल्वेतून फेकून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना आठगाव ते कसारा या रेल्वे स्थानकादरम्यान आज (शनिवार) समोर आली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.    

ठाण्यात परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी दिवसेंदिवस फोफावत असताना महिलांच्या बाबतीत होणाऱ्या गुन्ह्यात देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही मनोविकृत समाज घटकाच्या अत्याचाराला आज देखील स्त्री बळी पडत असल्याचे विदारक चित्र पोलिसांच्या दप्तरी नोंद होत आहे. हे स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे समोर येत आहे. गेल्या काही वर्षात राज्यात स्त्रियांच्या छळवणुकीच्या घटनेत मोठी वाढ झाल्याची बाब दस्तुरखुद पोलिसांच्याच गुन्हे अन्वेषण विभागाच्या रिपोर्टमध्ये ठळकपणे अधोरेखित करण्यात आली आहे.

तर ठाणे पोलिस आयुक्तालयात दाखल गुन्हेगारीचा आढावा घेतला, तर ठाण्यात रोज दोन विनयभंगचे गुन्हे दाखल होत असल्याची बाब समोर आली आहे. सन 2018 च्या वर्षभरात तब्बल 634 तर 2019 मध्ये 603 विनयभंगाचे गुन्हे ठाणे आयुक्तालय हद्दीत दाखल झाले होते. तर 2020 सालच्या कोरोना काळात देखील जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 189 विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ठाणे पोलिसांनी मागील वर्षी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या रोड रोमियो विरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली होती. त्यावरून महिलांवरील अन्याय कमी होईल अशी अशा होती. मात्र पोलिस दप्तरी नोंद झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची आकडेवारी बघितली तर ही आशा पूर्णत: फोल ठरते. कोरोना काळ वगळता राज्यात गेल्या तीन वर्षात महिलांवर होणाऱ्या अन्याय- अत्याचाराच्या व छळवणुकीच्या घटनेत वर्षागणिक 12.24 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. 

अगदी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगापासून तर विवाहित स्त्रीच्या छळवणुकीच्या घटनेपर्यंत सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांत 10 ते 25 टक्के वाढ झाल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यात घट व्हावी म्हणून अनेक विधायक व धडक मोहीम शासनाने राबवून देखील त्याचा फारसा परिणाम महिलांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीवर जाणवत नसल्याचे चित्र या आकडेवारीमुळे जाणवते. 

त्यात ठाण्याचा आढावा घेतला तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याची बाब समोर येते. 2018 या वर्षाच्या जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत पोलिस आयुक्तालयात एकूण 634 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 566 गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. तर 2019 या वर्षभरात 603 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. 

पोलिसांची धडक मोहीम

दीड वर्षांपूर्वी ठाण्यातील कोपरी भागात राहणाऱ्या प्राची झाडे या वीस वर्षीय तरुणीचा एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करून निर्दयीपणे हत्या केली होती. या घटनेची गांभीर्याने दखल ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतली होती. ठाणे पोलिस आयुक्तालयात मागील कालावधीत दाखल झालेल्या महिलांच्या छेडछाडी संदर्भातील तक्रारींचा आढावा घेऊन त्यांची सध्य स्थितीचे आवलोकन करावे असे आदेश पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते. तरुणींना रोडछाप मजनूकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या, त्यांच्याकडून तरुणींना होणारा त्रास याबाबतच्या दाखल तक्रारींचे पोलिस अधिकाऱ्यांनी पडताळणी करावी आणि त्यात तथ्य आढळल्यास त्वरित गुन्हा दाखल करावा असे पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले होते. तसेच सडकछाप भामट्याकडून होणारा त्रास टाळण्यासाठी तरुणींनी धाडस दाखवत तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील पोलिस आयुक्तांनी केले. 

तरुणींनी पोलिसांशी न घाबरता नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. त्यांच्या तक्रारींची योग्य ती दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन देखील पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. मात्र तरी देखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येतच आहेत. हे शनिवारी लोकल प्रवासात करण्यात आलेल्या तरुणीच्या विनयभंग प्रकरणावरून दिसून येत आहे. 

ठाण्यात घडलेल्या विनयभांगाच्या दाखल घटनांची आकडेवारी 

# 2020 – 189 (ऑक्टोबर पर्यंत)

# 2019 – 603

# 2018 – 634

# 2017 – 505

# 2016 – 458

# 2015 – 564

# 2014 – 559

# 2013 – 463

Back to top button