'नो चिअर्स नो बियर ओन्ली हॅप्पी न्यू इयर!' | पुढारी

'नो चिअर्स नो बियर ओन्ली हॅप्पी न्यू इयर!'

सातारा : पुढारी वृत्तसेवा

कोरोना होऊ नये म्हणून जसे अंतर पाळता तसेच कोणतेही व्यसन होऊ नये म्हणून व्यसनांपासून अंतर ठेवले पाहिजे. दरवर्षी दारुमुळे पाच लाख तर तंबाखूमुळे दहा लाख मृत्यू पावतात. हा मृत्युदर कोरोणाच्या 15 पट आहे. तरुण पिढी ही आपल्या पायावर भक्कम पणे उभी राहिली पाहिजे, ती लटलटत ऊभी राहायला नको. नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही व्यसनाचा आधार न घेता चांगले उपक्रम, श्रमदान राबवून नववर्षाचे स्वागत केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी परळी पंचक्रोशी मित्र मंडळ व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्या विद्यमाने भोंदवडे येथे आयोजित केलेल्या “चला व्यसनाला बदनाम करूया” या अभियानाच्या  शुभारंभ प्रसंगी केले.

अधिक वाचा :फास्टॅगला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव, भावनोउपचार तज्ज्ञ किशोर काळोखे, पोलिस निरिक्षक सजन हंकारे, दयानंद पवारसर  विकास कारंडे आदी उपस्थित होते. डॉ. हमीद दाभोळकर पुढे म्हणाले की, आपण कोरोना आजाराला घाबरतो म्हणजेच तो आजार होऊ नये म्हणून काळजी घेतो, मात्र वर्षानुवर्षे दारू, तंबाखूचे व्यसन लागू नये म्हणून अंतर ठेवले पाहिजे. मात्र आपण ये अल्कोहोल ये! ये तंबाखू ये! असे जणू स्वागत करीत गावा-गावात बियर बार तसेच हॉटेलमध्ये दारू पिण्याची सोय करून द्यायची असे प्रकार वाढू लागले आहेत.  

अधिक वाचा : कोरोना लसीकरण : सर्व राज्यांत २ जानेवारीपासून ‘ड्राय रन’!

मद्य पिणे तसेच मद्याच्या विक्रीला विरोध करता आला पाहिजे. 31 डिसेंबर म्हणजे जणू मद्य पिण्याचा कार्यक्रम होऊ लागला आहे. स्त्री-पुरुषांची समानता आहे म्हणूनच की काय महिला वर्गातही व्यसनाचे प्रमाण वाढू लागले आहे. आनंद साजरा करायचा असेल तर निसर्गाच्या सानिध्यात सामाजिक उपक्रम स्वच्छता अभियान राबवून आनंद साजरा करावा. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. या वेळी निवडणुकीत दारूच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी “नो चीअर्स” “नो बियर” “ओन्ली हॅप्पी न्यू इयर”! द द दुधाचा! दारू नको दूध प्या! अरे बघताय काय सामील व्हा…! चला व्यसनाला बदनाम करू या अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. या वेळी येणाऱ्या सर्व वाहन धारकांना युवकांना दुधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास कारंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दयानंद पवार यांनी केले.

Back to top button