मनूवाद अन् पेशवाई अजूनही मोदी यांच्या रूपाने जिवंत | पुढारी

मनूवाद अन् पेशवाई अजूनही मोदी यांच्या रूपाने जिवंत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मनूवाद अन् पेशवाई संपलेली नाही, मोदी सरकारच्या रूपाने अजूनही जिवंत आहे. आपल्या देशाचे राजकारण हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान याच मुद्द्यावर फिरवले जात आहे. त्यापेक्षा सामान्य जनतेला लागणार्‍या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या विषयावर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी आहे. हे सरकार सामान्य जनतेसाठी नसून उद्योगपतींसाठी चालवले जात असल्याचा आरोप शनिवारी (दि. 30) एल्गार परिषदेत सर्व वक्त्यांनी केला. पुणे शहरातील गणेश कला, क्रीडा सभागृहात चौथी एल्गार परिषद सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत सुरू होती. देशभरातील वक्‍ते या परिषदेत व्याख्यानासाठी आले होते. व्यासपीठावर या परिषदेचे प्रमुख वक्‍ते माजी न्यायाधीश बी. जे. कोळसे-पाटील, प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय, माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन, एस. एस. मुश्रीफ यांची उपस्थिती होती. परिषदेचे उद्घाटन मोदी सरकारने केलेल्या, पण मान्य नसलेल्या अनेक नव्या कायद्यांचे पोस्टर फाडून करण्यात आले. सकाळच्या सत्रात  मनूवाद, ब्राह्मणवाद, पेशवाई, मोदी सरकारची रणनीती यावर रचलेले पोवाडे तरुणांनी सादर केले. देशभरातून आलेल्या सर्वधर्मीय वक्त्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत, हे सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप केला.

शोषणमुक्‍त समाजाची निर्मिती व्हावी

माजी न्या. कोळसे पाटील म्हणाले, “शोषणमुक्‍त समाजाची निर्मिती व्हावी यासाठी आमचा लढा आहे. पण मोदी सरकार हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान याच मुद्द्यांवर काम सुरू आहे. मात्र शोषणमुक्‍त समाजाची निर्मिती झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा मिळण्याऐवजी उद्योगपतींनाच अधिक श्रीमंत केले जात आहे, हा आमचा मोदी सरकारवर आरोप आहे.”

देशात सर्वत्र दहशतीचे वातावरण

रॉय म्हणाल्या, देशात जे वातारण आहे ते पाहून असे वाटते की, पेशवाई संपली तरी ब्राह्मणवाद सुरूच आहे. देशात सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. मुस्लिमांना ठरवून लक्ष्य केले जात आहे. देश जातीपातीत पुन्हा एकदा विभागला जात आहे. देशात उद्योगपतीच श्रीमंत होत आहेत. अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, मित्तल हेच देशात आहेत काय? हा देश सामान्य जनतेचा आहे की नाही, असा सभ्रम निर्माण व्हावा इतकी गंभीर परिस्थिती आहे.

पुस्तकांचा खजिना अन् पोलिस बंदोबस्त

या परिषदेतील पुस्तकांच्या स्टॉलवर डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्यावरील, तसेच संविधान, कायदा या विषयावर अनेक पुस्तके होती. तसेच अरुंधती रॉय यांच्या पुस्तकांचाही स्टॉल होता. एल्गारप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आंदोलनकत्र्यांच्या भाषणाच्या क्लिप सुरुवातीला या ठिकाणी दाखवण्यात आल्या. तरुण मुले व मुलींनी शोषणावर पोवाडे सादर केले. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

Back to top button