मिरज : अलफोन्सा स्कूलच्या फी वाढ विरोधात पालकांचा एल्गार | पुढारी

मिरज : अलफोन्सा स्कूलच्या फी वाढ विरोधात पालकांचा एल्गार

मिरज : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यामुळे यावर्षी फीमध्ये पाचवी ते दहावी मध्ये 75 टक्के सूट द्यावी, नर्सरी ते चौथीपर्यंत संपूर्ण फी माफ करावी, या मागणीसाठी अलफोन्सा स्कुलच्या पालकांनी आज एल्गार केला. शाळा प्रशासनाची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. मात्र प्रशासनाने त्यांची मागणी थेट धुडकारून लावली आहे. त्यामुळे पालक आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत आहेत. 

अधिक वाचा – सांगली : हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, पोलीस निरीक्षकास अटक

कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वत्र शाळा बंद होत्या. आता दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये  पालकांकडून फी ची मागणी केली जात आहे. फीमध्ये काही सवलत दिल्याचेही सांगितले जात आहे. मात्र शाळाच बंद होत्या. त्यामुळे फी जास्त घेऊ नये अशी पालकांची मागणी आहे. तशी मागणी पालकांकडून मिरजेतील अलफोन्सा स्कूलच्या प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र प्रशासन त्याला मान्यता देत नाही.

आज दुपारी अनेक पालक संतप्त होत, थेट शाळा प्रशासनाला भेटले. त्यांनी तसे निवेदनही दिले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्या काळात छोटे-मोठे उद्योगही बंद होते. त्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक पालक बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पालकांची फी भरण्याची क्षमता राहिली नाही. चालू शैक्षणिक वर्षाची नर्सरी ते चौथीपर्यंतची फी पूर्णपणे माफ करावी, पाचवी ते दहावीची फी केवळ 25 टक्के भरून घ्यावी व 75 टक्के माफ करावी. या मागणीचे निवेदन दिल्यानंतर शाळा प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पालकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता फी माफीसाठी वरिष्ठ पातळीवर लढा देण्याचा निर्धार पालकांनी केला आहे. 

Back to top button