पावसाळ्यात मुंबईची 'तुंबई' का होते? | पुढारी

पावसाळ्यात मुंबईची 'तुंबई' का होते?

पुढारी ऑनलाईन डेस्क; पावसाळ्याची सुरुवात होत नाही, तोवर मुंबई तुंबल्याची बातमी सर्व माध्यमांंवर झळकायला लागते. मुंबई तुंबल्याची बातमी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या आणि वाचकांच्या मेंदूमध्ये प्रवेश करते. दादर, कुर्ला, सायन, घाटकोपर अशा अनेक मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्‍ये साचलेलं ३-४ फूटांपर्यंतचं पाणी, त्यातून स्वतःला सावरत मार्ग काढणारे मुंबईकर, पाण्यामध्ये फसलेले लोक, हे चित्र आपल्यासमोर सातत्याने उभं राहतं. पण, कधी विचार केलाय का? दरवर्षी मुंबई तुंबलेल्याची बोंबाबोंब का होते? त्याची काही नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणं आहेत, तिच कारणं आज आपण पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊ ‘मुंबईची तुंबई’ का होते. 

नैसर्गिक कारणं

टेकड्या आणि खाड्या : मुंबई हा बेटांचा प्रदेश आहे. ७ बेटं एकत्र जोडून तयार केलेलं शहर म्हणजे मुंबई. अशीच त्याची ऐतिहासिक ओळख सांगितली जाते. आता या ७ बेटांवर २२ टेकड्या होत्या. दोन्ही बाजूंनी खाड्या आणि समुद्र आणि बरोबर मध्यभागी २२ टेकड्या होत्या. हीच नैसर्गिक किंवा भौगोलिक परिस्थिती मुंबईच्या पुरस्थितीला पहिलं कारण आहे, असं मुंबईचे जाणकार सांगतात. 

भांडुप ते घाटकोपर दरम्यान जी टेकड्यांची रांग लागते, त्या टेकड्यांच्या पूर्वेकडचा प्रदेश हा खाडीजवळ आहे. असं म्हणतात की, ठाणा नावाची नदी, या भागातून वाहायची. तसा बाॅम्बे गॅझेटिअरमध्ये उल्लेखदेखील आहे. एकंदरीत काय, तर एका बाजूला टेकड्या आणि दुसऱ्या बाजूला खाड्या, त्यामुळे मधला भाग सखल आहे. आणि यामुळेच मुंबईत पाणी तुंबतं.

आता शीव ते कुर्लाचा भाग विचारात घेऊ या… शीव ते कुर्ला दरम्यानचा जो भाग आहे तो पूर्वी खाडी आणि दलदलीचा भाग होता. तिथे मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला. रेल्वेचा पहिला मार्ग जो बांधण्यात आला होता, तो मार्ग याच दलदलीवर टाकलेल्या भरावावर बांधला होता. मुंबईमध्ये अशी अनेक ठिकाणं होती, जिथं मोठी दलदल होती. मात्र, तिथेही भराव टाकला गेला आहे. आता भराव कुठे टाकला जातो? तर, जिथं सखल भाग आहे तिथे. त्यामुळे भरावाच्या सखल ठिकाणीच पावसाचं पाणी तुंबतं. उदाहरणार्थ, सायन चुनाभट्टी, दादर-पश्चिम अशा अनेक ठिकाणी भराव टाकलेल्या प्रदेशात दरवर्षी पाणी तुंबतं.

खारफुटीचं जंगल ः मूळात मुंबई ही समुद्र, खाडी यांनी वेढलेली आहे. त्याच्यानंतर जमीन येते. पण, या सर्वांमध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे दलदलीच्या प्रदेशातील खारफुटी जंगलं. पर्यावरण तज्ज्ञांच्या मतानुसार खारफुटीची जंगलंच मुंबई तुंबण्यापासून वाचवत होती. पण, आता झोपडपट्ट्या आणि मोठमोठ्या इमारतीचं अतिक्रमण वाढल्यामुळे सुमारे ७० टक्के खारफुटीची जंगलं कापली गेली. परिणामी, मुंबई तुंबायला सुरुवात झाली. 

समुद्राला भरती येते तेव्हा समुद्राचं पाण्याच्या लाटा किंवा समुद्राचं पाणी थेट मुंबई शहरात घुसत नाही. कारण, खारफुटीची जंगलं त्या पाण्याचा वेग कमी करतात. परिणामी, जमिनीची धूप होत नाही. त्यातून शहर सुरक्षित राहतं. आजही मुंबईला गेलात तर, तुम्हाला महामार्गाच्या कडेने मिठागरं दिसतील. ही मिठागरंदेखील मुंबई तुंबण्यापासून वाचवू शकतात. कारण, खारं पाणी ते साठवून घेतात. पण अलिकडच्या काळात मिठागरं नष्ट होत चालली आहेत. त्यामुळेदेखील भविष्यात मुंबई तुबण्याची शक्यता आहे. 

पावसाची तीव्रता आणि समुद्राची भरती : अलिकडच्या काळात म्हणजेच १५-२० वर्षांच्या काळात पावसाचा मुख्य पॅटर्न बदलला आहे, असं अनुभवी मुंबईकर सांगतात. कमी वेळेत जास्त पाऊस पडत असल्यामुळे मुंबई तुंबत आहे. पण, हवामान तज्ज्ञांचं उलट मत आहे. ते म्हणतात की, मुंबईत तीन प्रकारांमध्ये पाऊस पडतो. त्यामध्ये जास्त, खूप जास्त आणि अतितीव्र अशा तीन प्रकारांमध्ये मुंबईत तुकड्या तुकड्यांमध्ये पाऊस पडत असतो. अतितीव्र प्रकारात सुमारे दिवसभरात २० सेंटीमीटरचा पाऊस पडतो. आणि असा पाऊस संपूर्ण पावसाळ्यात फक्त पाच वेळी किंवा त्याहीपेक्षा कमी पडतो. साधारणपणे मुंबईत ‘जास्त’ प्रकारात पाऊत पडत असतो. ज्यावेळी समुद्राला भरती येते, त्या पावसांचं पाणी जाण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या असतात. त्यातून शहरातील पावसाचं पाणी समुद्रात सोडलं जातं. मात्र, मुंबईत जास्त पाऊस पडला आणि त्याचवेळी समुद्रात भरती आली, तर या जलवाहिन्यांचे दरवाजे बंद केले जातात. त्यातूनच मुंबई तुंबते. 

नद्या लुप्त झाल्या : मुंबईत प्रामुख्याने चार नद्या आहेत. त्यात दहिसर, मिठी, ओशिवरा आणि पोयसर. त्याचबरोबर मुंबईच्या जवळून वैतरणा, तानसा, उल्हास या नद्यादेखील वाहतात. पण, मुंबईतल्या नद्यांचं गटारांमध्ये किंवा नाल्यांमध्ये परिवर्तन झालेलं आहे. त्याचबरोबर नद्यांमध्ये भराव टाकून शहर विकसित करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, एमएमआरडीए, म्हाडा यांनी मिठी नदीवर भराव टाकून आजचं बीकेसीचा भाग विकसित करण्यात आला. त्याचबरोबर दहिसर, पोयसप आणि ओशिवरा या नद्याही गाळ्यातच गेलेल्या आहेत. 

मानवनिर्मित कारणं 

नियोजनाच्या अभावातून वाढलेली मुंबई : पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई यांची क्षेत्रफळं काढली की, लक्षात येतं… सुमारे २५० चौरस किलोमीटर जमिनीचा भाग हा भराव टाकून तयार करण्यात आला आहे. नगरनियोजन तज्ज्ञ सांगतात की, “कुठल्याची शहराच्या विकासाचं नियोजन करताना त्यातील भौगोलिक प्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्यामध्ये डोंगर, दऱ्या, त्यांचा उतार, नाले याचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्यातून शहराचं नियोजन करता येतं. मात्र, मुंबई शहराचं नियोजन करत असताना सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात आलं”, असं मत नगरनियोजन तज्ज्ञ नोंदवितात. 

मुंबईच्या इतिहासाचा विचार केला तर लक्षात येतं. की, ब्रिटिशांनी मुंबई वसविली. त्यावेळी शहरातील पाण्याचा निचरा होण्याचा प्रश्न त्यांनी निकालात काढला होता. त्यांनी काय केलं होतं, तर पाणी जाण्यासाठी ब्रिटिशांनी चांगल्या जागा तयार करून ठेवल्या होत्या. उदाहरणार्थ वरळीतील मोठमोठे नाले. पण, १९५१ नंतर शहराचा विकास होताना शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा कसा करायचा, याचा विचारच करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबईची तुंबई होते. 

मुंबईतील लालबाग-परळ या भागात पूर्वी पाणी तुंबत नव्हतं. कारण, त्या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी तळी होती. त्यात ते पाणी साठलं जायचं आणि ते पाणी पुन्हा वापरलं जायचं. पण नंतरच्या काळात शहराच्या विकास करत असताना ती तळी बुजविण्यात आली. त्यामुळे इथलं पाणी जाणार कुठं? परिणामी, हा भागही पाण्यात तुंबलेला असतो. 

विविध यंत्रणा एकाच वेळी कार्यरत : पूर्वी मुंबईमध्ये कमी प्रमाणात यंत्रणा कार्यरत होत्या. नंतरच्या काळात यंत्रणा मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामध्ये एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, एमएमआरसी, महावितरण, रिलायन्स, रिलायन्स एनर्जी, रेल्वे,  मुंबई महापालिका, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोर्च ट्रस्ट, पोस्ट, लष्कर, विमानतळ प्राधिकरण, अशा अनेक यंत्रणा मुंबईमध्ये सुरू आहेत. त्या सर्व एकाच वेळी रस्त्यांवर काम करत असतात. या यंत्रणामुळे रस्त्यांची अवस्था बिकट होत राहते. त्यातून पाणी तुंबण्याची प्रकार सतत होत राहतो. 

बेजबाबदार प्रशासन व ड्रेनेज : रेल्वेमधील पाण्याची निचार होण्यासाठी, रस्त्यावरील झाडांची कापणी, नालेसफाई करण्यासाठी, रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेकडून कोट्यवधींची कंत्राटं दिली जातात. मात्र, यामध्ये पारदर्शक कारभार दिसत नाही. इतका खर्च करूनही केलेली कामं व्यवस्थित झालेली नसतात. त्यातून बेजबाबदार प्रशासनाचा कारभार वारंवार अधोरेखित होतो. 

सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांनी तत्कालिन लोकसंख्येचा विचार करून मुंबईत ड्रनेज बांधली होते. पण, ६० च्या दशकानंतर मुंबई आणि मुंबई उपनगराचा विकास वेगाने झाला. त्यावेळी आणखी मोठ्या प्रमाणात ड्रेनेज बांधण्याची गरज होती. पण, तसं झालं. २००५ साली महापूर आला, त्यावेळी ही चूक लक्षात आली. शासनाने माधवराव चितळे यांची समिती स्थापन केली. त्यांनी ताशी २५ मिमीने पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता सध्याच्या ड्रेनेजची आहे. ती ताशी ५० मिमीने करावी, अशी शिफारस केली. अशा ड्रेनेजच्या अवस्थेमुळे मुंबई तुंबते. 

तसेच शहरातील पावसाचं पाणी जाण्यासाठी समुद्राच्या तोंडाला जे २७ फ्लड गेट्स बांधली आहेत. पण, ज्यावेळी अतितीव्र वेगाचा पाऊस आणि समुद्राची भरती, या गोष्टी एकत्र घडल्या. तर, हे २७ गेट्स बंदच करावे लागतात. कारण, हे गेट्स उघडली तर समुद्राचं पाणी शहरात घुसेल आणि परिस्थिती आणखी चिघळेल. अशा परिस्थितीमुळे शहरातलं पाणी समुद्रात जात नाही. परिणामी, मुंबई तुंबते. 

Back to top button