'महाविकास आघाडीच मराठा आरक्षण मिळवून देईल, जी जबाबदारी अंगावर पडेल, ती पेलण्याची तयारी' | पुढारी

'महाविकास आघाडीच मराठा आरक्षण मिळवून देईल, जी जबाबदारी अंगावर पडेल, ती पेलण्याची तयारी'

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : खासदार संभाजीराजेंचे नेतृत्व संयमी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा नक्की यशस्वी होईल. महाविकास आघाडीचे सरकारचं मराठा आरक्षण मिळवून देईल, त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी जबाबदारी अंगावर पडेल, ती पेलण्याची आपली तयारी आहे. विरोधक केवळ आंदोलनाच्या आडून राजकारण करण्याच्या तयारी असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर भूमिका मांडली.

अधिक वाचा : दै.‘पुढारी’चे हे सामाजिक कार्य कौतुकास्पदच; सतेज पाटील यांचे गौरवोद्गार

ते पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी आपल्याला भेटून निवेदन दिले आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे, ही भूमिका आपलीही आहे. यासाठी नेमलेल्या समितीने फेरविचार याचिकेबाबत पर्याय दिला असून, यादृष्टीनेही राज्य सरकारची तयारी सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्धच असून, खा. संभाजीराजेंचे नेतृत्व असल्याने सध्याच्या कोरोना काळात काय करावे, याचे भान त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला नक्की यश येईल.

चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंवर केलेल्या टीकेबाबत मुश्रीफ म्हणाले, संभाजीराजेंना महाविकास आघाडीवर विश्वास आहे. ही आघाडीच मराठा समाजाला आरक्षण देईल. सध्या कोरोनाची परिस्थिती त्यांना माहीत आहे. त्यामुळे मोठे मोर्चे, आंदोलन करुन आपल्याच समाजातील लोकांना महामारीत ढकलणे परवडणारे नाही. संयमी नेतृत्व या लढ्याला नक्की यश मिळवून देईल.

अधिक वाचा : कोल्हापुरात जिल्ह्यात ‘वीकेंड लॉकडाऊन’

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी चर्चा…

यावेळी मुश्रीफ यांनी माहिती देताना, सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौरा करणार असून, या दिवशी कोरोनाबाबतची आढावा बैठक झाल्यानंतर मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीतील सर्वच लोक आरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत, असे सांगितले.

Back to top button