राष्‍ट्रीय महामार्गावर पाणी; कराडजवळ वाहतूक विस्‍कळीत  | पुढारी

राष्‍ट्रीय महामार्गावर पाणी; कराडजवळ वाहतूक विस्‍कळीत 

कराड : पुढारी वृत्तसेवा 

एक जूनला ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर कराड मलकापूर परिसरात अक्षरश: दाणादाण उडाली होती. मात्र यातून धडा न घेता गांधारीची भूमिका घेण्यात आल्याने गोटे तालुका कराड गावच्या हद्दीत पुणे – बंगळूर आशियाई महामार्गावरील वाहतूक आज (गुरुवार) सकाळी विस्कळीत झाली. गोटे वनवासमाची गावाच्या बाजूने येणाऱ्या ओढ्याचे पाणी सेवा रस्त्यासह महामार्गावर साचले असून, महामार्गावरून केवळ अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. दुचाकी तसेच लहान कार यांची वाहतूक सुरक्षिततेच्या कारणावरून बंद ठेवण्यात आली आहे. 

अधिक वाचा : रस्‍ता गेला वाहून; गारगोटी-कोल्‍हापूर वाहतूक बंद 

बुधवार सकाळपासून कराड तालुक्यात अधूनमधून पावसाच्या हलक्‍या तसेच मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. सायंकाळी सात वाजल्‍या पासून पावसाचा जोर वाढला असून, गुरुवार सकाळपर्यंत पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या जोरदार पावसामुळे आशियाई महामार्गावर पाणी साचले आहे. गोटे गावच्या हद्दीत नदीकडे जाणारे पाणी अडथळे निर्माण करण्यात आल्याने महिंद्रा हॉटेल परिसरात सेवा रस्त्यावर नेहमीच पाणी असते. पावसामुळे ओढ्याला आलेले पाणी सेवा रस्त्यासह महामार्गावर साचले आहे. सेवा रस्त्यावर सुमारे सहा ते सात फुटाहून अधिक पाणी आले आहे. त्यामुळे सेवा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. तर महामार्गावरील मुख्य लेनवरही दीड ते दोन मीटर पाणी आहे. 

…तर तो शिवसैनिक; महापौरांकडून बाळासाहेब ठाकरेंचा तो व्हिडिओ व्हायरल

सुरक्षेच्या कारणासाठी काहीकाळ सर्व वाहतूक ठप्प होती. पाणी थोडे कमी झाल्यानंतर महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र कार तसेच दुचाकी वाहनांची वाहतूक बंदच आहे. या घटनेमुळे महामार्गालगतच्या नालेसफाईसह नैसर्गिक ओढयांना करण्यात आलेला अटकाव किती धोकादायक ठरू शकतो? हे समोर आले आहे. त्यामुळेच प्रशासनाला आता तरी जाग येणार का? असा संतप्त प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे. 

Back to top button