कळंब : कोरोनामुळे मृत्‍यू पावलेल्‍यांच्या नावे झाडे लावण्‍याचा उपक्रम  | पुढारी

कळंब : कोरोनामुळे मृत्‍यू पावलेल्‍यांच्या नावे झाडे लावण्‍याचा उपक्रम 

कळंब;पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे स्मरण राहावे यासाठी तालुक्यातील शिराढोन गावातील किरण पाटील या तरुणाने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने झाडे लावून ती जोपासण्याचा उपक्रम पाटील यांनी हातात घेतला आहे. गेल्या वर्ष भरापासून 85 झाडे त्यांनी पंचक्रोशीत लावून जोपसली आहेत. किरण पाटील यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

अधिक वाचा : सीबीएसईकडून इयत्ता १२ वीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला! राज्य मंडळही त्याच मार्गाने जाणार?

सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या चुलतीचे (हीराबाई मधुकर यादव) यांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. ही बाब किरण पाटील यांच्या मनाला लागली व त्यांनी एक आगळा वेगळा चंग बांधला. त्या दिवसापासून गावात कोरणामुळे कोणी मृत झाले की, त्याच्या नावाने एक झाड लावायचे अन् त्या झाडाला त्या व्यक्तीचे नाव देऊन ते झाड जोपासायचे असा  उपक्रम त्‍यांनी सुरू केला. गेल्या वर्षभरापासून त्यांनी गावात आतापर्यंत ८५ झाडे लावली असून ती झोपसली सुद्धा आहेत. हे काम केवळ ऑक्सिजन अभावी लोक मृत्‍यू पावत आहेत, ही गोष्ट मनाला खटकली, त्‍यातून सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविल्‍याचे पाटील सांगतात. 

पाटील यांनी हा उपक्रम राबवत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचा ही प्रयत्न केला असून, त्यांनी लावलेल्या झाडा मध्ये पिंपळ, वड,कडू लिंब, नांदुर्गी, बेल अशी औषधी वनस्पतींची झाडे त्‍यांनी लावली आहेत. या झाडांच्या संगोपणासाठी पाटील पहाटे उठून सायकलवरून घागरी आणून पाणी घालतात. पाटील करत असलेल्या कामाचा गावकऱ्यांना सुद्धा अभिमान वाटत असून, आपल्या घरातील व्यक्तीच्या नावाने कोणीतरी झाड लावून ते जोपसतो, यातून वेगळे समाधान मिळत असल्‍याची सर्वांची भावना आहे. 

अधिक वाचा : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना एनआयएकडून अटक

कोरोनाच्या या संकटात काही ठिकाणी माणुसकी  ही पूर्णपणे हरवून गेली की काय, अशी भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. अशा परिस्‍थितीत  किरण पाटील यांनी आपली माणस मेल्यानंतर ही त्यांची ओळख जिवंत ठेण्याचे काम झाडे लावण्याच्या माध्यमातून हाती घेतले आहे. ही झाडे भविष्यात सावली, ऑक्सिजन तर देतीलच पण व्यक्तीच्या नावाने ही झाडे ओळखली जातील.. असाच उपक्रम प्रत्येक गावातील तरूणांनी राबविला तर सर्व गावे खऱ्या अर्थाने हरीत होतील व कोरोनामुळे मृत्यू पावलेली माणस देखील वृक्षरूपी जिवंत रहातील यात शंका नाही.

Back to top button