जगातील बहुतांश देशांना हवामान बदलाच्या भीषण परिणामांना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच फिजीसह अनेक देशांनी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाकडे (आयसीसी) ‘इकोसाईड’ला एखाद्या हत्याकांडाप्रमाणे गंभीर गुन्हा म्हणून गृहित धरावे, अशी मागणी केली आहे. ‘इकोसाईड’ची निश्चित अशी व्याख्या नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते, पर्यावरणावर कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या रूपात परिणाम करणार्या आणि त्यातही जाणीवपूर्वक होणार्या कृत्याला ‘इकोसाईड’ असे म्हटले जाते. अशा प्रकारचे गुन्हे सतत होत आहेत. ही एकप्रकारे संघटित गुन्हेगारी आहे.
जगातील बहुतांश देश पर्यावरणाबाबत गंभीर झाले आहेत. बेसुमार जंगलतोड, वाजवीपेक्षा अधिक मासेमारी या कारणांमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याने हवामान बदलाचे परिणामाचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहेत. अलीकडेच फिजी, सामोआ आणि वानुआटू या देशांनी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाकडे अन्य जागतिक पातळीवर समजल्या जाणार्या गुन्ह्यात ‘इकोसाईड’चा समावेश करावा, अशी मागणी केली. म्हणजेच युद्धाशी संबंधित गुन्हे, वर्णद्वेष, हत्याकांड यासारख्या प्रकरणांत दोषींना ज्याप्रमाणे शिक्षा केली जाते, त्याचप्रमाणे पर्यावरण हानी करणार्यांनाही हा दंडक लागू करावा, असे या देशांचे म्हणणे आहे; पण अनेकांनी तत्पूर्वीच या प्रकरणाला गंभीर गुन्हा असल्याचे गृहित धरून शिक्षा निश्चित केल्या आहेत. या देशांत पर्यावरणाच्या कोणत्याही प्रकारच्या हानीला गंभीर गुन्हा म्हणून गृहित धरतो. ‘इकोसाईड’ची निश्चित अशी व्याख्या नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते, पर्यावरणावर कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या रूपात परिणाम करणार्या आणि त्यातही जाणीवपूर्वक होणार्या कृत्याला ‘इकोसाईड’ असे म्हटले जाते. म्हणजे अमेझॉनचे जंगल जगातील सर्वात मोठे वनक्षेत्र मानले जाते. जगभरातील एकूण ऑक्सिजनमध्ये अमेझॉनचा मोठा वाटा आहे. त्याला पृथ्वीचे फुफ्फुस असेही म्हणतात; पण दहा वर्षांपासून या फुफ्फुसाची मोठी हानी केली जात आहे. जंगलतोड तर होत आहेच, त्याचवेळी तेथील नागरी वस्तीही ओसाड पडताना दिसते. लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. एकंदरीतच अशा प्रकारचे गुन्हे सतत होत आहेत. ही एकप्रकारे संघटित गुन्हेगारी आहे. हे ‘इकोसाईड’ आहे म्हणजे दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास पर्यावरणाची हत्या.
अतिमासेमारीमुळे महासागरातील परिसंस्था अडचणीत येऊ शकतात, तरीही मासेमारीचे प्रमाण वाजवीपेक्षा अधिकच आहे. प्लास्टिक आणि रासायनिक कचरा हा बिनदिक्कतपणे समुद्रात टाकला जातो. परिणामी, समुद्राचे पाणी खराब होते. या गोष्टी ठाऊक असतानाही असे प्रकार बिनधास्त केले जातात; पण आता बेसुमार जंगलतोड, वाळू उपसा यासारख्या गोष्टींकडे जागतिक पातळीवर कायदेशीर गुन्हा या द़ृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात झाली आहे. ‘इकोसाईड’ ही त्यासाठी वापरली जाणारी संज्ञा होय. गुन्हेगारी आणि पर्यावरणवादी वकिलांच्या एका पॅनेलने 2021 मध्ये ‘इकोसाईड’ची कायदेशीर व्याख्या केली आहे. ‘इकोसाईड’ म्हणजे आपल्या कृत्यामुळे गंभीर, व्यापक आणि दीर्घकालीन नुकसान होण्याची पुरेशी शक्यता आहे, हे ठाऊक असतानाही पर्यावरणाचा जाणीवपूर्वक केलेला नाश.
जगात सर्वप्रथम ही संज्ञा अमेरिका-व्हिएतनामच्या युद्धात वापरली गेली. अमेरिकेने व्हिएतनामची नदी आणि जमीन प्रदूषित केली आणि त्यासाठी एक विशेष प्रकारचा विषप्रयोग मातीवर करण्यात आला. हेरगिरीच्या भाषेत ‘एजंट ऑरेंज’ असे म्हटले गेले. कालांतराने अमेरिकेने शत्रू देशांना पराभूत करण्यासाठी या देशांच्या मातीत आणि पाण्यात विष कालविल्याचे निष्पन्न झाले. बेकायदा खाण उत्खननही हाही गुन्हा ठरतो. बेकायदा मासेमारी करणे, प्रदूषणाचा फैलाव करणे, पर्यावरणावर परिणाम करणारी कामे यांचा या श्रेणीत समावेश आहे. शिवाय हवामान बदलाला चालना देणार्या पूरक गोष्टीही पर्यावरणाशी संबंधित गुन्हा राहू शकतो. 2021 मध्ये फ्रान्सने ‘इकोसाईड’ला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवले. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून पर्यावरणाचे नुकसान होत असेल, तर त्याला जबर दंडासह तुरुंगवासही भोगावा लागेल. बेल्जियमने ‘इकोसाईड’ला आंतराष्ट्रीय गुन्ह्याच्या रूपातून मान्यता देण्याचा प्रयत्न केला.