दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. सीताराम येचुरींसोबत मी जयपूरहून एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होतो. त्यांच्या हातात एक पुस्तक होते, ‘ई इज इक्वल टू एमसी स्क्वेअर.’ लेखक डेव्हिड बोदानीर. मला माहीत होते की, त्यांचे वाचन विविधांगी आणि सखोल होते. म्हणून मी त्यांना या पुस्तकाबद्दल विचारू लागलो. पुस्तक चाळून, पलटून पाहिल्यावर मला ते आवडले. माझी उत्सुकता लक्षात येताच ते म्हणाले, ‘तुमचा पत्ता पाठवा.’ मी त्यांना माझा पत्ता दिला आणि चार दिवसांत पुस्तकाची प्रत माझ्यापर्यंत पोहोचली. लोकांशी कुशलतेने जोडले जाणे हे येचुरी यांचे सर्वांत मोठे गुणवैशिष्ट्य होते.
मी त्यावेळी खासदार नव्हतो; पण मी त्यांच्यासोबत राहिलो तेव्हा ते अगदी छोट्या गोष्टींचीही दखल घेत असत. मी राज्यसभेवर आलो त्याचदरम्यान त्यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यांनी मला निरोप पाठवला की, ‘कॉम—ेड, तुम्ही राज्यसभेवर अगदी योग्य वेळी आलात, मी निघतोय आणि तुम्ही येत आहात.’ राजकारणात एवढी प्रदीर्घ कारकीर्द असलेला नेता असे म्हणत आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी बाब होती. कारण, माकपच्या सर्वोच्च युनिट मानल्या जाणार्या पॉलिट ब्युरोमध्ये येचुरी प्रदीर्घ काळ होेते. त्यांना एकेकाळी राज्यसभेचे सर्वोत्तम खासदार मानले जात होते. अशा बुद्धिमान आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने प्रदीर्घ आजाराशी लढत असतानाच जगाचा निरोप घेतला, हे ऐकून वेदना झाल्या. प्रत्येक स्तरावर मजबूत संबंध किंवा संपर्क निर्माण करणारे कुशल राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळेच येचुरी यांचे लालू प्रसाद यादव यांच्याशी जे नाते होते, तेच संबंध तेजस्वी यादव यांच्याशीही होते. कष्टकरी मजुरांप्रती असलेल्या समर्पित आयुष्यातील त्यांचा संघर्ष अवघ्या देशाने पाहिला आहे.
येचुरी यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची भरपाई कधी होईल, असे वाटत नाही. त्यांना राग अनावर झाला आहे, असे कधीच दिसले नाही. सध्याच्या विखारी काळातही येचुरी यांनी राजकारणाचे मूळ स्वरूप कायम ठेवले होते. आपण एकमेकांच्या कितीही विरोधात असलो, तरी एकाच वर्तुळात किंवा मंचावर एकमेकांसोबत असतो, हे या भारतीय स्वभावाचे मूळ तत्त्व आहे.
कॉम्रेड हरकिशन सिंग सुरजित यांच्यानंतर देशाच्या राजकारणात आलेल्या संक्रमण काळात येचुरी यांची डाव्या पक्षांमधील भूमिका खूप वाढली होती. डावे पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सामील झाले, तेव्हा युती कशी करायची, कोणते मुद्दे असतील, सरकारचा ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’ कोणता असेल, याबाबतची त्यांची भूमिका सदैव स्मरणात राहील. सुरजित सिंगांनंतरच्या काळात शेतकरी, मजूर आणि उपेक्षित लोकांच्या राजकारणासाठी झटत राहणे सोपे नव्हते. कारण, बहुमताच्या वर्चस्वाचे राजकारण प्रबळ होत चालले होते. त्या काळाद येचुरी यांनी केवळ सुरजित यांचा वारसा कायम ठेवला नाही, तर डाव्या विचारसरणीची उमेद जिवंत ठेवली.
विशेषतः 2010 नंतरच्या काळात कामगार आणि उपेक्षितांचा विश्वास जपण्याचे आव्हान येचुरी यांनी समर्थपणाने पेलले होते. ‘इंडिया ब्लॉक’च्या बैठकांवर नजर टाकली, तर त्यात येचुरी यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. त्यांचे स्मरण करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, कोणत्याही विचारधारेचा उदय आणि अस्त ही प्रवृत्ती असते. गेल्या काही वर्षांत डाव्यांच्या प्रतिकूल काळात आपली भूमिका, विचारधारा आणि भारतभूमीच्या गरजांभोवती केंद्रित ठेवली पाहिजे, इथल्या मुद्द्यांशी आणि जडणघडणीशी नैसर्गिक संबंध असलेली विचारधाराच अंतिमतः टिकणार आहे, हे त्यांचे नेहमी सांगणे असायचे. येचुरी यांच्यात असणारी जात आणि समाजाची समज आज फार कमी लोकांमध्ये आढळते. त्यांच्यासाठी संघर्ष हा केवळ निवडणूक किंवा सत्तेचा विषय नव्हता, तर विचारधारेची लढाई होती. अशी लढाई एक-दोन निवडणुकांतील जय-पराजयाने संपत नाही. त्यामुळेच निवडणूक निकालानंतर ते नेहमी म्हणायचे, ‘अरे कॉम—ेड, निवडणुकाच तर हारलोय, उमेद हारलेलो नाही. जिद्द, उमेद कायम ठेवा, निवडणुका परत येतीलच.’ अशा या संघर्षशील कॉम्रेडना अखेरचा लाल सलाम!