रंजले, गांजलेल्या विषयींचा कळवळा आणि तो तितक्याच समर्थपणे प्रकट करणे खरे तर आपल्याच भावविश्वाशी ते समरसून गेलेे होते. महादेव मोरे यांच्या बाबतीत ‘माझा न मी राहिलो’ अशी त्यांची भूमिका. सीमाभाग जसा महाराष्ट्राच्या संस्कृतीपासूनउपेक्षित राहिला, अशीच उपेक्षा या लेखकाच्या वाट्याला आली; पण त्यांच्या साहित्याने मात्र ‘सीमा’ ओलांडली. मराठी भाषेला अभिजात दर्जा केव्हा मिळेल तेव्हा मिळेल; पण साहित्य आणि त्यातील अभिजातपण हे मोरे यांनी टिकविले.
मराठी साहित्यविश्वातील एक सिद्धहस्त लेखक महादेव मोरे हे निवर्तले. लेखक लौकिकार्थाने जातो; पण तो त्यांच्या कृतींनी अमर राहत असतो. मोरे यांना मी सिद्धहस्त लेखक म्हणालो; पण तसे ते शेवटपर्यंत उपेक्षिले गेले. मराठी साहित्य दरबारात त्यांचे स्थान काय, हा विचार जेव्हा मी करतो, तेव्हा ही उपेक्षा मनाला खटकते. मोरे यांच्या बाबतीत लेखकाचा निवास, त्याचा परिसर, मिरविणे असे काही नाही. केवळ पिठाच्या गिरणीत रात्रंदिवस राबणारा हा लेखक. गिरणीचा व्यवसाय पोटापाण्यासाठी केला; पण व—त मात्र अभिव्यक्तीचे. ते निष्ठेने स्वीकारले होते. येणारे-जाणारे पुण्या-मुंबईचे मोठे लेखक, समीक्षक त्यांना पिठाच्या गिरणीत भेटायचे. कौतुकाचे बोल ऐकविणार. हे चाललेले; पण लिखाणात मोरे यांनी कधीच खंड पडू दिला नाही.
छोटी-मोठी संमेलने, अध्यक्षपद, वक्ता म्हणून हजेरी ते लावायचे. बोलताना मात्र वेळेचे भान त्यांना कधीच राहायचे नाही. अतिशय प्रांजळपणाणे असणारे बोलणे, राबणं आहेच. कष्टाचं जगणं आहेच; पण तक्रार नाही. जीवनाचा एवढ्या तन्मयतेने स्वीकार करणारा हा एक व—तस्थ लेखक. आपल्या साहित्यात परिघाबाहेरचे जग त्यांनी रेखाटले. टर्नर, फिटर वारांगना, स्त्री कामगार हेच त्यांचे विषय. त्यांचे चौदा कथासंग्रह, अठरा कादंबर्या, ललित गद्य, रविवार पुरवणीतून लिखाण असे विविध स्वरुपाचे लेखन त्यांनी केले. ‘नवयुग’, ‘किर्लोस्कर’, ‘गावकरी’ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा स्पर्धांतही त्यांना पारितोषिके मिळाली. ‘चिताक’ आणि ‘चेहर्यामागचे चेहरे’ या संग्रहांना राज्य पुरस्कार मिळाला, तर 2007 मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिकेच्या जीवनगौरव पुरस्कारांनी त्यांना गौरविले. ‘झोंबडं’ ही 1990 मधील सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी ठरली. ‘थ—ील्स’ यासारखी पुस्तकेही वाचकप्रिय ठरली. शिवाजी विद्यापीठ मराठी विभागात त्यांची घेतलेली प्रकट मुलाखत खूप गाजली होती.
आपल्याकडे तथाकथित रसिक, समीक्षक यांंचे होणारे दुर्लक्ष त्यांनी कधी बोलून दाखविले नाही; पण ते आमच्यासारख्या वाचकांना जाणवायचे. एक गंमतीदार प्रसंग त्यांनी सांगितलेला बरेच काही सांगून जातो, तो म्हणजे, एका व्याख्यानासाठी ते गेलेले. व्याख्यान संपले. रात्री त्यांना जेवण दिले. ते जेवले आणि त्यांना समजले की, ते जेवण एका श्राद्धाचे जेवण होते. सर्वांसाठी त्यातच त्यांची सोय. हे ते सांगणार आणि खळखळून हसणार. मोरे यांच्या कथा-कांदबर्यांमधील अनुभवविश्व खूप वेगळे आहे.
स्वाभिमानी असंख्य महिलांचे चित्रणही मोरे यांच्या साहित्यात अधोरेखित झालेले दिसते. आयुष्याच्या अखेरपर्यंत मोरे सर्वसामान्य माणसांशी बोलत राहिले. करुणार्तपणे माणसांना समजून घेत राहिले. अशा माणसांच्या दुःखांना, व्यथा-वेदनांना त्यांनी साहित्याच्या माध्यमातून वाट करून दिली. पिठाच्या गिरणीत काम करता-करता त्यांचे लेखन अव्याहत सुरू असायचे. पांढरपेशात वावरताना मला चुकल्यागत वाटते आणि दलित, पददलितांत गोतावळ्यात आल्यासारखं मला वाटते, असे ते नेहमी म्हणायचे. एक नम्र आणि निष्ठेने जगणारा, जगण्यावरचे प्रेमच आपल्या लेखणीतून प्रकट करणारा एक मनस्वी, संवेदनशील कलावंत म्हणजे महादेव मोरे. काही वर्षापूर्वी निपाणीचे तत्कालीन आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने त्यांना घरासाठी दोन लाख मिळाले. पत्नीच्या निधनाने ते थोडेफार खचल्याचे वाटत होते. कुणापुढे पैशासाठी कधीच हात हात पसरला नाही. सारे काही मूकपणाने हसत हसत सहन केले.