Shridhar Vembu | श्रीधर वेंबू

आज डिजिटल महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार्‍या भारताच्या या यशोगाथेमागे अनेक दूरदर्शी टेक लीडर्सचे परिश्रम आहे.
Shridhar Vembu
श्रीधर वेंबू Pudhari Photo
Published on
Updated on

तानाजी खोत

आज डिजिटल महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार्‍या भारताच्या या यशोगाथेमागे अनेक दूरदर्शी टेक लीडर्सचे परिश्रम आहे. झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक श्रीधर वेंबू हे त्यापैकीच एक. तमिळनाडूच्या तेंकासी या छोट्या शहरात सायकलवर फिरताना दिसणार्‍या या माणसाने अमेरिकेच्या बड्या टेक दिग्गजांना आव्हान दिले आहे. अलीकडेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या कामकाज व्हिसा शुल्कात मोठी वाढ केली. यावर वेंबू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ते चर्चेत आले. एच-1बी व्हिसा शुल्कवाढ हे एक संकट नाही, तर ती एक संधी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात की, मी माझ्या सिंधी मित्रांकडून ऐकलेय, फाळणीच्या वेळी सिंधी लोक सर्व काही सोडून भारतात आले. नव्याने सुरुवात केली आणि कष्टातून यशस्वी झाले. हा निर्णयही तुमच्यासाठी असाच टर्निंग पॉईंट आहे. यामुळे घाबरून जाऊ नका. निर्णय घ्या आणि भारतात या, पुन्हा सुरुवात करा, कदाचित पाच वर्षे लागतील; पण तुम्ही अधिक मजबूत व्हाल.

वेंबू कुणी राजकीय नेते नाहीत. त्यामुळे ते हवेत बोलत नाहीत. त्यांनी स्वतः अमेरिकेतील आकर्षक करिअर नाकारून जन्मभूमीलाच कर्मभूमी मानले. कष्टातून स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले. तामिळनाडूच्या ग्रामीण भागात जागतिक कंपन्यांना आव्हान देणारा भारतीय बँ्रड उभा केला. त्यामुळे हे अनुभवाचे बोल आहेत.

Shridhar Vembu
IIT Bombay AI model: पूरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या इमारती दाखवा; बोली भाषेत हा प्रश्न विचारा, उपग्रह प्रतिमेत उत्तर मिळवा

आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि नंतर प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच.डी. संपादन केलेले वेंबू हे मूळचे तामिळनाडूचे. अमेरिकेत क्वालकॉममध्ये मोठ्या पगाराची नोकरी, जागतिक पटलावर करिअरची संधी, हे सगळं नाकारून ते तामिळनाडूतील तेंकासी या खेडेवजा शहरात आले. तिथे झोहोची स्थापना केली. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान केवळ महानगरांतूनच निर्माण होत नाही, तर खेड्यातूनही जगाला दिशा देता येते, हे त्यांनी कर्तृत्वाने सिद्ध केले.

20 वर्षे गाजावाजा न करता ते शांतपणे काम करत आहेत. यातून त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि सेल्सफोर्ससारख्या दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करणारे व्यावसायिक अ‍ॅप्लिकेशन्स तयार केले आणि संपूर्ण जगभर ते उपलब्ध केले. सीआरएम, वित्तीय साधने, मानव संसाधन व्यवस्थापन, आयटी सोल्युशन, ऑटोमेशन अशा विविध क्षेत्रांत झोहोचा विस्तार असून 60 देशात त्यांचे 10 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.

त्यांनी अलीकडेच आणलेले ‘अरट्टाई’ हे मेसेजिंग अ‍ॅप स्वदेशी आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म म्हणून चर्चेत आले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी झोहोची उत्पादने वापरत असल्याचे जाहीर करताच अराट्टाई अ‍ॅप ट्रेंडिंगमध्ये आले. लाखो भारतीयांनी ‘अरट्टाई’ डाऊनलोड केले. डाऊनलोडची संख्या रोज वाढत आहे. झोहोचे अत्याधुनिक कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट (सीआरएम) सोल्युशन्सवर अनेक जागतिक कंपन्यांचा विश्वास आहे. अमेरिकन कंपन्यांना चीनचे दरवाजे बंद असताना झोहोने चीनसह इतरही अनेक देशांचा विश्वास संपादन केला. वेंबू यांच्या प्रेरणेतून एक सुरुवात झाली आहे. त्याचे चांगले परिणाम येत्या काळात दिसतील अशी अपेक्षा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news