

मुरलीधर कुलकर्णी
ज्येष्ठ अभिनेते सतीश रविलाल शाह यांचे 25 ऑक्टोबर रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. पडद्यावर सहजसुंदर आणि अचूक कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा हरहुन्नरी कलाकार आता केवळ आठवणीत राहिला आहे. सतीश शाह यांचा जन्म 25 जून 1951 रोजी मुंबईत झाला. ते मूळचे गुजरातमधील कच्छ येथील मांडवीचे रहिवासी होते. कौटुंबिक पार्श्वभूमी मध्यमवर्गीय असली तरी त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती.
शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अभिनयाबरोबरच क्रिकेट आणि बेसबॉल या खेळांमध्येही ते प्रसिद्ध होते. पण, शाळेतील एका नाटकात मिळालेल्या स्टँडिंग ओव्हेशनमुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पूर्ण केले आणि त्यानंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या प्रतिष्ठित संस्थेतून अभिनयाचे औपचारिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर, सतीश शाह यांनी 1970 च्या दशकात नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.
1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या अरविंद देसाई की ‘अजब दास्तान’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, त्यांना खरी ओळख 1983 मध्ये रुपेरी पडद्यावर आलेल्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटामधील डीमेलो या भूमिकेतून मिळाली. याच काळात त्यांनी दूरचित्रवाणीच्या दुनियेतही पाऊल ठेवले. 1984 मध्ये आलेल्या ‘ये जो है जिंदगी’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी तब्बल 55 हून अधिक एपिसोडमध्ये 55 वेगवेगळी पात्रे साकारून एक आगळावेगळा विक्रमच प्रस्थापित केला होता. दूरचित्रवाणी मालिकांमध्ये ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेतील श्रीमंत, पण मिश्किल स्वभावाच्या इंद्रवदन साराभाई या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आणि ते घरोघरी पोहोचले.
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी सुमारे 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘जाने भी दो यारो’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘हम साथ साथ हैं’, ‘मै हूं ना’, ‘कभी हा कभी ना’, ‘मालामाल वीकली’, ‘विक्रम वेधा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी सचिन पिळगावकर यांचा मराठी चित्रपट ‘गंमत जंमत’मध्येही काम केले होते. त्यांच्या सहज अभिनयामुळे आणि विनोदी शैलीमुळे ते कॉमेडी शो कॉमेडी सर्कसमध्ये जज म्हणूनही दिसले होते. सतीश शाह यांनी 1972 मध्ये फॅशन डिझायनर मधु शाह यांच्याशी विवाह केला.
सतीश शाह यांना चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांची एक्झिट ही मनोरंजन क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या मनमोकळ्या हास्याची आणि दमदार अभिनयाची आठवण प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहील यात शंका नाही.