आज राखी पौर्णिमा सणानिमित्त राज्यभर मोठ्या प्रमाणात चहेल पहेल सुरू आहे. आपल्या बहिणीकडून ओवाळून घेण्यासाठी भाऊ मंडळी धावाधाव करत आहेत. आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवळण्यासाठी बहिणी माहेरच्या दिशेने प्रवास करत आहेत. गावातील सर्व सख्ख्या, चुलत बहिणी एकत्र येऊन आपल्या सर्व सख्ख्या, चुलत भावांना राख्या बांधत असतात. प्रत्यक्ष आयुष्यात सख्खे-चुलत असे नाते फारसे नसते. याचे कारण म्हणजे सख्खे भाऊ-बहिणी आणि चुलत भाऊ-बहिणी लहानाचे मोठे होताना एकत्रच वाढलेले असतात.
यावर्षी महाराष्ट्रातील लाखो बहिणींना तातडीने ओवाळणी टाकणारे तीन नवे भाऊ मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवाभाऊ आणि अजित दादा. या तीन भावांनी यावर्षी राखी पौर्णिमेला बहिणींना भरघोस ओवाळणी टाकली आहे. ही ओवाळणी टाकताना त्यांनी बहिणींना सावत्र भावांपासून सावध राहण्याची सूचनापण केली आहे.
राजकारण आणि सत्ताकारण याच्या चाली वेगळ्या असतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजना तातडीने लागू करून राखी पौर्णिमेच्या आधी बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्कमपण जमा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे आता राजकारणाच्या सारीपाटावरील हुकुमाचा मोहरा ठरलेला असून शिंदे यांनी तो पटाच्या मध्यभागी आणून ठेवला आहे. या योजनेची सुरुवात करताना नुकतेच पुण्यात या तिन्ही भावांना राखी बांधण्यासाठी बहिणींची जी झुंबड उडाली होती, ती सुखावणारी होती. राजकारणी लोकांवरचा जनतेचा विश्वास कमी होत असतानाच्या आजच्या काळात बहीण भावाच्या निर्माण झालेल्या नात्यामुळे का होईना तो द़ृढ व्हावा हीच जनतेची इच्छा आणि अपेक्षा असते. तिकडे दोन चुलत भाऊ आपसामध्ये निकराची लढाई लढण्यास सज्ज झाले आहेत. मशाल आणि इंजिन समोरासमोर उभे आहेत आणि कुणाची ऊर्जा जास्त आहे, यासाठी त्यांची खडाखडी सुरू आहे. खडाखडी म्हणजे प्रत्यक्ष कुस्तीला सुरुवात होण्यापूर्वी दोन मल्ल एकमेकांचा अंदाज घेत भिडत असतात याला खडाखडी असे म्हणतात. एकंदरीत यावर्षी महिलावर्गाची मात्र चंगळ झालेली आहे. रक्ताचा भाऊ ओवळण्यासाठी नाही आला, तरी बँक खात्यात पैसे येऊन पडत आहेत. मुख्यमंत्री महोदयांकडून आलेले पैसे पाहून हर्षभरीत झालेल्या महिलांचे फोटो जागोजागी दिसत आहेत. त्यात पुन्हा एकदम दोन महिन्यांचे पैसे मिळाल्यामुळे चक्क तीन हजार रुपये अकाऊंटमध्ये जमा झाल्यामुळे या महिला भारावून जाणे साहजिक आहे. महिना दीड हजार रुपये हे कुणीही काहीही म्हटले, तरी सर्वसामान्य महिलेसाठी मोठेच आहेत यात शंका नाही. दिवसातले 12 तास सतत कष्ट करून ज्या महिला जेमतेम रोज दोनशे रुपये कमावतात, त्यांच्यासाठी महिना दीड हजार रुपये मिळणे ही मोलाची गोष्ट आहे, हे निश्चित! आपण सामान्य लोकांसाठी राजकारण हा गहन खेळ असतो आणि त्यात आपण न पडलेले बरे असते. महिलांनी भावांबरोबर आणि भावांनी बहिणींबरोबर असणारे ऋणानुबंध या सणाच्या निमित्ताने मजबूत केले पाहिजेत. एकाच रक्ताच्या नात्याची माणसे आज पृथ्वीतलावर कमी होत चालली आहेत. बहीण आणि भाऊ हे जिव्हाळ्याचे नाते आहे. या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी भावांनी आणि बहिणींनी घेतली पाहिजे.