काय रे दाजिबा, कार्यालयाच्या बाहेर एवढी कशाची गर्दी आहे?
काही नाही साहेब, आपलेच कार्यकर्ते आहेत. तिकीट मागण्यासाठी सकाळपासून बसलेले आहेत.
अरे पण विधानसभा निवडणुकीला अजून भरपूर वेळ आहे ना? आतापासून हे काय लावले आहे? आणि हे काय? अरे, पाच-सहाशे लोकांची रांग दिसते आहे. आपल्या पक्षाचे एवढ्या लोकांना तिकीट पाहिजे म्हणजे कमालच आहे. जा, जरा बाहेर जाऊन चौकशी कर. या लोकांना नेमके काय पाहिजे, ते विचारून ये.
मी सगळी चौकशी करून आलोय साहेब. आपल्या पक्षाच्या हायकमांडने तुम्हाला तिकीट वाटपाचे अधिकार दिल्यापासून रोज हजार एक लोक तुम्हाला भेटायला येऊन जातात. तुम्ही आतमध्ये झोपलेले असता; पण आम्ही लोकांना सांगतो की, तुम्ही बाहेरगावी गेला आहात म्हणून. निराश होऊन काही लोक त्यांच्या गावी परत जातात. हे सगळे आपल्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, असे अजिबात समजू नका. तुमची भेट झाली नाही म्हटले की, पलीकडच्या गल्लीत दुसर्या पक्षाचे कार्यालय आहे. हे लोक तिथे जाऊन रांगेत उभा राहतात. जे मिळेल ते आणि कोणते का होईना, पण तिकीट पदरात पाडून घ्यायचे यासाठी धडपड सुरू आहे.
अरे, काही विचार? काही तत्त्वे, काही परंपरा असतात की नाही? आपल्या विचाराला सुसंगत अशा पक्षाचे तिकीट आपण मागितले पाहिजे. आपले विचार डावे आणि आपण मागतो तिकीट उजव्याकडे, असे चालणार नाही. राजकारणात कशाचा कशाला धरबंद उरलेला नाही. कोणीही उठतो आणि कुठेही निघून जातो, याला राजकारण म्हणत असतील, तर मग जनतेची दया यायला सुरुवात होते.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब. असाच प्रश्न मी एका कार्यकर्त्याला विचारला होता. त्याला पण आपल्या मतदारसंघातून तिकीट पाहिजे आहे. तो तुमच्याबद्दलच भलते सलते असे बोलला. तो म्हणाला, साहेबांनी आतापर्यंत चार-पाच पक्ष बदलले, तसे आम्ही चार-पाच बदलले तर काय फरक पडतो?
पुरे-पुरे, आमच्या पक्षांतराचा विषय काढू नकोस. त्या-त्या वेळची काळाची मागणी असते, त्याप्रमाणे आम्ही वागत गेलो. आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षात आम्ही जोपर्यंत असतो, तोपर्यंत निष्ठावंत असतो. ज्या दिवशी तो पक्ष बदलला तर पक्ष बदलून आम्ही ज्या पक्षात जातो, त्या पक्षाशी एकनिष्ठ असतो. अर्थात, आमचे कार्यकर्ते असेच असणार. बरे, ते जाऊदे. कार्यकर्त्यांच्या चहापाण्याची काही व्यवस्था केलीस की नाही?
साहेब, कार्यकर्ते गावाकडून निघतात तेव्हा त्यांचे पाच पंचवीस कार्यकर्ते घेऊन निघत असतात. त्यांच्या सगळ्या व्यवस्था त्यांनी स्वतःच केलेल्या असतात. ते येतात, हॉटेलमध्ये राहतात आणि सकाळ झाल्याबरोबर आपल्या घरी येऊन टपकतात. पक्षाने तुम्हाला उमेदवारांसाठी चाचपणी करायला सांगितले आहे.
हे बघ दाजिबा, मुलाखती वगैरे फार्स असतो. ज्याला मिळायचे त्याला तिकीट मिळत असते. तू एक काम कर, या सगळ्यांना एक फॉर्म भरायला सांग. त्या फॉर्ममध्ये सगळ्यात वर नाव, गाव, पत्ता, लिहायला सांग. सध्याचा असलेला त्यांचा पक्ष कोणता, ते लिहायला सांग. तिकीट कशासाठी पाहिजे, असे अजिबात विचारू नकोस.