गत दहा वर्षांत रस्त्यांची परिस्थिती चांगल्यापैकी सुधारली आहे. एक्सप्रेस वे, मोठमोठे हायवे, चारपदरी, सहापदरी राज्यमार्ग या माध्यमांतून जनतेचा प्रवास सुखाचा होत चाललेला आहे. या सुखाच्या बदल्यात तुम्हाला काय करावे लागत असेल, तर टोल द्यावा लागतो. वीस-पंचवीस किलोमीटर गेल्याबरोबर लागणारे टोलनाके चालकांच्या आणि मालकांच्या कपाळावर आठ्या निर्माण करत असतात. टोलनाके वेळोवेळी घडणार्या घटनांमुळे नेहमी चर्चेत असतात. टोलनाके चालवणारी मंडळी ही मूलतः कंत्राटदार असतात आणि त्यांच्या हाताखालची मंडळी ही चहापेक्षा किटली गरम, अशा प्रकारची असतात. सर्वसामान्य लोकांना वेठीला धरणे, उद्धट वर्तणूक आणि आरेरावी हे त्यांचे जन्मदत्त कर्तव्य असते. हाच प्रयोग चुकून एखाद्या बड्या नेत्यावर होतो आणि टोलनाक्यावरील कर्मचार्यांच्या कानाखाली आवाज पण निघत असतो. टोल बंद करण्यासाठी आंदोलने होतात आणि अशावेळी खळ्ळखटॅक असे आवाजही घुमत असतात.
टोलनाक्यावर भल्या मोठ्या रांगा असतील, तर वाहनचालकांना तिष्ठत बसावे लागते आणि त्यांचा वेळ जातो. सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या वाहनाला टोलनाक्यावर किती वेळ लागावा, यासाठी निर्बंध घालून दिले आहेत, जेणेकरून ही प्रक्रिया सुलभ-सोपी आणि वेगवान झाली पाहिजे. पूर्वी नगदी भरणे हा एकच प्रकार टोलनाक्यांवर उपलब्ध होता; पण याला पर्याय म्हणून फास्टटॅग नावाचे प्रकरण पुढे आले. तुमच्या वाहनाच्या समोरील काचेवर फास्टटॅग चिटकवलेले असते आणि टोलनाक्यावरील कॅमेर्यातून त्याची प्रतिमा टिपून तुमच्या खात्यामधून टोल वजा केला जातो. या यंत्रणेमध्ये बरेचदा दोष निर्माण होतो आणि वाहन चालक अडकून पडतात. टोलनाक्यांवरील कर्मचारी ढिम्म बसून जे काय होईल ते पाहू, असे निवांत असतात आणि त्याच वेळेला वाहनचालक मात्र हातघाईला आलेला असतो. त्याला लवकर पुढे जायचे असते; पण त्याच्या वाहनापुढे लागलेला आडवा दांडा काही वर व्हायला तयार नसतो. आता यावर उपाय म्हणून आणखी नवीन यंत्रणा येऊ घातली आहे.
तुमचे वाहन विशिष्ट अंतर चालल्याबरोबर उपग्रहाच्या माध्यमातून त्या गाडीचा नंबर, किती अंतर कापले आणि किती टोल कापायचा, हे ठरवले जाणार आहे. याचा अर्थ इथे टोलनाके नसतीलच. तुम्ही प्रवासाला लागा आणि खटाखट खटाखट तुमच्या अकाऊंटमधून टोल वजा केला जाईल. आपल्या देशामध्ये सर्व नागरिकांना मुक्त स्वातंत्र्य आहे तसेच त्यांच्या व्यक्तिगत माहितीवर कोणीही घाला घालू शकत नाही, अशी तरतूद पण आहे. उपग्रहाच्या माध्यमातून टोल वसूल करण्याच्या यंत्रणेवर बर्याच लोकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, आम्ही किंवा आमचे वाहन कुठे जाते, हे आता लपून राहणार नाही, तर तमाम जनतेला ते माहीत होईल. आमची ‘प्रायव्हसी’ धोक्यात येत आहे, असे म्हणणार्या जनतेला आमचा सवाल आहे की, ज्या ठिकाणी काही भानगडी करण्यासाठी तुम्ही जात आहात, मुळात तिथे जाणेच बंद करा ना! ‘प्रायव्हसी’ इतकी महत्त्वाची वाटत असेल, तर स्वतःचे वाहन न नेता भाड्याच्या वाहनाने जात जा. जिथे सात्त्विकता असते, तिथे ‘प्रायव्हसी’ची गरज नसते, असे आमचे मत आहे.