भारतीय खेळाडूंचा पदकांचा पाऊस अद्याप थांबलेला नाही. पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेच्या बातम्या देशाच्या गौरवात भर घालणार्या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी एवढ्या संख्येने भारताच्या पदरात पदके पडलेली नव्हती. अर्थात हा मुद्दा केवळ देशाच्या दिव्यांग खेळाडूंकडून प्रस्थापित केल्या जाणार्या विक्रमाचा नसून पॅरिस पॅरालिम्पिकची पदकांची यादी पाहिली तर ही भारतीयांची बदलणारी मानसिकता आणि द़ृष्टिकोन याचा एक आदर्श नमुना म्हणावा लागेल.
विशेष खेळाडूंच्या यशाने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावून गेले आहेत. पदक जिंकणार्या खेळाडूंशी फोनवरून चर्चा करताना त्यांनी ‘तुम्ही मिळवलेल्या यशाने देशातील युवा पिढी प्रेरणा घेईल’, असा आशावाद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याला आणखी एक गोष्ट जोडता येईल आणि ती म्हणजे या कामगिरीने देशातील तरुणाईत आणि दिव्यांग खेळाडूंत नव्याने आत्मविश्वासाची ऊर्जा भरली जाईल आणि वास्तविक ती गरज अनेक काळापासून व्यक्त केली जात होती. इंग्रजी भाषेत दिव्यांगांसाठी पूर्वी डिसॅबल किंवा अपंग या शब्दांचा वापर केला जात होता. परंतु आता शब्दावलीत बदल केला आहे. त्याजागी स्पेशल अॅबल्टड पर्सन म्हणजे विशेष क्षमतेची व्यक्ती हा शब्द आला. खरोखरच पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी आपण विशेष क्षमतेचे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याचे सिद्ध करून दाखवले.
खर्या अर्थाने ते एका अशा ठिकाणाहून पॅरिसला गेले होते की, तेथे खेळाडूंना पायाभूत सुविधा, पुरेसे पाठबळ आणि सोयी दिल्या जात नसल्याची ओरड होते. कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळानंतर देशातील वर्तमानपत्रांत वैचारिक लेखातील शेवटचा मुद्द्यांत भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलेली असते आणि सुविधा नसल्याबद्दल सरकारवर खापर फोडले जाते. सध्या क्रिकेटशिवाय अन्य कोणत्याच खेळाकडे लक्ष दिले जात नसल्याचे वाटत असतानाा दिव्यांग खेळाडूंनी पॅरिसमध्ये धमाकेदार कामगिरी करत दररोज एक तरी पदक देशाला जिंकून दिले आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारात आपल्या खेळाडूंनी बाजी मारली. नेमबाजी, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, ज्यूदो असे कितीतरी प्रकार सांगता येतील. महिला खेळाडूही जिंकत आहेत आणि त्याजोडीला पुरुषही मैदान मारत आहेत.
पॅरिसच्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण पदकांसह 25 पदके जिंकली आणि भारत सध्या 17 व्या स्थानावर आहे. अर्थात या क्रमवारीवर समाधान मानने गैर ठरेल. कारण भारताला आणखी वरचे स्थान मिळण्याची आशा आहे. पण यंदाच्या पदक तालिकेत चांगली कामगिरी राहिली आहेे. टोकिओच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने 19 पदके जिंकली आणि 24 वे स्थान मिळवले. चार वर्षांतील पदकांतील फरक विलक्षण आहे. एकप्रकारे भारताने सहा स्थानाने आघाडी घेतली आहे.
भारताने 2024 मध्ये मिळवलेले यश दमदार मानले जात आहे. परंतु याच पदक तालिकेची तुलना नुकत्याच संपलेल्या ऑलिम्पिकशी केली तर आपली कामगिरी मागील स्पर्धेच्या तुलनेत जेमतेम राहिली. यावेळी भारताने सहा पदके जिंकली आणि 71 व्या स्थानी राहिला. मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत ही खराबच कामगिरी आहे. तेव्हा एक सुवर्णासह सात पदके जिंकले आणि त्यावेळी 48 वे स्थान होते. म्हणजे यावेळी पदक तालिकेत भारताची 23 स्थानांनी घसरण झाली. दुसरीकडे भारताच्या विशेष खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अधिकाधिक विजयाची नोंद केली. अपेक्षेपेक्षा अधिक पदक आपले विशेष खेळाडू जिंकत आहेत. अशावेळी सामान्य खेळाडूंना आपल्या कामगिरीत सुधारणा का करता येत नाही, हा प्रश्न आहे. ते याच वेगाने वाटचाल का करत नाहीत? यावर क्रीडा संघाने, संघटनांनी गांभीर्याने विचार करायला हवा. विशेष खेळाडूंनी मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद असून त्यांचा गौरव करावा तेवढा कमीच आहे असे म्हणावे लागेल.