तुम्ही निवांतपणे घरामध्ये बसलेले असता. तुमच्या फोनची रिंग वाजते. अनोळखी नंबर असल्यामुळे तुम्ही संभ्रमात पडता आणि मग तो फोन उचलता. पलीकडून मंजुळ स्वरामध्ये स्त्रीचा आवाज ऐकू येतो. तुमचे नाव घेऊन ती महिला ‘क्या मेरी आपसे बात हो रही है?’ असे विचारते. आपण हो म्हणतो आणि त्यानंतर सुरू होतो ऑनलाईन गंडा बांधण्याचा प्रकार. तुमची एक एलआयसी पॉलिसी तुम्ही अर्धवट सोडली होती. तिचे तुम्हाला तीन लाख रुपये मिळतील. ते पैसे लगेच तुमच्या अकाऊंटला जमा केले जातील, असेही सांगितले जाते. त्यासाठी तुमचा अकाऊंट नंबर विचारला जातो. एटीएम कार्डचा नंबर विचारला जातो. त्याचा पिन पण विचारला जातो आणि अत्यंत भोळेपणाने काहीतरी पैसे मिळतील या लोभाने तुम्ही हे सर्व दिल्यानंतर अवघ्या काही क्षणांत तुमच्या खात्यामधून जवळपास सर्व रक्कम लंपास केली जाते. यालाच ऑनलाईन गंडा असे म्हणतात.
कधी अचानक तुमच्या व्हॉटस्अॅपवर किंवा मोबाईलमध्ये मेसेज येतो की, तुमचे या महिन्याचे लाईट बिल भरायचे राहिले आहे. आज संध्याकाळपर्यंत ते भरले नाही, तर तुमची लाईट कट केली जाईल. सोबत एक संपर्कासाठी नंबर दिलेला असतो. त्यावर तत्काळ संपर्क करा, अशा सूचना असतात. तुम्हाला असे वाटते की, हा मेसेज एमएसईबीकडून आलेला आहे की काय? आपले सगळे कुटुंब अंधारात बसेल या भीतीने तुम्ही लगेच संपर्क करता आणि या जाळ्यामध्ये प्रवेश करता. एकदा का तुम्ही जाळ्यात प्रवेश अडकला, की मग त्यांच्यासाठी सर्व काही सोपे असते. तुमच्याकडून तुमची सर्व माहिती घेऊन तुमच्या अकाऊंटमधून पैसे लांबवले जातात. असंख्य वेळेला सूचना देऊनही लोक का सुधारत नाहीत, हे समजायला मार्ग नाही. बँका वारंवार जाहिराती देत असतात की, कृपया आपला एटीएम कार्ड नंबर आणि पिन कोणालाही शेअर करू नका. तरी पण हा बावळटपणा देशात दिसून येतच आहे. कुणाचे दीड लाख, कुणाचे पाच लाख, कोणाचे सात लाख अशी जवळपास 177 कोटी रुपयांची रक्कम चोरट्यांनी या वर्षात लांबवली आहे. हे चोरटे कोणाला दिसत नाहीत. त्यांची चोरी कोणत्याही कॅमेर्यामध्ये कैद होत नाही. ते कुठून काम करतात, याची पण तुम्हाला कल्पना नसते; परंतु बरोबर तुम्हाला जाळ्यात पकडून तुमचे पाकीट मारण्याचा प्रकार आजकाल खूप होत आहे.
आजकाल घरामध्ये पैसे कोणी ठेवत नाही. दागिने वगैरे लॉकरमध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे जे काय पैसे आहेत ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि मोबाईल फोनमध्येच असतात. तुम्हीच स्वतः जर पिन आणि अकाऊंट नंबर सांगितला, तर पोलीससुद्धा काहीही करू शकत नाहीत. दरोडेखोरी, चोरी, पाकीटमारी अशा प्रकारचे कालबाह्य पद्धतीचे गुन्हे चोरांनी बंद केले असून, हा नवीन सायबर क्राईम नावाचा प्रकार सुरू केलेला आहे. तुमची फसवणूक होऊ नये म्हणून ही कळकळीची विनंती आहे की, फोनवर एखादा पुरुष कितीही नम्रपणे बोलला किंवा एखादी स्त्री कितीही मंजुळ आवाजात बोलली तरी हुरळून जाऊ नका आणि आपला अकाऊंट नंबर, पिन आणि इतर माहिती कृपा करून कुणालाही देऊ नका. या न दिसणार्या शत्रूंपासून आपण सावध राहिले पाहिजे.