

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष
10 ऑक्टोबर हा दिवस जगभर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा होतो. संकटात सापडलेल्या बळीराजाची मानसिक स्थिती समजून घेणे, हाच या दिनाचा खरा उद्देश असला पाहिजे.
प्रा. रणजित तोडकर
महाराष्ट्रातील अतिवृष्टी, महापुरात जवळपास 40 लाख लोकसंख्या प्रभावित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. निसर्गाच्या क्रूर थट्टेने बळीराजा पार कोलमडून गेला असून, त्याला केवळ सरकारी मदतच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक आधाराच्या भक्कम भिंतीची गरज आहे. आर्थिक नुकसानीपेक्षाही मोठे वादळ शेतकर्याच्या मनात घोंघावत आहे. सगळे काही गमावल्याची भावना, कुटुंबासमोर पराभूत झाल्याची भावना त्याला आतल्या आत पोखरत आहे. ही मानसिक पोकळी वेळीच भरून काढणे खूप गरजेचे आहे; अन्यथा त्याचे परिणाम फार गंभीर होऊ शकतात.
संकटानंतर मनात येणार्या विचारांचे आणि भावनांचे वादळ कसे शांत करावे? यासाठी जागतिकस्तरावरील आरोग्यतज्ज्ञांनी काही सोपे मार्ग सुचविलेले आहेत. प्रचंड तणावाच्या काळात नकारात्मक विचारांशी भांडण करून चालत नाही, तर त्यांना सामोरे जाण्याची कला शिकायला हवी. जेव्हा मनात ‘माझे सगळे संपले’ किंवा ‘आता काहीच होऊ शकत नाही,’ असे विचार येतात तेव्हा हे विचार आणखी नैराश्यात घेऊन जातात. यातून सुटण्यासाठी अशा लोकांना वर्तमानात आणणे खूप महत्त्वाचे असते. अशा लोकांना आपण त्यांच्या मनसिकतेतून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतो जसे की, क्षणभर त्यांना थांबवून एक दीर्घ श्वास घ्यायला सांगा व त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पाच गोष्टी शांतपणे निरखून बघण्यास सांगा. या आपल्या लहानशा कृती त्यांच्या मनाला भूतकाळाच्या दुःखातून आणि भविष्याच्या चिंतेतून बाहेर खेचून आणू शकतात.
पूर तुमचे पीक घेऊन गेला असेल; पण तुमची हिंमत, तुमचा स्वाभिमान आणि तुमची ओळख कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एक वडील, एक पती, एक पुत्र आहात. कुटुंबासोबत वेळ घालवा, मुलांशी खेळा, शेजार्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर द्या. या छोट्या कृती शेतकर्याच्या जगण्याला अर्थ देतील.
ही लढाई फक्त शेतकर्याने एकट्याने लढायची नाही. ही संपूर्ण समाजाची परीक्षा आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीवर जाऊन शेतकर्याशी बोलण्याची, त्याचे दुःख वाटून घेण्याची आणि त्याला मानसिक धीर देण्याची नितांत गरज आहे. शहरातील मानसशास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे येऊन या भागांमध्ये सेवा दिली पाहिजे. शासनाने मानसोपचारतज्ज्ञांची आणि समुपदेशकांची पथके या भागांमध्ये पाठवली पाहिजेत.
आता एकही बळीराजा या नैराश्याच्या पुरात वाहून जाता कामा नये, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शहरातल्या नागरिकांनी, व्यापार्यांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनीही पुढे येऊन शक्य ती सर्व मदत करायला हवी. शेतकर्याच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी आज प्रत्येकाने पुढे सरसावले पाहिजे. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येण्याआधीच, समाजाच्या आधाराचा हात त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. सरकार आणि समाज तुमच्या पाठीशी आहेच; पण तुमची खरी ताकद तुमच्या मनगटात आणि तुमच्या मनात आहे. एकमेकांना साथ द्या, धीर सोडू नका. आपण या संकटावर मात करणारच! हे मनोबल वाढवणारे विचार समाजाने शेतकर्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्या भूमीला हिरवळ देणार्या बळीराजाच्या मनातही शांती आणि आनंद फुलविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आणि सरकारने कंबर कसली तरच खर्या अर्थाने जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा होईल.