आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानासाठी अवघा 35 दिवसांचा कालावधी मिळाला आहे. या काळात उमेदवारी अर्ज दाखल करणे, काम पडल्यास माघार घेणे, निवडणूक लढवायची असल्यास चिन्ह मिळवणे, अधिकृत पक्षाकडून असेल, तर एबी फॉर्म मिळवणे आणि याचबरोबर प्रचार सुरू करणे या लगबगीत राजकीय मंडळी व्यस्त असतात. एका दिवसाचे 48 तास का नाहीत, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. साहजिकच सध्या राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या असल्यामुळे दिवसाचा वेळ कमी पडत असल्याने रात्रीचे खेळ वाढत गेलेले आहेत, असे आपल्या लक्षात येईल.
राजकीय नेते मंडळींना निवडणुकांचे नियोजन करणे, प्रचार सभांची आखणी करणे आणि विविध समविचारी किंवा विरोधी विचारांच्या लोकांना भेटण्याची कामे करावी लागतात. समविचारी लोक एकमेकांना दिवसाढवळ्या राजरोस भेटू शकतात; परंतु आपल्या विरोधी विचारांच्या नेत्याशी काही सल्लामसलत करायची असेल, तर रात्रीची वेळ बरी पडते. एक तर या काळात पत्रकार मंडळी डोळ्यात तेल घालून कुठे काय घडत आहे, यावर लक्ष ठेवून असतात. न्यूज चॅनेलच्या पत्रकारांना दर मिनिटाला काही ना काहीतरी ब्रेकिंग न्यूज लागत असते. ‘अमुकतमुक नेते तमुकअमुक नेत्याच्या भेटीला गेले’ हीपण ब्रेकिंग न्यूज होत असते. अशातील काही बातम्या तुम्ही पाहिल्या, तर तुमच्या लक्षात येईल की, दिवसापेक्षा रात्री जास्त घडामोडी घडत आहेत. दिवसभर मुंबईतील नेत्यांना भेटण्यासाठी राज्याच्या विविध मतदारसंघांतील कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची झुंबड असते. साहजिकच गूढ, रम्य अशी शांत रात्र भेटीगाठींना उत्तम असते.
काही भेटीगाठी इतक्या गुप्त ठेवल्या जातात की, नेते दुसर्या नेत्याच्या बंगल्यावर जाताना आपली गाडी, बंदोबस्त इत्यादी काहीही सोबत न घेता एखाद्या साध्या गाडीत डोक्यावर कांबळ म्हणजेच काहीतरी पांघरूण घेऊन जात असतात. रात्रीच्या पत्रकारांची फळीसुद्धा तितकीच तत्पर असते. एखाद्या नेत्याच्या बंगल्यातून गाडी बाहेर पडली की, ते त्याचा पाठलाग करतात आणि नेता कसा तोंड झाकून विरोधी नेत्याला भेटायला गेला, याचे चित्रण करण्याचा प्रयत्न करतात. पत्रकार मंडळींना युरोपमध्ये पापाराझी असे म्हणतात. पापाराझी म्हणजे पार तुमच्या घरापर्यंत कॅमेरा नेण्याचा प्रयत्न करणारे पत्रकार लोक.
अफवा पसरवण्यासाठी रात्रीच्या भेटीगाठी फार महत्त्वाच्या असतात. ‘दोन कट्टर विरोधी पक्षांचे नेते रात्री एकमेकांना भेटले’ ही दिवसभर चालणारी ब्रेकिंग न्यूज असते. यामुळे दिवसापेक्षा रात्रीच्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत, हे तुमच्या लक्षात आले असेल. प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीच्या दोन रात्री या लक्ष्मीअस्त्र वापरण्याच्या असतात. या दिवशी मतदारांना थेट लक्ष्मीदर्शन होत असते. राजकीय कार्यकर्ते या काळात रात्रीचा दिवस करून आपल्या नेत्यासाठी राबत असतात. राज्यातील जनतेला यापुढे रात्रीच्या घडामोडी पाहताना, वाचताना भरपूर मनोरंजन होणार आहे, हे निश्चित! दिवसा प्रचार करण्यावर भर दिला जात असला, तरी खरा प्रचार हा रात्रीस सुरू असतो. या कालावधीत विरोधातील मतदारांना पैशासह अन्य गोष्टींचे आमिष दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न असतो. मतदारही इतके चतूर झाले आहेत की, वाहत्या गंगेत हात धुऊन घेत असतात.