

काय म्हणताय मंडळी, बरे आहात ना? दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली. खरेदी झाली की नाही? आकाश कंदील, रोषणाईच्या माळा दारा-खिडक्यांमध्ये लावल्या की नाही? अहो, करायलाच पाहिजे. सण आहे म्हटलं तर साजरा केलाच पाहिजे. दिवाळी म्हटले की, काय काय तयारी करायची असते. घर सजवायचं असतं. खरी दिवाळी असते चिल्ल्लर गँगची. त्यामुळे त्यांच्यासाठी किल्ला बनवण्यापासून दिवाळीची सुरवात होते. याशिवाय दिवाळी म्हटले की, आठवतात ती नवीन कपड्यांची खरेदी, फटाके, सुगंधी उटणे, फराळाचे पदार्थ, दिवाळी पहाटचे कार्यक्रम, भाऊबीजेची ओवाळणी इत्यादी इत्यादी असे बरेच काही. या सर्वांशिवाय आणखी एक गोष्ट दिवाळीमध्ये लागते म्हणजे लागतेच.
परवा एकाने सोशल मीडियावर लिहिले की, दिवाळीची सगळी खरेदी झाली. नवीन कपडे पण खरेदी केले, तरी पण काहीतरी राहिले आहे, असे वाटत होते. ते काय राहिले आहे ते बराच वेळ समजत नव्हते, आठवत नव्हते. काहीतरी न्यून राहिले आहे, असे वाटत होते, हे नक्की.
शेवटी एकदम डोक्यात प्रकाश पडला. चपला घालून थेट बाजारात गेलो आणि मोती साबण घेऊन आलो. तेव्हा कुठे दिवाळी आल्याचा फील आला. दिवाळी आणि हा साबण हे जणू समीकरणच बनले आहे. हाच तो 70 वर्षांपासून आपल्या देशातील दिवाळी परिपूर्ण करणारा मोती साबण. तुम्ही एरव्ही इतर कंपन्यांचे साबण वापरा; पण दिवाळीला हाच येतो. त्याशिवाय दिवाळी साजरीच होत नाही, अशी काहीशी त्या साबणाविषयी तमाम मराठी लोकांची धारणा झाली आहे. एकदाचा दिवाळीला आणला क पार संक्रांतीपर्यंत पुरत असतो. केवळ दिवाळीच्या काळात तुमच्या आमच्या मनात आणि डोळ्यांसमोर येणारी ही हमखास गोष्ट आहे.
एरव्ही याची कुणी आठवणही काढत नाही. आधी कोणा उद्योजकाने सुरू केलेला हा साबण नंतर टाटांच्या एका मोठ्या कंपनीने विकत घेतला आणि इमानेइतबारे त्याची दरवर्षी विक्री दिवाळीमध्ये होत असते. तुम्हाला प्रश्न पडेल की, एरव्ही या साबणाची फॅक्टरी बंद असते की काय? अजिबात तसे नसते. वर्षभर तयार केलेला साबण एकदाच दिवाळीच्या सणामध्ये पूर्णतः विक्री होतो आणि कारखाना पुन्हा पुढच्या दिवाळीसाठी नवीन साबण तयार करायला सुरुवात करतो. आहे की नाही मार्केटिंगची कमाल? एरव्ही तुम्हाला या साबणाच्या जाहिराती कधीही दिसणार नाहीत. दिवाळी जवळ आली की, या जाहिराती दिसायला लागतात आणि तो यथावकाश तुमच्या घरामध्ये येतो. फार पूर्वी मोठी कुटुंबे असत आणि संपूर्ण कुटुंबीयांमध्ये एकच साबण असे. आता चारजणांचे कुटुंब असले तरी त्या प्रत्येकाचा साबण वेगळा असतो. दिवाळी सण मोठाच्या ऐवजी, मोती साबणाचा गोटा, नाही आनंदाला तोटा, असे म्हणता येऊ शकेल. तर मग मंडळी दिवाळी खरेदीमध्ये काही न्यून उरले आहे, असे वाटत असेल तर चला बाजारात...