सध्या भारतात विमान कंपन्यांना वारंवार धमक्या मिळत असून, त्यामुळे चिंता निर्माण होणे साहजिक आहे. या धमकीसत्रातून भीतीचे आभाळ तयार करायचे आणि प्रवाशांतील असुरक्षिततेची भावना हेरून थेट या विमान कंपन्यांच्या अर्थकारणालाच धक्का द्यायचा असा हा डाव आहे. गेल्या आठ दिवसांत 90 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या आल्या आहेत. यामध्ये इंडिगो, एअर इंडिया व विस्ताराची प्रत्येकी 20 आणि आकास एअरलाईन्सची 25 अशी एकूण 85 विमाने उडवून देण्याचा इशारा देण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत आठ प्राथमिक गुन्ह्यांची नोंद झाली. 16 ऑक्टोबरला आकासच्या विमानात 180 प्रवासी होते व ते साहजिकच धास्तावले होते. समाजमाध्यमांचा दुरुपयोग करून असल्या गोष्टी केल्या जात आहेत. धमक्या देणारे लोक संबंधित विमान कंपनी आणि पोलिसांच्या हँडललाही टॅग करतात. अशावेळी विमानांचे इमर्जन्सी लँडिंगही करणे भाग पडते. ज्यावेळी अशा धमक्या दिल्या जातात, तेव्हा प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण होते. कोणी वात्रटपणा म्हणून, कोणी उद्योग नाही म्हणून किंवा यंत्रणांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने अशी कृत्ये करत असतात; पण या प्रत्येक धमकीची गंभीरपणे दखल घेणे तर भाग असते. शेकडो प्रवासी आणि विमान कर्मचार्यांची धावपळ होते. विमान प्रवास लांबल्यामुळे त्यांची अडचणही होते. या सर्व धमक्या बनावट असल्याचे तपासानंतर निष्पन्न झाले असले, तरीही सुरक्षा यंत्रणांवर ताण पडलाच.
आता एका प्रकरणात छत्तीसगडमधील बड्या व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्याने मित्राला अडकवण्यासाठी त्याच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाऊंट तयार करून, चार फ्लाईटस्मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. शेवटी या मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवावे लागले. ई-मेल हॅकिंगमध्ये अनेक लहान मुले निष्णात असतात आणि त्यापैकी काहीजण या उपद्व्यापात गुंतलेली असतात. बनावट धमक्यांचा विमान कंपन्यांना मोठाच भुर्दंड पडत असतो. तत्काळ लँडिंग करण्यासाठी विमानाला इंधन सोडावे लागते, ज्याचा खर्च मोठा असतो. फ्लाईट प्लॅनमध्ये नसलेल्या विमानतळावर लँडिंग करावे लागल्यास विमान कंपन्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागते. तसेच प्रवाशांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था करावी लागते. दीर्घ विलंबामुळे क्रू बदलावा लागतो आणि ऑपरेशनल खर्च वाढतो. उड्डाण न करता विमाने विमानतळावर रोखून ठेवण्यामुळे एकेका वेळी तीन-तीन कोटी रुपयांचे नुकसान होते.
काही वर्षांपासून भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. 2023 मध्ये भारतात देशांतर्गत विमान उड्डाणांमधून 15 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. भारतातील 33 आंतरराष्ट्रीय विमानतळांसह दीडशेहून अधिक कार्यरत विमानतळांवर रोज तीन हजारांहून अधिक विमाने येतात आणि जातात. गेल्या 14 ऑक्टोबरला तर भारतातील विमान कंपन्यांनी सुमारे पाच लाख प्रवाशांची वाहतूक करण्याचा विक्रम केला. भारतात 700 व्यावसायिक प्रवासी विमानेसेवेत असून, 1700 नवीन विमानांच्या ऑर्डर्स प्रलंबित आहेत. सातत्याने बॉम्बच्या अफवा पसरल्यास, लोकांनाही विमान प्रवास टाळलेलाच बरा, असे वाटू शकेल. अशावेळी या व्यवसायावर संक्रांत कोसळून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटनावरही या गोष्टींचा विपरीत परिणाम होऊ शकतो. विमानतळांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणे किंवा विमानांच्या उड्डाणांमध्ये व्यत्यय आणणे, या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी भारतीय कायद्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. केवळ विमानात बॉम्ब ठेवला आहे, अशाच नव्हे, तर अनेक इमारतींमध्येही बॉम्ब ठेवल्याच्या बोगस धमक्या दिल्या गेल्याचीही अनंत उदाहरणे आहेत.
सुमारे तीन वर्षांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत, तर मे महिन्यात इराणचे अध्यक्ष सय्यद इब्राहीम रईसी हेलिकॉप्टर कोसळून ठार झाले. 1982 मध्ये स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीकडे आंतरराष्ट्रीय समूहाचे लक्ष वेधण्यासाठी खलिस्तावाद्यांनी 22 ऑगस्ट 1982 रोजी इंडियन एअरलाईन्सच्या मुंबईहून दिल्लीला जाणार्या विमानाचे अपहरण केले होते; पण भारतीय सुरक्षा दलाने अमृतसर येथे कारवाई करून, विमानातील 69 प्रवाशांची सुखरूप सुटका केली. 1984 मध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’अंतर्गत अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर कारवाई केल्याचा बदला म्हणून कॅनडातील खलिस्तानवादी संघटनेने 23 जून 1985 रोजी एअर इंडियाच्या कनिष्क या विमानात स्फोट घडवून आणला. हे विमान दिल्लीला परतत होते. अटलांटिक महासागरावरून 31 हजार फूट उंचीवरून जात असताना विमानात बॉम्बस्फोट झाला आणि त्यात सर्वच्या सर्व 307 प्रवाशांसह 22 विमान कर्मचारी मृत्युमुखी पडले. हे भयानक कृत्य इतक्या सफाईदारपणे केले गेले की, त्याचे धागेदोरे नंतर कितीतरी वर्षे सापडू शकले नाहीत.
व्हँकुव्हरचे अब्जाधीश उद्योगपती रिपुदमनसिंग मलिक आणि कोलंबियातील अजैबसिंग या आरोपींना 10 वर्षे इंग्लंडच्या तुरुंगात ठेवले गेले. 5 सप्टेंबर 1986 रोजी मुंबईहून न्यूयॉर्कला जात असलेल्या विमानाचे पाकिस्तानमध्ये अपहरण करण्यात आले. प्रवाशांच्या सुखरूप सुटकेसाठी नीरजा या हवाई सुंदरीने जीवाची बाजी लावली. तीन लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी तिने दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलल्या. नीरजासह त्यात 20 जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या भयाचे वातावरण अधिक गडद होण्यामागची ही पार्श्वभूमी लक्षात घेता ती करणार्यांच्या उद्योगात गुंतलेल्यांचे इरादे स्पष्ट होऊ शकतात. अर्थातच, ते निर्हेतूक तर अजिबातच नसावेत. सरकारी यंत्रणांना व सर्वसामान्यांना त्रास देणे हाच ज्यांचा फावल्या वेळेचा उद्योग आहे, त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्याच पाहिजेत. भारतासारख्या विकसनशील देशाची प्रगती डोळ्यांत खुपत असणार्यांचाही अशा घटनांमध्ये हात असू शकतो. त्यामुळे विमान कंपन्यांच्या अर्थकारणाला झळ बसू शकते. सातत्याने घडणार्या या प्रकारांमागील मेंदू शोधण्याचे आणि विमान प्रवाशांत विश्वासाचे, सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचे मोठे आव्हान तर आहेच. हे सत्र वेळीच थांबवलेले बरे. धमकी देणार्यांचा माग काढून, त्यांना आताच अद्दल घडवणे हाच एकमेव मार्ग आजघडीला दिसतो.