

घरात छोटे बाळ आले की, आयुष्यच बदलून जाते. त्या बाळाच्या प्रत्येक श्वासावर आपले संपूर्ण जग केंद्रित होते. बाळ झोपलेय का? श्वास नीट घेते का? त्याच्या खोलीत योग्य तापमान आहे का? हे प्रश्न प्रत्येक आई-बाबांना सतावतात. सतत बाळाकडे लक्ष ठेवणे शक्य नसते. अशा वेळी एआय स्मार्ट बेबी मॉनिटर वापरता येईल. जे अक्षरशः आई-वडिलांसारखेच बाळावर नजर ठेवते आणि त्याची काळजी घेते. हा केवळ कॅमेरा नसून एक ऑल-इन-वन स्मार्ट मॉनिटर आहे. हे गॅजेट बाळाच्या श्वासोच्छवासापासून ते खोलीतील तापमान आणि आर्द्रतेपर्यंत सगळे ट्रॅक करते. याचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे बाळाच्या श्वासोच्छवासाचे थेट द़ृश्य स्क्रीनवर पाहता येते.
या गॅजेटमध्ये वापरलेल्या प्रगत एआय इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानामुळे बाळाचा श्वासोच्छवास मॉनिटरवर स्पष्ट दिसतो. रात्री बाळ झोपेत असतानाही आई-बाबांना खात्री वाटते की, सर्व काही व्यवस्थित आहे. बाळ रडायला लागले की, क्राय डिटेक्शन फीचरमुळे लगेच अलर्ट मिळतो. यात बसवलेला एआय कॅमेरा आणि सेन्सर्स बाळाच्या श्वासोच्छवासावर अत्यंत संवेदनशीलपणे लक्ष ठेवतात. बाळ झोपलेले असताना कॅमेरा त्याचा श्वास इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाने ओळखतो आणि त्याचे द़ृश्य पालकांच्या मोबाईल स्क्रीनवर दाखवतो. त्याच वेळी खोलीतील तापमान आणि आर्द्रतेचे सेन्सर्स वातावरणातील बदल टिपतात. जर बाळ रडायला लागले, तापमान वाढले किंवा श्वासामध्ये कोणताही बदल झाला, तर सिस्टम लगेच अॅपवर रिअल टाईम अलर्ट पाठवते. या प्रक्रियेमुळे बाळाच्या प्रत्येक हालचाली आणि आरोग्याबाबतचे सूक्ष्म बदल पालकांपर्यंत काही सेकंदांत पोहोचतात.
आई-बाबांसाठी आणखी सोयीची गोष्ट म्हणजे, दोन बाजूंनी संवाद साधता येणे. म्हणजे तुम्ही दूर असलात, तरी बाळाशी बोलू शकता किंवा रेकॉर्ड केलेला आवाज एका बटणावर प्ले करून बाळाला शांत करू शकता. याशिवाय हे गॅजेट पर्सनल असिस्टंट डिवाईससोबत सुसंगत आहे, म्हणजे स्मार्ट स्पीकरवरूनही बाळाच्या खोलीत संपर्क साधता येतो. अशा स्मार्ट तंत्रज्ञानात सर्वात मोठा प्रश्न असतो प्रायव्हसीचा. काही उपकरणांत डेटा एनक्रिप्शन नसल्यामुळे हॅकिंगचा धोका असतो; पण या स्मार्ट बेबी मॉनिटरमध्ये तुमचा डेटा सुरक्षित राहतो. 9 दिवसांचे व्हिडीओ स्टोरेज मिळते. यामुळे एकाच वेळी बाळावर नजर ठेवणे, खोलीची परिस्थिती ट्रॅक करणे आणि सुरक्षा सांभाळणे शक्य होते. बाळासाठी स्वतंत्र कॅमेरा, नॅनी मॉनिटर, तापमान मापक आणि आवाज सेन्सर घ्यायची गरज राहत नाही एकच गॅजेट सगळे काम करते. सध्या पाश्चात्त्य देशांमध्ये अशा प्रकारच्या बेबी मॉनिटरची क्रेझ सुरू आहे. त्यांच्या किमती नऊ-दहा हजार रुपयांपासून सुरू होतात.