घरगुती हिंसाचार आणि आत्महत्या | पुढारी

घरगुती हिंसाचार आणि आत्महत्या

भारतीय महिलांना ज्या कामाचा सध्या अजिबात मोबदला मिळत नाही, त्या कामासाठी पैसे द्यायचे ठरविल्यास त्याचे वार्षिक मूल्य किमान 19 लाख कोटी रुपये होईल. अनेक घरांमध्ये महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरतात आणि म्हणूनच दरवर्षी भारतातील 20 हजार महिला आत्महत्या करतात.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने (एनसीआरबी) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये देशातील 22 हजार 372 गृहिणींनी आत्महत्या केल्या. दररोज सरासरी 61 महिला आत्महत्या करतात, असा अंदाज आहे. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास दर 25 मिनिटांनी एक महिला आत्महत्या करते. 2020 मध्ये भारतात आत्महत्यांच्या एकूण 1 लाख 53 हजार 52 घटनांची नोंद झाली. त्यापैकी 14.6 टक्के गृहिणी होत्या. आत्महत्या करणार्‍या एकूण महिलांपैकी 50 टक्क्यांहून अधिक गृहिणीच होत्या.

जेव्हापासून एनसीआरबीने आत्महत्यांची आकडेवारी जमा करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आढळून आले आहे की, देशात दरवर्षी सरासरी 20 हजारांहून अधिक गृहिणी आत्महत्या करतात. 2009 मध्ये ही संख्या 25 हजारांहून अधिक होती. ‘गृहलक्ष्मी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्त्रिया एवढ्या मोठ्या संख्येने जीव का गमावत आहेत, हा प्रश्नच आहे. या आत्महत्यांमागे अनेक कारणे आहेत. यामध्ये त्यांच्या कौटुंबिक समस्या आणि लग्नाशी संबंधित बाबींचा समावेश आहे. परंतु, मानसिक आरोग्यतज्ज्ञ या आत्महत्यांमागे घरगुती हिंसाचार हे प्रमुख कारण असल्याचे मानतात.

कोरोनाच्या काळात नैराश्याची स्थिती वाढलीच; शिवाय घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली. वाराणसीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. उमा वर्मा श्रीवास्तव यांनी सांगितले की, बहुतेक मुलींची लग्ने 18 व्या वर्षीच होतात. ‘मुली’चे रूपांतर कोवळ्या वयातच ‘सुने’मध्ये होते. त्यांचा सर्व वेळ स्वयंपाक आणि अन्य कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळण्यात जातो. त्यांच्यावर अनेक बंधने आहेत. त्यांच्या शिक्षणाला आणि स्वप्नांना महत्त्व राहिलेले नाही. त्यांच्या महत्त्वाकांक्षा हळूहळू नष्ट होतात आणि त्यांच्यात निराशा निर्माण होऊ लागते.

गृहिणी बर्‍याचदा आर्थिकद़ृष्ट्या कमकुवत असतात आणि सतत छळवणुकीला बळी पडतात. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सौमित्र यांच्या म्हणण्यानुसार, अनेक आत्महत्या आवेगातून होतात. जेव्हा एखादा माणूस घरी येतो आणि पत्नीला मारहाण करतो, तेव्हा ती दुःखी होते आणि आत्महत्या करते. आत्महत्या करणार्‍या महिलांपैकी एक तृतीयांश महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत असल्याचे अनेक सर्वेक्षणांमधून समोर आले आहे. तथापि, अधिकृत आकडेवारीत हे कारण म्हणून नोंदविलेच गेलेले नाही. किंबहुना अनेक कुटुंबांत महिलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार होतात. अनेक घरांमध्ये सुनेला प्रेम आणि आदर मिळत नाही. ती जणू एखादी मोलकरीण आहे, असे समजूनच तिला वागविले जाते. तिने तिच्या माहेरी तक्रार केली तरी आई-वडील तिच्यावर सर्व काही सहन करून सासरी राहण्यासाठी दबाव आणतात.

गृहिणी घराबाहेर कुठेही काम करीत नसल्यामुळे त्या आर्थिकद़ृष्ट्याही कमकुवत असतात आणि खर्चासाठी पती आणि सासरच्या लोकांवर अवलंबून असतात. म्हणूनच नरकाहून वाईट अशा वैवाहिक जीवनातून बाहेर पडून त्या सन्मानाने तसेच सुरक्षित जीवन जगू शकतील, असे त्यांच्याकडे कोणतेही ठोस साधन नसते. आता गृहिणींचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना आर्थिक सुरक्षितता देण्याची गरज आहे. गृहिणींना घरकामासाठी मासिक उत्पन्नाची कायदेशीर खात्री असणे आवश्यक आहे.

ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, भारतीय महिलांना ज्या कामाचा सध्या अजिबात मोबदला मिळत नाही, त्या कामासाठी पैसे द्यायचे ठरविल्यास त्याचे वार्षिक मूल्य किमान 19 लाख कोटी रुपये होईल. महिलांनी स्वतःमधील प्रतिभा ओळखून स्वतःच्या बळावर असे काम केले पाहिजे, जेणेकरून त्या समाजात नाव, कीर्ती आणि संपत्ती कमावू शकतील आणि आपली ओळख निर्माण करू शकतील. त्यामुळे त्यांची आंतरिक निराशाही दूर होईल आणि ते समाजासाठी हितकारक ठरेल.

– रंजना मिश्रा

Back to top button