पुढारी : अभेद्य अद्वैत | पुढारी

पुढारी : अभेद्य अद्वैत

त्र्याऐंशी वर्षांची प्रदीर्घ वाटचाल उत्तरोत्तर यशस्वीपणे पूर्ण करून नववर्षदिनी दै. ‘पुढारी’ आता चौर्‍याऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहे. तब्बल साडेआठ दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात अनेक संघर्षात ‘पुढारी’ने नेतृत्व केले आणि आपला स्वतंत्र मानदंड निर्माण केला. या गौरवास्पद वाटचालीत वाचकांचे आणि पुढारीचे अभेद्य असे अद्वैतच निर्माण झाले. पुढारी वरचा वाचकांचा विश्वास आणि श्रद्धा अबाधित राहिली. वाचकांच्या या ऐक्यामुळेच ‘पुढारी’ म्हणजे वृत्तपत्र असे समीकरण रूढ झाले. ‘पुढारी’ हे सर्वनाम बनले. हे सारे वाचकांच्या ‘पुढारी’वरच्या असीम प्रेमामुळेच! असे अहोभाग्य क्वचितच कोणाला लाभले आहे. वाचकांच्या या अलोट स्नेहवर्षावापुढे आम्ही नतमस्तक आहोत. साप्ताहिकाचे रूपांतर दैनिकात झालेली अनेक उदाहरणे आहेत; मात्र 1937 मध्ये ‘पुढारी’ साप्ताहिक स्वरूपात सुरू झाला व 1 जानेवारी 1939 रोजी दैनिक आणि नियमित स्वरूपातच ‘पुढारी’चा प्रारंभ झाला आणि आता ‘पुढारी’ने चौर्‍याऐंशीव्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘पुढारी’चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी ‘पुढारी’चे इवलेसे रोपटे लावले. त्याचा आता महावृक्ष बनला आहे आणि त्याच्या छायेत असंख्यांना दिलासा मिळत आहे. बड्या साखळी वृत्तपत्रांच्या लाटेत बहुतांश जिल्हा पत्रे बंद झाली. एकटा ‘पुढारी’ मात्र अपवाद ठरला. एवढेच नव्हे, तर ‘पुढारी’ने लाट परतवून लावली आणि त्यांना टक्कर देत महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात सर्वदूर विस्तार केला. जिल्हा वृत्तपत्राने साखळी वृत्तपत्रांवर मात करून त्यांच्या बरोबरीने अग्रगण्य स्थान मिळवण्याचे हे एकमेव उदाहरण म्हटले पाहिजे. वाचकांच्या अतूट भावबळामुळेच ‘पुढारी’ने ही गरुडझेप घेतली. ध्येयवाद आणि सामाजिक बांधिलकीच्या भक्कम पायावर ‘पुढारी’ची स्थापना झाली आहे. ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी स्वातंत्र्य लढ्यात काम केले होते. महात्मा गांधी यांचा निकट सहवास त्यांना लाभला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत काळाराम मंदिर सत्याग्रहासह अनेक लढ्यांत ते आघाडीवर होते. नेकनामदार भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, मामा वरेरकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर अशा मातब्बरांच्या सहवासात त्यांची जडणघडण झाली. मुंबईत त्यांनी पत्रकारितेचे आधुनिक धडे गिरवले. कोल्हापुरातील पत्र व्यवसाय तेव्हा चाकोरीतील होता. ग. गो. जाधव यांनी ‘पुढारी’त आधुनिक पत्रकारितेची सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळ आणि दुसरे महायुद्ध यांच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी त्यांनी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची खास प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. यावरून त्यांच्या दूरद़ृष्टीचा प्रत्यय येतो. दक्षिण महाराष्ट्रातील सहकार, कूळ कायद्याचे प्रश्न, कोयना धरण उभारणी, शिवाजी विद्यापीठ उभारणी अशा अनेक प्रश्नांना चालना देत त्यांनी वास्तवदर्शी आणि सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेचा आविष्कार घडवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ‘पुढारी’ने हिरिरीने पाठपुरावा केला. गोवामुक्ती संग्रामाची कोल्हापुरातील पहिली तुकडी ‘पुढारी’तूनच रवाना झाली होती. राजकीय आणि सामाजिक संदर्भातील प्रश्नांचा पाठपुरावा आणि सोडवणूक ‘पुढारी’च्या व्यासपीठावरून तेव्हापासूनच होत आली आहे आणि आता ती अधिक वर्धिष्णु झाली आहे.

कोयना, लातूर, कच्छचा भूकंप, कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील महापुरांची आपत्ती अशा अनेक नैसर्गिक आपत्तीला ‘पुढारी’ आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून गेला. 1999 मध्ये पाकिस्तानने विश्वासघाती आक्रमण केले. कारगील युद्ध झाले. आपल्या जवानांनी विजयश्री खेचून आणली. या जवानांना सियाचीनसारख्या जगातील उत्तुंग रणभूमीवर शून्य तापमानाखाली कमालीच्या थंडीच्या, बर्फाळ वातावरणात अहोरात्र सज्ज राहावे लागे. हिमदंशासारख्या आजारांना तोंड द्यावे लागे. जवानांवर उपचारांची काहीच सोय नव्हती. हे लक्षात येताच आम्ही सियाचीन हॉस्पिटलची योजना तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यापुढे मांडली आणि अडीच कोटींचा भरीव निधी उभारून सियाचीन हॉस्पिटलची उभारणी केली. गेल्या वीस वर्षांत हॉस्पिटलला लागणारी उपकरणे आणि वस्तूही आम्ही पुरवीत आहोत. अशा प्रकारचे हॉस्पिटल उभारणीचे कार्य हे वृत्तपत्रीय इतिहासातील एकमेव असे देशकार्य आहे. सियाचीन हॉस्पिटल उभारून ‘पुढारी’ने हिमालयावर झेंडा फडकावला. त्याचबरोबर सामाजिक कार्यांतही नेहमीच पुढाकार घेतला. 1974 मध्ये छ. शिवाजी महाराज राज्याभिषेक त्रिशताब्दी आणि राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दीसाठी आम्हीच पुढाकार घेतला. सीमाप्रश्नात आम्ही प्रथमपासूनच आघाडीवर राहून मेळावे, परिषदांचे नेतृत्व केले आहे. दख्खनचा राजा श्री जोतिबा परिसराच्या विकासाची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सोपवली. ती आम्ही पार पाडून परिसराचा कायापालट घडवला. मराठा आरक्षण लढा, कोल्हापूर खंडपीठ आंदोलन, कोल्हापुरातील टोलविरोधातील आंदोलन अशा अनेक सार्वजनिक प्रश्नांत आम्ही नेतृत्व करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे आणि प्रसंगी रस्त्यावर उतरलो आहोत. ध्येयवादी आणि सामाजिक बांधिलकीने ‘पुढारी’ची प्रदीर्घ वाटचाल सुरू असल्यानेच सुवर्ण महोत्सवाला स्व. राजीव गांधी आणि अमृत महोत्सवाला नरेंद्र मोदी हे दोन पंतप्रधान आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी ‘पुढारी’च्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. रौप्य, सुवर्ण, हीरक आणि अमृत महोत्सव हे ‘पुढारी’चे चारही महोत्सव आम्ही पाहिले. चारही महोत्सवाला उपस्थित राहणारे आम्ही एकमेव संपादक आहोत. सडेतोड, निस्पृह आणि निर्भीड लिखाण ही ‘पुढारी’ची कवचकुंडले. ती आम्ही जीवामोलाने जपली आणि त्यामुळेच असंख्य वाचक आणि ‘पुढारी’ची एकरूपता निर्माण झाली. ‘आता आमोद सुनासि जाले। श्रुतीशी श्रवण रिघाले’ असा अनुपमेय दाखला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी दिला आहे. म्हणजे नाक आणि सुगंध, कर्णेंद्रिये आणि आवाज यांची एकरूपता होते, तसे भक्त परमेश्वराशी एकात्म पावतात, असा भावार्थ. ‘पुढारी’ आणि वाचक यांची एकात्मता आणि अद्वैत याच कोटीतील आहे. हे वाचकांचे भावबळ पुढील मार्गक्रमणात अखंड राहो, हीच मनोमन भावना याप्रसंगी आम्ही व्यक्त करतो!

Back to top button