काँग्रेस राजकीय चक्रव्यूहात - पुढारी

काँग्रेस राजकीय चक्रव्यूहात

ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान होण्याचे वेध लागले आहेत. काँग्रेससोबत संयुक्त पुरोगामी आघाडीत काम करण्यास नकार देऊन त्यांनी इरादा जाहीर केला. एकीकडे मजबूत भाजप आणि दुसरीकडे तृणमूलच्या रूपाने बनत असलेला नवा विरोधी पर्याय, असे दुहेरी आव्हान काँग्रेससमोर आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिली. राज्यात तृणमूलचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपमधून आमदार आणि नेत्यांचा ओघ तृणमूलकडे सुरू झाला. केवळ बंगालच नव्हे तर देशाच्या विविध भागांतील नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याची मोहीम तृणमूलने सुरू केली आहे. गेल्या काही काळात काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी तृणमूलमध्ये केलेला प्रवेश, हे त्याचे उदाहरण आहे. जे नेते तृणमूलमध्ये आले, त्यात मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचा समावेश आहे. हरियाणातील अशोक तंवर यांच्यासारखा कधीकाळी राहुल गांधी यांचा खास जवळचा असलेला नेताही तृणमूलच्या हाती लागला.

भाजपपाठोपाठ काँग्रेसला खिंडार पाडण्याची ममता बॅनर्जी यांची चाल लपून राहिलेली नाही. त्यामुळेच काँग्रेसचे प्रमुख नेते सध्या ममतांवर चवताळले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी बंगालमध्ये भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर दोनच वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने याचे पुरेपूर उट्टे काढले. भाजपची घोडदौड तृणमूलने यशस्वीपणे रोखली; पण आता केंद्रात भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण करण्याचे ममतांचे धोरण आहे.

ममतांचा मुंबई दौरा व त्यादरम्यान त्यांनी शरद पवार यांच्यासह शिवसेना नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी हे त्याचे द्योतक म्हणावे लागेल. काँग्रेसला आणि त्यातही गांधी घराण्याला बाजूला सारल्याशिवाय प्रमुख विरोधी पक्षनेता अशी आपली ओळख बनणार नाही, याची पुरती जाणीव धूर्त व धाडशी ममतांना आहे, त्यातूनच काँग्रेसला थेट अंगावर घेण्याचे धाडस ममतांनी दाखविले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी बरी झाली असली तरी तमाम डावे पक्ष आणि काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. यातून राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला पर्याय ठरण्याचा ममतांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अर्थात, प्रत्येक राज्यात ताकद वाढविणे, त्यासाठी तृणमूलला अपरिहार्य ठरणार आहे. मेघालयात तृणमूल प्रमुख विरोधी पक्ष बनला. इतरही राज्यांत तेथील सत्ता प्राप्त करणे अथवा प्रमुख विरोधी पक्ष बनणे हे तृणमूलचे लक्ष्य आहे. ढोबळमानाने सांगायचे झाले तर सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांना पर्याय नाही; पण ज्या वेगाने काँग्रेसचा र्‍हास सुरू आहे; ते पाहता आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसरहित आघाडीची चर्चा होत राहणार आहे. त्याचा अंदाज घेऊनच तृणमूलने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली असावी.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी सुमार झाली. दोन्ही निवडणुकांत काँग्रेसच्या जागा 55 च्या खाली राहिल्या. तृणमूलने 2014 मध्ये बंगालमधील 42 पैकी 34 जागा जिंकल्या. 2019 मध्ये पक्षाला ती कामगिरी साध्य करता आली नव्हती. मात्र, देशव्यापी विस्तार करून आपल्या जागा 80 ते 100 पर्यंत नेण्याचे आणि त्यातून प्रमुख विरोधी पक्ष होण्याचे ममतांचे उद्दिष्ट असू शकते. राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. ध्यानीमनी नसताना देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर यांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागली होती, तर दुसरीकडे हातात पंतप्रधानपद असताना डाव्या पक्षांच्या तत्त्वामुळे ज्योती बसू यांचे पंतप्रधानपद हुकले होते.

लोकसभेच्या पुरेशा जागा हातात आल्या तर वेळप्रसंगी आपणही पंतप्रधान होऊ शकतो, असा ममता बॅनर्जी यांचा होरा आहे. आणि त्यातूनच काँग्रेसरहित विरोधी पक्षांची मोट बांधण्याची मोहीम ममतांनी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. देशभरात पसरलेले जाळे, संघटन, जुने-मुरब्बी नेते, सत्ताकारणाचा दीर्घ अनुभव आदी अनेक सकारात्मक बाबी काँग्रेसकडे आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 20 टक्क्यांच्या आसपास मते होती. तृणमूलची टक्केवारी होती 4.1 टक्के. याचाच अर्थ तृणमूलला काँग्रेसपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मजल मारायची आहे. काँग्रेसला आपण पर्याय ठरू शकतो, असा बिगुल ममतांनी वाजवला आहे. एकीकडे भाजप, तर दुसरीकडे तृणमूल अशा दुहेरी संकटाचा सामना भविष्यात काँग्रेसला करावा लागण्याची शक्यता यामुळेच बळावली आहे.

– श्रीराम जोशी

Back to top button