दहावीनंतर काय? …निर्णय घेताना!

दहावीनंतर काय? …निर्णय घेताना!
Published on
Updated on

[author title="- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ" image="http://"][/author]

दहावीचा निकाल लागल्यानंतर नेहमीप्रमाणे आता पुढे काय, या प्रश्नाची चर्चा विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुरू होते. दहावीच्या गुणांवरूनच त्याचे पुढचे करिअर ठरणार आहे, असे अजिबात नाही. त्याला कोणत्याही क्षेत्रात प्रवेश घ्या, पण त्याची मानसिकता, भावनिकता, नैतिकता आणि वैचारिक प्रगल्भता कशी उंचावेल, कशी उत्तम राहील, हे पाहणे गरजेचे आहे. नवीन क्षेत्रे पाहणे, त्यातील ज्ञान अवगत करणे हे आव्हान आता पालकांनी स्वीकारायला हवे.

दहावी परीक्षेचा निकाल लागला. दरवर्षी दहावीचा निकाल लागला की, पालकांची एकच गडबड आणि धावपळ उडते, ती म्हणजे आता पुढे काय करायचे? दहावीची मुले तशी लहानच आहेत. अजून त्यांना पुरेशी समज आलेली नाही. त्यामुळे आज तरी निर्णय प्रक्रिया पालकांकडेच आहे; मात्र निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे मत जरूर विचारात घेतले पाहिजे. सध्याच्या काळात मुला-मुलींना नवनवीन आव्हाने खुणावत आहेत. केवळ आपल्याला ती आव्हाने पेलवतील का, याचा नेमका अंदाज त्याला लावता येत नाही. त्यासाठी हवे पालक आणि पालकांचे मार्गदर्शन. गेल्या दशकात शिक्षण आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्रात प्रचंड बदल झालेले आहेत. केवळ उत्तम शिक्षण आणि उत्तम पदवी घेऊन सार्‍या आयुष्याची वाटचाल समर्थपणे होऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. पाल्य उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथमतः त्याच्या उत्तीर्णतेचे स्वागत करा, अभिनंदन करा, आनंद साजरा करा. त्याला किती गुण मिळाले आहेत, यावर फार भर देऊ नका. दहावीच्या गुणांवरूनच त्याचे पुढचे करिअर ठरणार आहे, असे अजिबात नाही. प्रयत्नशीलता आणि अभ्यास, कठोर परिश्रम, धाडस आणि आत्मविश्वास हे त्या विद्यार्थ्याच्या पुढच्या आयुष्यामधील खरे साथीदार आहेत. त्यामुळे त्याला कोणत्याही क्षेत्रात प्रवेश घ्या, पण त्याची मानसिकता, नैतिकता आणि वैचारिक प्रगल्भता कशी उंचावेल, हे पाहणे गरजेचे आहे.

किमान कौशल्याधारित अभ्यासक्रमात कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अधिक वाव आहे. व्यवसाय करायचा असेल तर हे अभ्यासक्रम सर्वोत्तम आहेत. त्यामध्ये बांधकाम, इलेक्ट्रिकल, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, फिशरी, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, डीएमएलटी, कुकरी, अ‍ॅग्रिकल्चर, व्हेटर्नरी, बुक कीपिंग अँड अकौंटन्सी यांचा समावेश होतो. पॉलिटेक्निक आणि आयटीआयमध्ये आपल्याला पाहिजे तो तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम घेता येतो. यासाठी शक्यतो शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करावा. शासकीयमध्ये मिळाला नाही, तर खासगी आयटीआयमध्येही चालेल. संगणक शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये टॅली, अ‍ॅडव्हान्स अकौंटिंग, टॅक्सेशन, बँकिंग ऑडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, अ‍ॅनिमेशन, डीटीपी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, फोटोग्राफी अशा अनेक वाटा आहेत. हे कोर्सेस केल्यास लगेच नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यावर नोकरी करता-करता बहिःस्थ पद्धतीने पदवीही प्राप्त करता येते. करिअर म्हणून ही एक वाट चांगली आहे. उगाच पाच-पाच, सहा वर्षे शिकत बसण्यापेक्षा ज्याला गरज आहे, त्यांना दहावीनंतर दोन वर्षांत पैसे मिळवण्याची सुरुवात करता येईल. यातून 'कमवा व शिका' योजनेला खर्‍या अर्थाने न्याय दिल्यासारखे होईल. योग्य विचार करून धाडसी निर्णय घेणे व त्याप्रमाणे कृती करणे महत्त्वाचे आहे.

एखादे निश्चित ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यामधील आवश्यक ते ज्ञान पद्धतशीरपणे मिळवणे आणि या ज्ञानातून नोकरी-व्यवसायात स्थिरावणे याला करिअर म्हणतात. करिअर घडवणे हे एका जिद्दी व महत्त्वाकांक्षी मनाचे लक्षण आहे. प्रत्येक विद्यार्थी गुणवान आहे; पण कोणत्या क्षेत्रात, हे नेमके शोधले तर त्या त्या विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार करिअर घडवता आले पाहिजे किंवा घडवले पाहिजे ही सध्या निकोप समाजाची गरज आहे. आज दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी डोळे उघडे ठेवून समाजात काय चाललेले आहे, हे पाहण्याची गरज आहे. डिजिटल तंत्रज्ञान, पर्यटन, अर्थकारण आणि सेवा क्षेत्रे अशा विविध शेकडो नव्या संधी आता उपलब्ध होत आहेत. यामध्ये कष्टाळू व नवनवीन शिकण्याची मानसिक तयारी असणार्‍यांना आर्थिक उत्पन्नाबरोबरच मानसिक समाधानही मिळत आहे. बर्‍याचदा पालक एखाद्या क्षेत्राच्या लाटेत वाहून जातात. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी एमबीएची अशी लाट आली होती, तेव्हा हजारो पालकांनी केवळ ऐकीव माहितीद्वारे पाल्याला एमबीएचा कोर्स करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. आज या क्षेत्राची स्थिती काय? प्रचंड मंदी आलेली आहे. तेव्हा पाल्य सुशिक्षित बेरोजगार करू नका. नवीन क्षेत्रे पाहणे, त्यातले ज्ञान अवगत करणे हे आव्हान आता पालकांनी स्वीकारायला हवे. त्यासाठी जुनाट मानसिकता सोडून द्यायला हवी.

विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

  • पुढील काळामध्ये स्थिर नोकरीची हमी कमी होत जाणार आहे.
  • नोकरी असो वा व्यवसाय, आपण त्या-त्या क्षेत्रातील ज्ञान जर अद्ययावत ठेवले नाही तर आपण स्पर्धेच्या बाहेर फेकले जाऊ.
  • यशस्वी होण्यासाठी केवळ प्रमाणपत्रे पुरेशी नाहीत, तर लोकांशी जुळवून घेणे, आपले म्हणणे इतरांना पटवून देणे, आर्थिक नियोजनाचे कौशल्य आत्मसात करणे यांसारखी कौशल्ये अंगी असणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर संगणक आणि इंग्रजीचे किमान ज्ञान हे अत्यावश्यक आहे.
  • एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्यामध्ये किती पैसे मिळतील, हा विचार न करता आपली कष्ट करण्याची किती तयारी आहे, यावर भर द्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news