अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : संमेलनाची साद - पुढारी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : संमेलनाची साद

होण्याची शक्यता, होणार आणि होणारच नाही, अशा प्रचंड संभ्रमाच्या, अनिश्‍चिततेच्या व गोंधळाच्या वातावरणाचे अकरा महिने लोटल्यानंतर 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून नाशिकमध्ये प्रारंभ होत आहे. मराठी साहित्याचा हा महाउत्सव म्हणजे रसिकांसाठी अपार आनंद देणारी पर्वणी. सुमारे दीडशे वर्षांपासून एवढ्या मोठ्या संख्येने आणि इतके सातत्य राखत एखाद्या प्रादेशिक भाषेतील लोक साहित्यप्रेमापोटी एकत्र येऊन चिंतन करतात अशी उदाहरणे जगात फार कमी आढळतात. मराठी ग्रंथांवर विचारविनिमय करण्यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1878 मध्ये पुण्यात पहिले साहित्य संमेलन भरवले होते. पुढे या व्यासपीठावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते ग. दि. माडगूळकरांपर्यंत आणि ह. ना. आपटेंपासून म. द. हातकणंगलेकर यांच्यांपर्यंत अनेक अध्यक्षांनी समाजाला दिशादिग्दर्शन केले. प्रारंभी खूपच मर्यादित स्वरूपात व साधेपणाने आयोजित केला जाणारा हा उपक्रम पुढे अधिकाधिक उत्सवी होत गेला. तसे त्याबाबत नाना वादविवाद झडू लागले. आता तर वादांविना एखादे संमेलन पूर्णत्वास जाऊ लागल्यास ते साहित्य संमेलनच वाटू नये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंपरा या संस्कृतीच्या वाहक असतात; परंतु त्यांचे कर्मकांडांत रूपांतर होते, तेव्हा त्यांना आवर घालणे आवश्यक होऊन बसते. दिवसेंदिवस भपकेबाजपणाच्या मर्यादा ओलांडणार्‍या साहित्य संमेलनांबाबतही काही ठोस पावले उचलली, तर कोटींची उड्डाणे आणि पर्यायाने वादविवादांच्या फैरी कमी होऊ शकतील. तूर्त तरी नाशिकचे संमेलनही या मळलेल्या वाटेवरूनच चालले आहे. संमेलनाध्यक्ष निश्‍चितीपासून ते संमेलनातील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीपर्यंत प्रत्येक विषयावर वाद निर्माण झाले आणि ते अजूनही सुरू आहेत. राजकारण्यांच्या हजेरीचा विषय तर चावून चावून चोथा झाला आहे. याबाबत साहित्य महामंडळाचीच भूमिका दर संमेलनागणिक बदलत असल्याने इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. साहित्यात संपूर्ण समाजच प्रतिबिंबित होत असल्याने संमेलनासारखा उत्सव सर्वव्यापी असण्यात काही गैर नाही. तीच बाब जावेद अख्तर आणि गुलजार यांच्या उपस्थितीची. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून या दोन्ही नावांचा विचार सुरू होताच ‘यांचा मराठी साहित्याशी काय संबंध’ असा सवाल उपस्थित करण्यात आला. मात्र, मराठी भाषा आणि माणसे एवढी संकुचित नाहीत. परभाषांतील अनेक शब्द मायमराठीने सहज सामावून घेतले आहेत आणि अन्य भाषांनाही शब्दांचे दान दिले आहे. प्रेमचंदांपासून थेट मंटोंसारख्या हिंदी-उर्दू लेखकांवर मराठी माणसाने नितांत प्रेम केले आहे. काही वर्षांपूर्वी गुलजार यांनी नाशिकमध्येच खर्जातल्या आवाजात कुसुमाग्रजांच्या कवितांचा स्वत: केलेला हिंदी अनुवाद ऐकवला, तेव्हा सभागृहातल्या प्रत्येकाचा ऊर आनंद आणि अभिमानाने भरून आला होता. भाषा, प्रांत, धर्म व जातींच्या भिंती ओलांडून माणसांत संवेदना जागृत करण्याची साहित्याची ही ताकद लक्षात घ्यायला हवी.

हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत असताना दुसरीकडे नाशिकमध्येच विद्रोही साहित्य संमेलनही भरणार आहे. विशेष म्हणजे, पंधरा वर्षांपूर्वी जेथे 78 व्या साहित्य संमेलनाचा मांडव टाकण्यात आला होता, तेथेच आता विद्रोही साहित्याचा जागर होणार आहे. मराठी साहित्य संमेलनात विस्थापितांना स्थान नसल्याने तेथे येण्यास महात्मा फुले यांनी नकार दिला होता, त्याचे स्मरण यानिमित्ताने होते. प्रस्थापित आणि विद्रोही अशी दोन वेगवेगळी साहित्य संमेलने भरत असतील, तर समाज म्हणून आपण समता आणि परिवर्तनाच्या वाटचालीत कितपत प्रगती केली, हा प्रश्‍न अस्वस्थ करणारा आहे. नाशिकचे संमेलन अभूतपूर्व पार्श्‍वभूमीवर होत आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळात कित्येकांना जीव गमवावे लागले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. हजारो जणांच्या नोकर्‍या गेल्या. देशच्या देश बंद राहिले. त्यामुळे यंदाचे संमेलन छोटेखानी वा मर्यादित स्वरूपात घेता आले असते. साहित्य महामंडळानेही प्रारंभी तशीच भूमिका घेतली होती; मात्र डॉ. जयंत नारळीकरांसारखा साधा, निगर्वी माणूस संमेलनाध्यक्ष असूनही संयोजकांच्या आग्रहामुळे पुढे डोलारा वाढत गेला आणि शेवटी यंदाही एरव्हीसारखेच वा एरव्हीपेक्षाही भव्य असे संमेलन आकाराला येत आहे; पण आता याकडे साहित्य क्षेत्रात आलेली चैतन्याची झुळूक अशा सकारात्मक द‍ृष्टीने पाहायला हवे. एरव्हीपेक्षा अंमळ अधिकच शिणलेल्या जिवांना चार आनंदाचे क्षण अनुभवता येतील, कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या प्रकाशकांना जरा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्याचे घोंगडे अद्याप भिजतच पडले आहे. महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाची पुस्तके रसिकांना सहज मिळत नाहीत. संमेलनात या आणि यासारख्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर ठोस काही होणे अपेक्षित आहे. संमेलन कोठेही असो, अध्यक्ष कोणीही असो, कितीही वाद होवोत, याचा काही एक परिणाम न होता वारकर्‍यांच्या भक्‍तिभावाने संमेलनाला येणारा एक घटक असतो, तो म्हणजे खरा साहित्यरसिक! आवडत्या लेखकांना पाहणे, ऐकणे, वैचारिक मंथन अनुभवणे, कवितांचा आस्वाद घेणे, समविचारी रसिकांशी चर्चा करणे आणि भरपूर पुस्तके खरेदी करून तृप्त मनाने घरी परतणे, असा त्याचा रिवाज असतो. त्याच्यासाठी हा वर्षभराचा आनंदाचा ठेवा असतो. अशा आस्वादकांसाठी साहित्य संमेलने होणे आणि ती निर्विघ्न पार पडणे आवश्यक असते. कोणतेही संमेलन कधीच एका गावाचे नसते. तसे ते असूही नये. समस्त साहित्यरसिकांचे कार्य म्हणूनच त्याकडे पाहिले जावे. म्हणूनच ओमायक्रॉनचे सावट, एसटीचा संप यासारख्या अडचणींवर मात करून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी नाशिककरांच्या खांद्याला खांदा लावून सार्‍यांनीच झटायला हवे. तीच या संमेलनाची साद आहे. बाकी उणीदुणी काढण्यासाठी पुढच्या संमेलनापर्यंत वेळ आहेच! 94 व्या साहित्य संमेलनाला शुभेच्छा!

Back to top button