मानवी तस्करी : महिलांची तस्करी रोखण्याचे आव्हान! - पुढारी

मानवी तस्करी : महिलांची तस्करी रोखण्याचे आव्हान!

मानवी तस्करी ही भारतात नवीन नाही. गरीब, अनाथ, निराधार कुटुंबांतील मुलींची तस्करी ही चिंतेची बाब मानली गेली आहे. त्यामुळे महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील गरीब मुली भूलथापांना बळी पडतात आणि नको त्या गोष्टीत अडकवल्या जाताहेत. याबाबत जनजागृती करण्यासह कायदे आणखी कठोर करणे आवश्यक आहेच.

संयुक्‍त राष्ट्र संघाच्या व्याख्येनुसार, एखाद्या व्यक्‍तीला बलप्रयोग करून, भीती दाखवून, धोक्याने किंवा हिंसक पद्धतीने, तस्करी किंवा बंधक बनवून ठेवण्याला मानवी तस्करी म्हटले जाते. यामध्ये पीडित व्यक्‍तीकडून देहव्यापार, घरगुती काम, गुलामी, त्याच्या मनाविरुद्धचे काम करवून घेतले जाते. केवळ एका देशाच्या सीमेतून दुसर्‍या देशाच्या सीमेत माणसे पाठविणे याला मानवी तस्करी म्हणता येणार नाही. या प्रकारासोबत इतरही काही गोष्टी जुळलेल्या असतात. लहान मुलांना शोषणकारी परिस्थितीत सहभागी करून घेणेसुद्धा मानवी तस्करी मानले जाते. जागतिक पातळीवर मानवी तस्करी हा विषय नेहमीच चर्चेत रहिला आहे. विकसित, विकसनशील आणि आखाती देशांमध्ये याचे प्रमाण अधिक असून सामान्यतः आर्थिकद‍ृष्ट्या गरीब असलेल्या देशांमधून मानवी तस्करी केली जाऊन त्यांच्याकडून वाट्टेल तसे काम करवून घेतले जाते. भारतातही हा उद्योग पाय पसरत आहे.

गेल्या काही महिन्यांत देशात केवळ मुलींचीच संख्या कमी नाही, तर ते बेपत्ता होण्याचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. बालमजुरी आणि वेश्या व्यवसायात बेपत्ता मुलींना ढकलण्यात येत असल्याचे धक्‍कादायक वास्तव सांगितले जात आहे. नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) अहवालात काही खळबळजनक माहिती उघडकीस झाली आहे. 2020 या वर्षात 845 अल्पवयीन मुली, तर 18 पेक्षा अधिक वयोगटातील 1952 महिला बेपत्ता झाल्या. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण केरळ राज्यात सर्वाधिक 156 आहे, तर झारखंडमध्ये 98 आणि ओडिशामधील 81 मुली गायब झाल्या आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वाधिक 462, तेलंगणातून 393, ओडिशातून 206 आणि आंध्र प्रदेशातून 204 महिला गायब झाल्या आहेत. विशेेष म्हणजे, देशभरात 2019 मध्ये 48,972 अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झालेले असताना कोरोना काळात ही संख्या आश्‍चर्यकारकरीत्या वाढली. 2020 मध्ये हीच संख्या 59,262 वर पोहोचली. केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत असलेल्या ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार बेपत्ता होण्यात सर्वाधिक अल्पवयीन मुली या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशातील आहेत. या प्रकरणात मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचा संशय व्यक्‍त होत आहे. त्यांना देहविक्री आणि बालमजुरीत ढकलण्यात येत असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. मानवी तस्करी विरोधी युनिटच्या तपासात 1,466 प्रकरणाचे कनेक्शन वेश्या व्यवसायापर्यंत असल्याचे निष्पन्‍न झाले. अशा प्रकारचे सर्वाधिक केसेस महाराष्ट्र 541, तेलंगणात 362 आणि आंध्र प्रदेशात 200 आहेत. परंतु, मानवी तस्करी ही केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण आशिया खंडात वेगाने वाढत चालली आहे आणि याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा बेकायदा धंदा कोट्यवधी रुपये कमावण्याचा मार्ग झाला आहे. समाजातील तथाकथित सुधारक आणि नेत्यांच्या नाकाखाली मानवी तस्करीचा गोरखधंदा वेगाने वाढत चालला आहे. हा व्यवसाय मानवता, सभ्यता आणि कायदा व व्यवस्थेबरोबरच आपल्या धार्मिक मूल्यांना हानी पोहोचवत आहे. त्यामुळे सामाजिक व्यवस्थेचे समतोल ढासळत चालला आहे.

भारताच्या विविध राज्यांत जसे की दिल्ली, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आदींत अन्य राज्यांतील गरीब, निराधार कुटुंबातील मुलींना लग्‍नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्यात येते. हे समाजकंटक मुलींची तस्करी करतात आणि त्यांना मुंबई, कोलकाता किंवा परदेशात पाठवतात. काही वेळा खोटेनाटे लग्‍न लावून अन्यत्र नेण्यात येते. त्यानंतर मोठी रक्‍कम घेऊन त्यांना अन्य राज्यांत विकण्यात येते.

पूर्वोत्तर राज्य पश्‍चिम बंगाल, ओडिशांतील महिला आणि मुली, तसेच पंजाब आणि हरियानासह महिला-पुरुष यांचे विषम प्रमाण अधिक असलेल्या राज्यांत जबरदस्तीने विवाह केला जातो. अशा प्रकारची प्रवृत्ती वाढण्यामागे प्रमुख कारण म्हणजे कन्या भ्रूणहत्या.

गेल्या काही वर्षांत अनेक राज्यांत स्त्री भू्रणहत्येचे प्रमाण वाढले आहे. मुलगाच हवा, वंशाला दिवा हवा ही मनोवृत्ती अजूनही शिक्षित आणि अशिक्षित लोकांत छुप्या स्वरूपात दडलेली आहे. त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी केली जाते आणि मुलगा असला, तरच गर्भ ठेवण्यात येतो अन्यथा गर्भपात केला जातो. या कारणांमुळे मुलींचे प्रमाण प्रचंड घसरले आहे. त्याचवेळी मुलींच्या विषम संख्येमुळे त्यांची तस्करांकडून खरेदी केली जात असून शहरातील मोठमोठे हॉटेल, बार, डान्स क्लब, बॉडी मसाज सेंटरमध्ये कॉल गर्ल म्हणून वापर केला जात आहे. त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात येत आहे. हा एक उत्पन्‍नाचा मोठा स्रोत म्हणून समाजकंटक त्याकडे पाहत आहेत. एवढेच नाही, तर कमी वयाच्या मुलींना इंजेक्शन देऊन त्यांचे शरीर काळाच्या अगोदरच पूर्णपणे विकसित केले जात आहे. पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी समाजकंटक अतिशय खालच्या थराला पोहोचले आहेत. भारतीय महिला आणि मुलींसमवेत पश्‍चिम आशिया आणि एवढेच नाही, तर युरोप आणि अमेरिकेत तात्पुरता विवाह करणे ही सामान्य बाब मानली जात आहे. अशा विवाहांच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषणही होते. कौटुंबिक हिंसाचारापासून वाचण्यासाठी घरातून पळून जाणार्‍या महिला आणि बालविवाहाला बळी पडलेल्या मुली या मानवी तस्कराच्या जाळ्यात अडकत आहेत. मोठमोठ्या शहरांत युवतींना मॉडेल करण्याचे, चित्रपटात काम मिळवून देण्याचे, नाटकात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले जाते. खोटेनाटे स्वप्ने रंगविली जातात. यास काही मुली बळी पडतात आणि नको त्या ठिकाणी अडकतात. एकंदरीत मानवी तस्करी रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन व्यापक मोहीम हाती घ्यायला हवी. केंद्र आणि राज्य सरकारांनी ग्रामीण पातळीवर गरिबांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्वयंरोजगार स्थापन करण्याच्या हेतूने कुटीर उद्योग आणि व्यवसाय स्थापन करण्यासाठी युद्धपातळीवर काम करायला हवे. कौटुंबिक हिंसाचार संपवण्यासाठी कायदेशीर पातळीवर व्यापक अभियान राबवण्याची गरज आहे. हुंडा प्रथेचे उच्चाटन करायला हवे. मानवी तस्करी करणार्‍या गुन्हेगारांना, समाजकंटकांना तातडीने शिक्षा दिल्यास अशा अपप्रवृत्तींना वेळीच पायबंद बसू शकतो.

– डॉ. जयदेवी पवार

Back to top button