रशिया च्या क्षेपणास्त्राचा धोका | पुढारी

रशिया च्या क्षेपणास्त्राचा धोका

रशिया मध्ये उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतली आणि आपलाच एक उपग्रह नष्ट केला. अमेरिकेसह ब्रिटनने या चाचणीवर जोरदार आक्षेप घेतला असून, अंतरिक्ष युद्धाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. याखेरीज या चाचणीमुळे उपग्रहाचे हजारो तुकडे अवकाशात भरकटले असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकासह विविध देशांच्या अंतरिक्ष मोहिमांना धोका निर्माण झाला आहे.

रशिया मध्ये नुकत्याच केलेल्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिका नाराज झाली आहे. या क्षेपणास्त्र चाचणीद्वारे रशियाने आपलाच एक उपग्रह नष्ट केला. त्या उपग्रहाचे जे अवशेष अंतरिक्षात तरंगत आहेत, त्यामुळे अन्य उपग्रहांना धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेने ही चाचणी ‘अत्यंत धोकादायक आणि बेजबाबदारपणाची’ असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, या चाचणीमुळे आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर राहणार्‍या अंतरिक्ष शास्त्रज्ञांच्या जीविताला धोका उत्पन्‍न झाला आहे. या चाचणीदरम्यान रशियाने आपलाच एक उपग्रह नष्ट केला. त्याचे अवशेष अंतरिक्ष कचर्‍याच्या रूपात सर्वत्र विखुरले आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकाच्या चालकाला त्याच्या कॅप्सूलमध्ये लपून राहावे लागले. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर सध्या सात अंतरिक्ष प्रवासी आहेत. यातील चार अमेरिकी, दोन रशियन आणि एक जर्मनीचा आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते नेड प्राईस यांनी सांगितले की, 16 नोव्हेंबरला रशियाने आपल्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यासाठी आपलाच एक उपग्रह नष्ट केला. यामुळे निर्माण झालेले उपग्रहाचे 1,500 पेक्षा अधिक तुकडे आणि मोठ्या प्रमाणावर अंतरिक्ष कचरा तयार झाला आणि तो सर्वच देशांसाठी घातक आहे.

या चाचणीनंतर उपग्रहाचे तुकडे जेव्हा कक्षेत आले तेव्हा त्याबाबत कोणतीही माहिती नव्हती. परंतु, नंतर हे तुकडे कुठून आले, याची माहिती समजली. हे तुकडे रशियाच्या ‘कॉसमॉस-1408’ उपग्रहाचे होते. हा एक टेहळणी उपग्रह होता आणि 1982 मध्ये तो अंतरिक्षात सोडण्यात आला होता. अनेक टन वजनाचा हा मोठा उपग्रह काही वर्षांपूर्वी निष्क्रिय करण्यात आला होता. लियोलॅब या अंतरिक्ष कचरा शोधणार्‍या कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी गेली काही वर्षे एक निष्क्रिय उपग्रह दिसत होता, त्या ठिकाणी कचर्‍याचे असंख्य तुकडे कंपनीच्या न्यूझीलँडमधील रडार सेवेला आढळून आले. प्राईस यांच्या म्हणण्यानुसार, धोका अद्याप टळलेला नाही. या चाचणीमुळे आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावरील प्रवाशांबरोबरच अन्य देशांच्या अंतरिक्ष यानांनाही धोका निर्माण होईल. रशियाची ही धोकादायक आणि बेजबाबदारपणाने केलेली चाचणी अंतरिक्षातील स्थैर्य धोक्यात घालणारी ठरणार आहे. त्याचप्रमाणे अंतरिक्षाचे युद्धभूमीत रूपांतर करण्यास रशियाचा असलेला विरोध हे एक नाटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिका आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने या बेजबाबदार कृतीला उत्तर देईल, असे त्यांनी म्हटले आहे.

तज्ज्ञांच्या मते, उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यामुळे जे तुकडे इतस्ततः फैलावतात त्यांच्या वेगामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य असते. या चाचणीमुळे हजारो धोकादायक तुकडे अंतरिक्षात पसरले आहेत. त्यातील काही खाली पृथ्वीच्या दिशेने येतील, तर काही तुकडे अंतरिक्षातच फिरत राहतील आणि भविष्यात रशियासह इतर देशांच्या मोहिमांनाही त्या तुकड्यांमुळे धोका निर्माण होईल. अंतरिक्षात कचरा वाढतच चालला आहे. आपल्या सर्वांच्या डोक्यावर गेल्या 64 वर्षांपासून अनेक घडामोडी अनेक देशांनी घडवून आणल्या आहेत आणि त्याचाच अर्थ, अंतरिक्षात कोट्यवधी तुकडे अनियंत्रित स्वरूपात फिरत आहेत. या तुकड्यांचा आकार एक सेंटिमीटरपासून दहा सेंटिमीटरपर्यंत आहे. हवामानाचा अंदाज आणि टेलिकम्युनिकेशन या कारणांसाठी सोडण्यात आलेल्या उपग्रहांवर या तुकड्यांचा सर्वाधिक परिणाम होईल. अंतरिक्षातील हे वातावरण साफ करण्याची सध्या गरज आहे. परंतु, त्याउलट ते अधिकाधिक प्रदूषितच होत चालले आहे.

भारत, अमेरिका, रशिया आणि चीनसारखे देश पृथ्वीवरूनच उपग्रहांना कक्षेतून बाहेर काढण्यास सक्षम आहेत. अशा प्रकारची क्षेपणास्त्र चाचणी घेणे हीसुद्धा एक दुर्मीळ घटना आहे.

– विनिता शाह

Back to top button