अग्रलेख : ओमायक्रॉनचे आव्हान | पुढारी

अग्रलेख : ओमायक्रॉनचे आव्हान

आफ्रिकी देशांत झपाट्याने पसरणार्‍या ‘ओमायक्रॉन’ या कोरोना विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्या देशाने घाबरून जाण्याचे आणि अतिरेकी निर्बंध लागू करण्याचे तूर्तास कारण नाही. इतर विषाणूंप्रमाणे जनुकीय संरचना बदलत राहणे हा कोव्हिड-19 या विषाणूचा स्थायीभाव. मात्र, कोव्हिडच्या विषाणूच्या संरचना बदलाचा म्हणजे म्युटेशनचा वेग इतरांपेक्षा अधिक आहे. हा विषाणू पृथ्वीतलावर अवतीर्ण झाल्यापासून आतापर्यंत त्याची संरचना तब्बल 32 वेळा बदलली. आता नव्याने ओमायक्रॉन किंवा बी.1.1.529 नामक अवतार समोर आला आहे. कोरोनाच्या आधीच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा या अवतारांनंतर आलेल्या या अवताराच्या संसर्गाची तीव्रता आपल्या देशातील दुसर्‍या लाटेस कारणीभूत ठरलेल्या डेल्टा विषाणूच्या तुलनेत सहापट अधिक. त्यामुळेच या ओमायक्रॉनपासून सतर्क राहणे खूप गरजेचे. कोरोनाची चौथी, पाचवी लाट पाश्चात्त्य देशांत वेगाने पसरत असताना आपल्या देशाने मात्र दुसर्‍या लाटेनंतर येऊ शकणारी तिसरी लाट आतापर्यंत तरी थोपवून धरली. त्यामुळेच सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची, निर्बंधांत शिथिलता आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि जनमानसालाही धीर आला. आपल्या राज्यात आतापर्यंत सुमारे 85 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला.लसीकरणाचे उद्दिष्ट नऊ कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे होते. त्यापैकी सात कोटी 36 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला. याचाच अर्थ अजून दीड कोटींहून अधिक नागरिकांनी पहिलाच डोस घेतलेला नाही. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या तीन कोटी 93 लाख म्हणजे चार कोटींच्या आसपास आहे. म्हणजेच दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी अजून पाच कोटी नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक ठरते. म्हणजेच महाराष्ट्राने लसीकरणाबाबत देशात दुसरा क्रमांक पटकावला असला तरी आपल्याला आणखी बरीच मजल मारायची आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेतलेच पाहिजे. ही झाली नागरिकांच्या पातळीवरील दक्षता, त्याचबरोबर सरकारी पातळीवरही कडेकोट खबरदारी आवश्यक ठरते. कोरोनाचा प्रवेश आपल्या देशात झाला तो हवाई मार्गाने. म्हणूनच आताही हवाई वाहतुकीवरील निर्बंध वेळेवर आणि कडक लागू करण्याची गरज आहे. आफ्रिकी देशांतून भारतात येणारी विमाने थांबविण्याबाबतचा योग्य तो निर्णय घ्यायला हवा. अमेरिका, ब्रिटन यांसह एकूण 16 देशांनी या प्रवासी वाहतुकीवर बंदी घातली. भारताने केवळ काही निर्बंध जारी केले. विमान वाहतूक थांबविणे अशक्य असेल तर प्रवाशांची कडक तपासणी आणि निर्बंध, नियम लावण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी प्रतिपादित केली आहे. याआधीचा कटू अनुभव पाहता या प्रकारचे निर्बंध लादताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. गृहविलगीकरणात असलेला प्रवासी हा बाहेर फिरणारच नाही, याची खात्री कोणी देऊ शकत नाही. तसेच तो घरात राहिला तरी घरातील सदस्यांपासून वेगळा राहून स्वतःची आणि इतरांची काळजी घेईल, याकडेही लक्ष पुरविणे अवघड आहे. प्रवाशाची विमानतळावर चाचणी केल्यावर ती चाचणी रुग्ण बाधित असतानाही निगेटिव्ह येऊ शकते. कारण तो काळ इनक्युबेशन पिरियड (शरीरात रोगजंतूंनी प्रवेश मिळविल्यानंतर प्रत्यक्ष रोगास आरंभ होईपर्यंतचा काळ) असू शकतो. हाही मोठा धोका आहे. कोव्हिडच्या पहिल्या संसर्गालाही अशीच सुरुवात झालेली होती. परदेशी प्रवाशांच्या माध्यमातून तो वाढला आणि नंतर त्याची संसर्ग साखळी शोधणे मुश्कील झाले. असे होऊ द्यायचे नसेल तर परदेशी प्रवाशांना सक्तीने त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना लक्षणे वाढल्यास तत्काळ चाचणी जनुकीय क्रमरचना तपासणी करून ओमायक्रॉनची शक्यता तपासून पाहणे आणि जर ओमायक्रॉनचा विषाणू असेल तर त्या व्यक्तीला विशेष उपचार किंवा उपचाराबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे आवश्यक झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. या विषाणूमध्ये अनेकदा बदलही झाले. याआधी अल्फापासून डेल्टापर्यंत म्युटेशन झालेल्या विषाणूंची उत्पत्ती झाली आणि आता ओमायक्रॉनचे संकट संपूर्ण जगापुढे उभे राहिले आहे; पण विषाणू म्हटल्यावर म्युटेशन होणे आलेच. त्यातील काही म्युटेशन हे विषाणूसाठी आणि काही मानवजातीसाठी हानिकारक असतात. त्यापैकी ओमायक्रॉन हा एक आहे. याचा अर्थ असा की, भविष्यातदेखील असे विषाणू येतच राहतील; पण त्यापासून बचाव करण्यासाठी असणारे नियम मात्र तेच आहेत आणि तेच राहतील. ओमायक्रॉनला घाबरण्याचे कारण नाही; पण लसीकरण आणि कोव्हिड सुसंगत वर्तणूक महत्त्वाची आहे, असे मत आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनीही व्यक्त केले असून, तेही महत्त्वाचे ठरते. ओमायक्रॉनचा धोका आपल्या देशात कमी आहे. कारण, जगाच्या तुलनेत आपले लसीकरण खूप उशिरा झाले, तोवर सामूहिक रोगप्रतिकारशक्ती बर्‍यापैकी वाढलेली होती. त्यामुळे डेल्टा प्लसचा प्रभाव आपल्याकडे जास्त दिसला नाही. आता लसीकरण चांगले झालेले आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका फारसा संभवत नाही. मात्र, काळजी घेणे गरजेचेे. गर्दीच्या ठिकाणी न जाणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे हेच साधे उपाय ओमायक्रॉनसाठी लागू आहेत. ही खबरदारी घेतली तर ओमायक्रॉनचा संसर्ग झाला तरी तो फारसा तापदायक ठरणार नाही, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. याचे कारण म्हणजे लसीकरणाचा वाढलेला टक्का व सामूहिक रोगप्रतिकारशक्ती हे होय. तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग हाताळण्यासाठी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. या नव्या आव्हानाला सामोरे जाताना जुना अनुभव सर्वच पातळ्यांवर कामी येणार आहे. त्यामुळे यावेळी ओमायक्रॉन विषाणू आलाच तर त्याचा मुकाबला करताना वेळ जाणार नाही, प्राणहानीही टाळता येऊ शकेल. तरीही खरे आव्हान असेल ते सरकार, आरोग्यव्यवस्था आणि नागरिकांसमोर!

Back to top button