शीर्षक वाचून अजिबात दचकून जाऊ नका. हा एक साधा प्रश्न आहे की, तुमच्या मेंदूवर नेमका कुणाचा ताबा आहे? याचे उत्तर एकच एक असणार नसून अनेक व्यक्ती, घटना, परिस्थिती तुमच्या मेंदूवर ताबा मिळवत असतात आणि त्याप्रमाणे तुम्ही वागत असता. विवाहित पुरुषांच्या मेंदूवर जवळपास संपूर्ण ताबा त्याच्या पत्नीचा असतो. ती म्हणेल तसेच वागावे लागते. तिचे निर्णय अंतिम असतात आणि त्या निर्णयांना पर्याय नसतो. म्हणजे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विवाहित पुरुषाच्या मेंदूवर त्याच्या पत्नीचा ताबा असतो, हे सहज सिद्ध करता येईल.
शिवाय, त्याची मुलेे, आई-वडील आणि इतर नातेवाईक हे आपापल्या परीने त्याच्या मेंदूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. एखादी घटना घडल्यानंतर मन सैरभैर आणि चित्त विचलित होते, याचा अर्थ तुमच्या मेंदूचा ताबा त्या घटनेने घेतला आहे. कधी कधी परिस्थिती आक्रमण करत असते. उदाहरणार्थ, समजा तुमच्या भागातील लाईट गेली आणि ती रात्रभर आली नाही, तर तुमचे डोके फिरण्याची वेळ येते. याचा अर्थ, त्या नसलेल्या लाईटने म्हणजे अद़ृश्य ऊर्जेने तुमच्या मेंदूचा ताबा घेतला आहे, हे सिद्ध होते.
हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर नावाचे यंत्र वापरले जाते. हे छोटेसे यंत्र व्यक्तीच्या दंडामध्ये बसवले जाते आणि तिथून विद्युत प्रवाह सोडून हृदयाकडे किती रक्त जावे, याचे नियंत्रण करून त्या व्यक्तीचा रक्तदाब नियमित ठेवण्याचे काम हे छोटेसे यंत्र करत असते. अॅलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने थेट मेंदूमध्ये बसवायची मायक्रोचिपच तयार केली आहे. सुरुवातीचे संशोधन मज्जासंस्थेचा रोग असणार्या लोकांसाठी केले गेले असले, तरी ते उद्या सर्वसामान्य माणसासाठी वापरता येईल, अशीही शक्यता आहे. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये हा एक विक्रम असणार आहे.
याचे काही तोटे असणार, तर काही फायदे असणार आहेत. म्हणजे माणसाला स्वतःची बुद्धिमत्ता वापरायची गरजच पडणार नाही. मायक्रोचिप सांगेल त्याप्रमाणे त्याला वागावे लागेल; कारण त्याचा मेंदू त्याप्रमाणे वागायला लागेल. एखाद्या विवाहित जोडप्याचा वाद होऊन समजा केस घटस्फोटापर्यंत आली, तर ही मायक्रोचिप दोन्हीपैकी एका जोडीदाराच्या डोक्यात बसवून दुसर्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला वागायला लावून, असे घटस्फोट टाळता येतील. कार्यालयीन कर्मचार्यांच्या डोक्यात मायक्रोचिप बसवून सरकारी साहेब लोक अधिनस्त कर्मचार्यांच्या बुद्धीचे नियंत्रण करू शकतील.
खासगी कंपन्याही आपल्या कर्मचार्यांच्या मेंदूमध्ये मायक्रोचिप बसवून त्यांच्याकडून विनातक्रार 18 ते 20 तास कामही करून घेऊ शकतील. मायक्रोचिप बसवून दुसर्याचा मेंदू नियंत्रित करण्याचे तंत्र सर्वत्र आले, तर जगभर एकच गहजब उडेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वतंत्र विचार करण्याची तुमची बुद्धिमत्ता कुंठित होऊन, स्वतंत्र विचार किंवा त्याप्रमाणे अभिव्यक्ती करण्याची क्षमता संपली, तर संपूर्ण जग हे यांत्रिक पद्धतीने काम करायला लागेल आणि त्यामध्ये कुठेही भावना हा विषय नसेल. मेंदू हा संवेदनशील असतो आणि त्याच्यावर नियंत्रण झाले की, भावनांचा विषय संपून जाईल.