ई-कॉमर्सचा नवा धोका | पुढारी

ई-कॉमर्सचा नवा धोका

- ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांचे बळी घेणार्‍या दहशतवाद्यांनी बॉम्बसाठीचे साहित्य अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स व्यासपीठाच्या माध्यमातून मागवले गेल्याचा आरोप आहे. अफू, चरस, गांजाचीही खरेदी ई-कॉमर्सच्या माध्यमातून होते, हे आरोप खरे की खोटे, हे यथावकाश समोर येईल; पण यातून धोक्याची घंटा वाजली आहे. असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी कायदेशीर उपाययोजना करणे गरजेचे आहे

अलीकडेच एक धक्कादायक बातमी समोर आली. यामध्ये दोन गंभीर आरोप केलेले आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले स्फोटक पदार्थ दहशतवाद्यांनी अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळावरून खरेदी केले होते. ‘कॅट’ अर्थात कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने अ‍ॅमेझॉनवर देशविघातक कृत्यातील सहभागाचा हा गंभीर आरोप केला. इतकेच नव्हे, तर या प्लॅटफॉर्मविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली. याबरोबरच भारतात अतिशय मोठ्या प्रमाणात विकल्या जाणार्‍या अफू, गांजा आणि चरसची विक्रीसुद्धा अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून राजरोस सुरू असल्याचे आरोप आहेत. अर्थातच, हे दोन्हीही आरोप अत्यंत गंभीर असून त्याची मुळापासून चौकशी करणे गरजेचे आहे.

या विषयाच्या तपशीलात जाताना सर्वात प्रथम हे लक्षात घ्यायला पाहिजे की, बॉम्ब बनवण्यासाठीचे स्फोटक पदार्थ, त्यांना लागणारी बॅटरी, ट्रिगर आदी बहुतांश साहित्य देशाच्या बाहेरून येते. प्रामुख्याने पाकिस्तानमधून किंवा चीनमधून किंवा इतर शत्रू राष्ट्रांमधून चोरट्या तस्करीमार्गे ते भारतात आणले जाते. भूमार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग अशा तिन्ही माध्यमातून त्यांची तस्करी केली जाते. म्हणजे आकाशातून आणले गेले, तर ते विमानतळावर येईल, समुद्रामार्गे आले तर बंदरातून त्याचे स्मगलिंग किंवा बेकायदेशीर आणले जाईल. जमिनीवरुन आले, तर त्याचे स्मगलिंग करून देशात आणले जाईल. एकदा का ते देशात आणले गेले की, तेथून त्यांना सदर साहित्य ज्या व्यक्तीला, ज्या ठिकाणी पोहोचवायचे आहे, तिथवर पोहोचवण्यासाठी सुयोग्य रणनीती आखलेली असते. यामध्ये एक मोठी साखळी कार्यरत असते. उदा. एखादा पदार्थ काश्मीरच्या एलओसीवरून उरीमध्ये आणला, तर तेथून एक व्यक्ती ते कुरिअर श्रीनगरला पोहोचवतो. तेथून दुसरे कुरिअर त्याला जेथे हवे तिथे पोहोचवले जाते. तेथून मग जो दहशतवादी स्फोट करणार आहे, त्याच्याकडे पाठवले जाते. यामध्ये अनेक माणसे वापरली जातात. आजही ही छुपी साखळी कार्यरत आहे; परंतु अलीकडील काळात अ‍ॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपनीने या साखळीचे काम सोपे केले आहे. ज्या व्यक्तीला असे साहित्य हवे आहे, तो थेट अ‍ॅमेझॉनवरून अथवा अन्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑर्डर करून मागवू शकतो. अ‍ॅमेझॉनचे डिलीव्हरी बॉय दिवसातले 14-15 तास कोणते ना कोणते पार्सल घेऊन शहरात या ना त्या ठिकाणी वावरत असतात. त्यांना कोणी अडवून तपास करत नाही. यामुळे कुठलाही संशय न येता, कुठलाही धोका न पत्करता दहशतवाद्यांचे समर्थक आपले काम फत्ते करतात. सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलिस किंवा शेजार-पाजार्‍यांना जराही मागमूस लागत नाही. कारण, पार्सल कोणालाही फोडून पाहता येत नाही. त्यामुळे जिथून त्याची मागणी केली आहे, तिथून सदर व्यक्तीच्या हाती ते थेट पोहोचते.

याशिवाय अफू, गांजा, चरस यासारखे अमली पदार्थही अ‍ॅमेझॉनच्या मदतीने पाठवले जाऊ शकतात. समजा मणिपूरमध्ये सीमेवरील तपासणीला चकवा देऊन अफू, गांजा, चरस भारताच्या हद्दीत आणले की, तेथून कुरिअर करून ते मणिपूरची राजधानी इंफाळपर्यंत पोहोचवले जाते. यानंतर दुसरे कुरिअर इंफाळपासून गुवाहाटीपर्यंत पोहोचवले जाते. तिसरे कुरिअर गुवाहाटीपासून कोलकात्यापर्यंत पाठवले जाते. चौथे कुरिअर दिल्ली किंवा इतर महानगरांमध्ये पाठवले जाते. अशा प्रकारे ही साखळी सहज कार्य करत राहते. या साखळीतील एखाद्या व्यक्तीला पकडून फारसे काही हाताशी लागण्याच्या शक्यता कमी असतात. कारण, पहिले कुरिअर पाठवणार्‍याला माहीतच नसते की, त्या पाकिटात काय आहे. तो फक्त पैशाच्या मोबदल्यात ते पाकीट दुसर्‍याला देतो. तशाच प्रकारे दुसरा तिसर्‍याला देतो. ही झाली आजवरची पारंपरिक पद्धत. गेल्या काही वर्षांत ई-कॉमर्समुळे घरबसल्या सामान मागवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रात दिग्गज कंपन्या उतरल्या असून त्यांच्या अ‍ॅपवरून साहित्याची ऑर्डर दिली की काही तासांत, दिवसांत घरबसल्या ते साहित्य उपलब्ध होते. याचा फायदा समाजविघातक शक्ती घेत आहेत. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपनीच्या माध्यमातून एखादी व्यक्ती कोणतेही साहित्य थेट त्याला हव्या त्या व्यक्तीच्या घरी पाठवू शकते. यामध्ये साहजिकच खर्च कमी होतो. विविध टप्प्यांवर वेगवेगळी माणसे वापरण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने धोका कमी होतो. त्यामुळे देशविरोधी तत्त्वांनी ही नवी प्रणाली वापरण्यास सुरुवात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यात बर्‍याच अंशी तथ्य असण्याची शक्यता आहे.

दुर्दैवाने ई-कॉमर्स कंपनीबाबत जे कायदेशीर नियम आहेत, ते अजून अस्पष्ट आहेत. बदलत्या काळात आपल्याला यामध्ये स्पष्टता आणावी लागेल. त्यानुसार ई-कॉमर्स कंपन्या कोणते साहित्य घेऊन जाऊ शकतात आणि काय घेऊन जाऊ शकत नाहीत, याबाबत नियमावली ठरवून दिली गेली पाहिजे. यामध्ये नॅशनल इनव्हेस्टीगेशन एजन्सीसारख्या राष्ट्रीय संस्थेने तपासणी केली पाहिजे, तरच या गैरप्रकारांना आळा बसू शकेल. दहशतवादी आणि त्यांचे समर्थक उलटी कामे करण्यासाठी, दहशतवादी हल्ले करण्यासाठी नार्कोटिक्स टेररिझम देशामध्ये वाढवण्यासाठी वेगवेगळ्या, अभिनव पद्धती वापरून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करताहेत. सबब, सुरक्षा एजन्सीजनी त्यांच्या एक पाऊल पुढे असायला पाहिजे. ज्या नवनवीन पद्धती वापरात आणल्या जातात, त्याच्यावर विचार करून त्यांना कसे थांबवायचे, याबाबत विचारमंथन झाले पाहिजे आणि त्यानुसार योग्य कारवाई केली पाहिजे. तसे झाले तरच नार्को टेररिझमला आळा घालता येईल. म्हणून गरज आहे ती आपण सगळ्यांनी कान आणि डोळे उघडे ठेवून देशाला सुरक्षित करण्याची! कारण, शेवटी सुरक्षा एजन्सीजच्या कामालाही मर्यादा आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी याबाबत सजग राहणे गरजेचे आहे.

Back to top button