जनसेवेची साडेआठ दशके

जनसेवेची साडेआठ दशके

Published on

पंचाऐंशी वर्षांची प्रदीर्घ वाटचाल उत्तरोत्तर यशस्वीपणे पूर्ण करून नववर्षदिनी दै. 'पुढारी' आता शहाऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहे. साडेआठ दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात अनेक संघर्षांत 'पुढारी'ने नेतृत्व केले. स्वतंत्र मानदंड निर्माण केला. या वाटचालीत वाचकांचे आणि 'पुढारी'चे अभेद्य असे अद्वैतच निर्माण झाले. वाचकांच्या या ऐक्यामुळेच 'पुढारी' म्हणजे वृत्तपत्र, असे समीकरण रूढ झाले. 'पुढारी' हे सर्वनाम बनले. वाचकांच्या या अलोट स्नेहवर्षावापुढे आम्ही नतमस्तक आहोत. साप्ताहिकाचे रूपांतर दैनिकात झालेली अनेक उदाहरणे आहेत; मात्र 1937 मध्ये 'पुढारी' साप्ताहिक स्वरूपात सुरू झाला व 1 जानेवारी 1939 रोजी दैनिक आणि नियमित स्वरूपातच 'पुढारी'चा प्रारंभ झाला.

'पुढारी'चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी 'पुढारी'चे इवलेसे रोपटे लावले. त्याचा आता महावृक्ष बनला आहे. बड्या साखळी वृत्तपत्रांच्या लाटेत बहुतांश जिल्हा पत्रे बंद झाली. 'पुढारी' मात्र अपवाद ठरला. एवढेच नव्हे, तर 'पुढारी'ने लाट परतवून लावली आणि त्यांना टक्कर देत महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात सर्वदूर विस्तार केला. ध्येयवाद आणि सामाजिक बांधिलकीच्या भक्कम पायावर 'पुढारी'ची स्थापना झाली आहे. 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी स्वातंत्र्य लढ्यात काम केले होते. महात्मा गांधी यांचा निकट सहवास त्यांना लाभला होता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत काळाराम मंदिर सत्याग्रहासह अनेक लढ्यांत ते आघाडीवर होते. मुंबईत नेकनामदार भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, मामा वरेरकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर अशा मातब्बरांच्या सहवासात त्यांच्या पत्रकारितेची जडणघडण झाली. कोल्हापुरातील पत्रव्यवसाय तेव्हा चाकोरीतील होता. ग. गो. जाधव यांनी 'पुढारी'त आधुनिक पत्रकारितेची सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळ आणि दुसरे महायुद्ध यांच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी त्यांनी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची खास प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. दक्षिण महाराष्ट्रातील सहकार, कूळ कायद्याचे प्रश्न, कोयना धरण उभारणी, शिवाजी विद्यापीठ उभारणी अशा अनेक प्रश्नांना चालना देत त्यांनी वास्तवदर्शी आणि सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेचा आविष्कार घडवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा 'पुढारी'ने हिरिरीने पाठपुरावा केला. गोवा मुक्ती संग्रामाची कोल्हापुरातील पहिली तुकडी 'पुढारी'तूनच रवाना झाली होती. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा आणि सोडवणूक 'पुढारी'च्या व्यासपीठावरून तेव्हापासूनच होत आली आहे.

कोयना, लातूर, कच्छचा भूकंप, कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील महापुरांची आपत्ती अशा अनेक नैसर्गिक आपत्तीवेळी 'पुढारी' आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून गेला. 1999 मध्ये कारगील युद्धावेळी आपल्या जवानांनी विजयश्री खेचून आणली. या जवानांना सियाचीनसारख्या जगातील उत्तुंग रणभूमीवर शून्य तापमानाखाली कमालीच्या थंडीत अहोरात्र सज्ज राहावे लागे. हिमदंशासारख्या आजारांना तोंड द्यावे लागे. जवानांवर उपचारांची काहीच सोय नव्हती. हे लक्षात येताच, आम्ही सियाचीन हॉस्पिटलची योजना तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यापुढे मांडली आणि अडीच कोटींचा भरीव निधी उभारून सियाचीन हॉस्पिटलची उभारणी केली.

गेल्या बावीस वर्षांत हॉस्पिटलला लागणारी उपकरणे आणि वस्तूही आम्ही पुरवीत आहोत. अशा प्रकारचे हॉस्पिटल उभारणीचे कार्य हे वृत्तपत्रीय इतिहासातील एकमेव असे देशकार्य आहे. 1974 मध्ये छ. शिवाजी महाराज राज्याभिषेक त्रिशताब्दी आणि राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दीसाठी आम्हीच पुढाकार घेतला. सीमा प्रश्नात आम्ही प्रथमपासूनच आघाडीवर राहून मेळावे, परिषदांचे नेतृत्व केले आहे. दख्खनचा राजा श्रीजोतिबा परिसराच्या विकासाची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सोपवली. ती आम्ही पार पाडून परिसराचा कायापालट घडवला. मराठा आरक्षण लढा, कोल्हापूर खंडपीठ आंदोलन, कोल्हापुरातील टोल विरोधातील आंदोलन, ऊस दर आंदोलन अशा अनेक प्रश्नांत आम्ही नेतृत्व करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि प्रसंगी रस्त्यावर उतरलो.

सामाजिक बांधिलकीने 'पुढारी'ची प्रदीर्घ वाटचाल सुरू असल्यानेच सुवर्ण महोत्सवाला स्व. राजीव गांधी आणि अमृत महोत्सवाला नरेंद्र मोदी हे दोन पंतप्रधान आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी 'पुढारी'च्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. रौप्य, सुवर्ण, हीरक आणि अमृत महोत्सव हे 'पुढारी'चे चारही महोत्सव पाहणारे आम्ही एकमेव संपादक आहोत. एक जिल्हा वृत्तपत्र ते महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक अशा 23 आवृत्त्या असलेले राज्य वृत्तपत्र, एफएम रेडिओ आणि डिजिटल मीडिया यामध्ये सखोल आणि अमिट ठसा उमटवल्यानंतर 'पुढारी' वृत्तसमूहाने क्रांतिकारी ऑगस्ट महिन्यात 'पुढारी न्यूज' चॅनेलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियात शानदार पदार्पण केले.

टोमॅटो एफएम 94.3 या रेडिओ केंद्राने पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. डिजिटल माध्यमात 'पुढारी'ने अग्रस्थान पटकावले आहे. 45 लाख वाचकसंख्या आणि अडीच कोटी पेजव्ह्यू हे आकडे बोलके आहेत आणि आता न्यूज चॅनेलच्या माध्यमातून 'पुढारी' वृत्तसमूहाने नवी गगनझेप घेतली आहे. शुभारंभालाच महापोल हा आगामी निवडणुकांचा सर्व्हे घेऊन 'पुढारी न्यूज' चॅनेलने पहिल्याच दिवशी दर्शकांची मने जिंकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यांची लाईव्ह मुलाखतही प्रसारित झाली. गेल्या चार महिन्यांत 'पुढारी न्यूज' चॅनेलने दर्शकांवर आपले प्रभावी गारुड निर्माण केले आहे. सडेतोड, नि:स्पृह आणि निर्भीड लिखाण ही 'पुढारी'ची कवचकुंडले. ती आम्ही जीवामोलाने जपली आणि त्यामुळेच असंख्य वाचक आणि 'पुढारी'ची एकरूपता निर्माण झाली. गेल्या साडेआठ दशकांत 'पुढारी' आणि वाचक यांची एकात्मता आणि अद्वैत दिवसेंदिवस वाढत गेले आहे. हे वाचकांचे भावबळ पुढील मार्गक्रमणात अखंड राहो, हीच मनोमन भावना याप्रसंगी आम्ही व्यक्त करतो!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news