लाल समुद्रातील ‘लाल सिग्नल’

लाल समुद्रातील ‘लाल सिग्नल’
Published on
Updated on

लाल समुद्रामध्ये सुरू झालेल्या हुती बंडखोरांकडून व्यापारी जहाजांवर केल्या जाणार्‍या कारवायांमुळे जगापुढे नवे संकट उभे राहिले आहे. 'हमास'च्या समर्थनार्थ होणार्‍या या हल्ल्यांमुळे वस्तूंच्या जागतिक पुरवठ्याचे चक्र बाधित झाले आहे. जगातील 40 टक्के व्यापार लाल समुद्रातून होतो. अनेक देशांची अर्थव्यवस्था या समुद्रावर अवलंबून आहे. हा समुद्र केवळ भारतासाठीच नाही, तर जगभरातील देशांसाठी महत्त्वाचा आहे. हल्ले असेच सुरू राहिल्यास जहाज कंपन्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

जगाचे राजकारण झपाट्याने बदलत आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे हमासचा इस्रायवरील हल्ला, यानंतर जग कमालीचे तणावग्रस्त बनले आहे. या जागतिक ताणतणावाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. युक्रेन युद्धामुळे जागतिक अन्नपुरवठा साखळी कमजोर झाली. ती कशीबशी सावरू लागलेली असताना, त्या पुरवठा साखळीला आणखी एक तडाखा दिला आहे तो हुती बंडखोरांनी. येमेनमधील हुती बंडखोरांचा समूह सुएझ कालव्यातून इस्रायलच्या मदतीसाठी जाणार्‍या जगातील कोणत्याही मालवाहू जहाजांवर क्षेपणास्रे डागत आहे. जगाच्या आधुनिक इतिहासात प्रथमच अशा प्रकारचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. लाल समुद्रातील या कृत्यांना चाचेगिरी म्हणता येणार नाही. त्यांना या मालवाहू नौका लुटायच्या आहेत, असे नाही. परंतु एवढे मात्र खरे की, त्यांना इस्रायलला मदत करणार्‍या, इस्रायलविषयी सहानुभूती असणार्‍या राष्ट्रांविरोधात कमालीचा आकस आहे. हुती बंडखोर हे इस्लामिक दहशतवादाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडलेले असल्याने त्यांना या जहाजांवर हल्ले करण्याचा असुरी आनंद मिळतो.

जग 2004, 2008 आणि 2012 च्या आर्थिक मंदीतून कसेबसे सावरत असतानाच 2020 ची कोरोना महामारी आली आणि जागतिक अर्थकारणाचा कणा मोडला. त्यातून सावरत असतानाच युक्रेन युद्धाचा भडका उडाला. यानंतर उरलीसुरली अन्नपुरवठा साखळी कमजोर करण्याचे काम हुती बंडखोर करत आहेत. हे असेच सुरू राहिले, तर 2024 च्या पूर्वार्धामध्ये वेगाने वाढू लागलेल्या अर्थव्यवस्थांची चाल मंदावण्याचा धोका आहे. तसेच याचा फटका आशिया खंडातील गरीब राष्ट्रांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. भूक, उपासमार, दारिद्य्र याचे दुष्टचक्र संपण्याऐवजी ते वाढणार आहे. हे टाळण्यासाठी युद्धसंघर्ष कमी होणे गरजेचे आहे.

खरे तर हुती हा येमेनमधला बंडखोर नेता. त्याला शोधण्यासाठी 55 हजार डॉलर्सचे बक्षीस तेथील सरकारने जाहीर केले होते. परंतु, तो तर सापडलाच नाही. उलट त्याने आपल्या शिया समुदायातील लोकांचे सैन्य उभे केले. त्यातून हुती बंडखोरांची एक भली मोठी फळी उभी राहिली. तिने येमेनचा काही भाग काबीज केला आणि येमेनच्या 40 टक्के भागावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. पुढे जाऊन इराणसारख्या देशाने हुती बंडखोरांना आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मुबलक रसद पुरवण्यास सुरुवात केली. इराणकडून मिळणार्‍या दारूगोळा, शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे यांच्या साहाय्याने हुती बंडखोर साम्राज्य विस्तारत आहेत.

काही दिवसांपूर्वी भारतात खनिज तेल घेऊन येणार्‍या एमव्ही केम प्लुटो या मालवाहू जहाजावर गुजरातपासून 217 सागरी मैलांवर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला झाला. या जहाजावर 20 भारतीय कर्मचारी होते. त्यापाठोपाठ तांबड्या समुद्रात एमव्ही साईबाबा या जहाजावरही हल्ला झाला. त्यावर 25 भारतीय कर्मचारी होते. केम प्लुटोवर हल्ला करणारा ड्रोन इराणमधून आला होता, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण खात्याने (पेंटॅगॉन) नंतर दिली आहे. या हल्ल्यांची भारताने गांभीर्याने दखल घेतली असून, भारतीय मालवाहू जहाजांवर हल्ला करणार्‍यांना ते समुद्राच्या तळाशी लपले असले तरी शोधून काढू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने युद्ध नौका, टेहळणी विमाने आणि हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली आहे.

या चर्चेत दोघांनी सागरी सुरक्षा आणि जहाजांच्या मुक्त संचाराच्या स्वातंत्र्यावर विशेष भर दिला. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती. आशिया आणि आफ्रिकन देशांच्या मधोमध असणारा लाल समुद्र हिंद महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडणारा मार्ग आहे. तो 2 हजार किमी लांबीचा आहे. याला 'गेट ऑफ टीअर्स' असेही म्हणतात. जगातील 40 टक्के व्यापार याच मार्गाने होतो. जॉर्डन, जिबूती आणि सुदानसाठी सागरी वाहतुकीचे हे एकमेव साधन आहे. या मार्गात कोणतीही अडचण आली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. सुएझ कालव्यातून दरवर्षी 17 हजारांहून अधिक व्यापारी जहाजांची ये-जा होते. दरवर्षी सुमारे 10 ट्रिलियन डॉलर्सच्या मालाची आयात आणि निर्यात केली जाते. सुएझ कालवा बांधण्यापूर्वी युरोप आणि आशिया यांच्यातील व्यापार दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुडमधून होत असे. हा मार्ग बराच लांब आणि वेळखाऊ असल्याने त्यामार्गे होणारी वाहतूक महागडी ठरते. सुएझ कालवा हा आशिया आणि युरोपमधील सर्वात लहान मार्ग आहे. परंतु, कच्चे तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.

हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे शिपिंग कंपन्या आता लाल समुद्रामार्गे वाहतूक करण्यास नकार देत आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक केल्यास प्रवास कालावधी 15 दिवसांनी वाढून मालवाहतुकीचा खर्चही वाढणार आहे. याचा थेट परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होणार आहे कारण लांबच्या मार्गाने जहाजे येऊ लागल्याने वस्तूंच्या पुरवठ्यास 10 ते 14 दिवस अतिरिक्त कालावधी लागणार आहे. भारतालाही याचा फटका बसू शकतो कारण भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेलाची आयात करतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिकेने हुती बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी जोरदार सागरी मोहीम उघडली आहे. सुएझच्या कालव्यामध्ये 40 वर्षांपूर्वी जे रणकंदन झाले होते, ते नौदलाचे रणकंदन इराण आणि अमेरिकेदरम्यान पुन्हा होऊ शकते, अशी सद्य:स्थिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news