खानदेशात रंगीत तालीम | पुढारी

खानदेशात रंगीत तालीम

प्रताप जाधव, नाशिक

थंडी हळूहळू जोर पकडत असताना खानदेशात निवडणुकीचेही जोरदार वारे वाहू लागले आहे. विभागातील धुळे, नंदूरबार व जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आगामी जिल्हा बँक आणि विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने पुढील रणनीतीची रंगीत तालीम पाहायला मिळत आहे. चार-पाच महिन्यांत मिनी विधानसभा अर्थात जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचा कल समजत असल्याने सर्वच राजकीय पक्षांना जनमानसाचा कानोसा घेणे सोपे जाते. मतदाररूपी परीक्षकच विविध पक्षांची परीक्षा घेत असल्याने त्यातून पुढे आलेल्या गुणावगुणांचे आत्मपरीक्षण करूनविधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी करण्याची एक संधीही राजकीय मंडळींना मिळते. विधानसभेची अर्धी मुदत संपत असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले असते.

धुळे-नंदूरबार व जळगावची जिल्हा बँक निवडणूक आणि धुळे-नंदूरबारच्या विधान परिषद निवडणुकीत सामान्य जनता प्रत्यक्ष मतदान करणार नसल्याने लोकांची मन:स्थिती वा मतस्थिती जाणून घेणे पक्षांना शक्य होणार नाही; मात्र नेतेमंडळींना रणनीतीचा सराव जरूर करता येणार आहे. जळगाव जिल्हा सहकारी बँकेसाठी तो करता करता भाजपच्या राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यालाच धोेबीपछाड मिळाला आहे. पक्षाला संकटातून तारून नेण्याचे कौशल्य असल्याचा ज्यांचा गवगवा केला जातो, अशा संकटमोचकांनाभविष्यातील मोठ्या आखाड्यात उतरण्याच्या आधीच मातीची चव चाखावी लागली आहे. ‘अपयश ज्यांना ठाऊकच नाही’ अशी ख्याती राज्यभर पसरलेले इतके सहजासहजी तोंडघशी कसे पडले, असा प्रश्न जळगावकरांच्या तोंडी आहे.

या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना यासंदर्भातील घटनाक्रम जाणून घेणे आवश्यक ठरते. संचालक निवड एकमताने करण्यासाठी सर्वपक्षीय बैठका घेतल्यावर कोअर कमिटीचे सोपस्कार सुरू झाले. दरम्यान, महाविकास आघाडीने उमेदवारांचे अर्ज भरून ठेवण्याची काळजी घेतली. दुसरीकडे, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर एकट्याने भाजपचा भार वाहणारे गिरीश महाजन सुप्त घडामोडींचा अंदाज घेऊ शकले नाही म्हणा किंवा सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून बँकेत पक्षाला यथायोग्य प्रतिनिधित्व देऊ शकू, अशा समजात राहिले म्हणा; पण शेवटी सगळे काही फिस्कटल्याने भाजपवर ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध करण्याची नामुष्की ओढवली. त्यात प्रमुख नेत्यांचे अर्जच छाननीत बाद झाले. यावरून बरीच भवतीन्भवती झाली. प्रशासनाला हाताशी धरत जाणूनबुजून अर्ज बाद केल्याचा आक्षेपही भाजपने घेतला. शेवटी केवळ जामनेर सोसायटी गटातून महाजन हेच एक भाजपचे संचालक निवडून येऊ शकतील, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग, भाजपने निवडणुकीवर बहिष्काराचे अस्त्र उचलत सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. या सगळ्या प्रकारात ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ राहिली आणि पक्ष निवडणुकीत उतरला असता, तर जी काही शोभा झाली असती, तीही टळली. त्यामुळे वास्तवाचा विचार केला, तर भाजपच्या जिल्हा नेत्यांनी शहाणपणाचाच निर्णय घेतला, असे म्हणता येईल.

याआधीही जळगावला शिवसेनेचा महापौर होणे, मुक्ताईनगर व बोदवड येथील सत्ता हातातून जाणे असे धक्के भाजपला बसले. त्यापासून धडा घेत भाजपच्या नेतृत्वाला ‘जळगाव म्हणजे भाजप’ हे अनेक दशकांपासूनचे समीकरण का बदलत आहे, याचा अभ्यास आणि त्यावर कृतीही करावी लागणार आहे. वेळीच सावध होऊन आगामी निवडणुकांसाठी पावले उचलली, तर जिल्हा बँक प्रकरण भाजपसाठी कदाचित इष्टापत्तीही ठरेल. जळगावमध्ये भविष्यात बाजी पलटवण्याइतकी क्षमता भाजपमध्ये नक्कीच आहे. भाजपला विरोध म्हणून सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडलेल्या काँग्रेसच्या हातीही बँकेत काही लागले नाही. रावेर, चोपड्यात काँग्रेसच्या नेत्यांनी इतर नेत्यांना पाठिंबा देत स्वपक्षाला धक्का दिला. यातून महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या हातीच जिल्हा बँकेची सूत्रे राहणार असल्याचे स्पष्ट झाले. तिकडे धुळे व नंदूरबार जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नही फसला. 17 पैकी सात जागा एकमताने निवडल्या गेल्या, तर 10 जागांसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होईल. याच दोन जिल्ह्यांचा संयुक्त मतदारसंघ असलेल्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक 10 डिसेंबरला होईल. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसकडून निवडणूक लढवत ही जागा जिंकणार्‍या अमरीशभाई पटेल यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीत पटेल यांनी पक्षाच्या 204 जागांमध्ये ‘स्वत:’च्या 128 मतांची घसघशीत भर घातली. काँग्रेसची 156 मते असताना त्या पक्षाच्या अभिजित पाटील यांना केवळ 98 मते मिळू दिली. यावेळीही कागदावर भाजपचे बळ चांगले आहे. भाजपने पटेल यांना रिपीट केल्याने त्या पक्षाला फारशी अडचण येऊ नये. खरे तर धुळे महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांमध्ये खदखद आहे; पण महाविकास आघाडीच्या नेत्यांची तोंडेही तीन दिशांना असल्याने त्याचा लाभ उठवण्याच्या स्थितीत आघाडी नाही.

Back to top button