लवंगी मिरची : फटके अन् फटाके

लवंगी मिरची : फटके अन् फटाके
Published on
Updated on

नुकतीच दिवाळी संपन्न झाली आणि वातावरणामध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागायला लागली. आनंददायी सणाच्याबरोबरच भारतातील क्रीडा रसिकांना क्रिकेट संघाने मात्र फटक्यांची आतषबाजी करत अवर्णनीय असा आनंद दिलेला आहे. विश्वचषक मिळविण्यापासून आपला भारत अवघे एक पाऊल दूर आहे. यानंतर येत्या रविवारी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल. आजपर्यंत अपराजित राहिलेला भारतीय संघ आपली विजयपताका फडकवत राहील आणि येत्या रविवारी विश्वचषकाचा मानकरी होईल, अशी अपेक्षा ठेवून भारतीय उत्सुकतेने त्या क्षणाची वाट पाहत आहेत.

तसे पाहिले तर विश्वचषकात सगळेच सामने अटीतटीचे झाले. उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी जबर असा लढा प्रत्येक संघाला द्यावा लागला. पाकिस्तानी संघाचे दारुण पराभव होत गेले आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांना बॅगा भरून आपल्या देशाला परत जावे लागले. काही खेळाडूंच्या धडाकेबाज खेळांनी हा विश्वचषक क्रीडा रसिकांच्या मनावर कायमचा कोरला गेला. यातील महत्त्वाचे म्हणजे 29 वे शतक करून विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीवर प्रेम करणार्‍या तमाम रसिकांना त्याची संघर्ष करण्याची वृत्ती, कठीण परिस्थितीमध्ये डोके शांत ठेवून केलेला खेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने विश्वविक्रम केल्यानंतर दाखविलेला नम—पणा यामुळे भारतीय नव्हे, तर जगभरातील रसिक सुखावून गेले. भारताच्या रोहित शर्मा याने एकाच वेळी धडाकेबाज फलंदाज आणि त्याचवेळी अत्यंत मुत्सद्दी असे नेतृत्व कसे असले पाहिजे, याचा धडाच घालून दिला. तशीच चमकदार कामगिरी शमी या गोलंदाजाने केली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये 11 जणांच्या संघात प्रवेश न मिळालेल्या शमीने प्रवेश मिळताच मिळालेल्या संधीचे अक्षरशः सोने करून दाखवले. उपांत्य सामन्यात तब्बल सात विकेट घेऊन शमीने आपला जागतिक दर्जा दाखवून दिला. या सर्वांसोबतच के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्याकुमार यादव यांनी संघाची कामगिरी समतोल केली.

एखाददुसरा महत्त्वाचा फलंदाज बाद झाला तरी भारतीय संघामध्ये इतके सगळे मोहरे आहेत की, त्यांच्यामध्ये सामना आपल्याकडे वळविण्याची ताकद आहे, हे दिसून आले. भारतीय क्रिकेट संघाचे सामने स्टेडियममध्ये आणि त्याचबरोबर टीव्हीसमोर बसून भूक, तहान विसरून पाहताना रसिकांचे मन खेळाडूंची अद्वितीय कामगिरी पाहून बहरून गेले. या दिवाळीमध्ये बाहेर 'फटाके' वाजत असताना आपले फलंदाज मात्र मैदानावर सर्वत्र 'फटके' मारताना दिसून येत होते. या विश्वचषकामधील अद्भुत अशी खेळी ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅक्सवेल याने केली. साखळी सामन्यात सात विकेट पडलेल्या असताना आणि स्वतः जखमी असतानासुद्धा जागेवरच उभे राहून त्याने मैदानावर उत्तुंग असे फटके मारले आणि शतक-दीडशतक नव्हे, तर द्विशतक पूर्ण करून आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वश्रेष्ठ खेळी म्हणून ही नोंदवली जाईल, याविषयी शंका नाही.

आता मात्र फक्त एक सामना बाकी आहे आणि तो सामना जो संघ जिंकेल, तो संघ विश्वचषक उंचावणार आहे. हा थरारक सामना पाहण्यासाठी भारतीय क्रीडा रसिक आजपासूनच उत्सुक आहेत. आता अवघ्या एक दिवसाची वाट पाहावी लागेल, आणि रविवारी दुपारी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा थरार सुरू होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news