संरक्षणसिद्धतेचा अग्‍नी-5 | पुढारी

संरक्षणसिद्धतेचा अग्‍नी-5

- ब्रिगेडियर हेमंत महाजन

अग्‍नी-5 या क्षेपणास्त्राच्या चाचणीतून भारताने चीन आणि पाकिस्तानच्या धोक्यापासून बचाव करण्याची आणि चोख प्रत्युत्तर देऊन मोठा प्रहार करण्याची सज्जता केली आहे.

भारताच्या क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमात आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी विस्मयचकित करणारी कामगिरी करून दाखवली आहे. नुकतीच झालेली अग्‍नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी हे भारताचे मोठे यश आहे. या चाचणीमुळे भारताच्या संरक्षणसिद्धतेत वाढ होणार आहे. ओडिशाच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आयलंडवर अग्‍नी-5 ची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारत आपल्या शत्रूवर पाच हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकतो. गरज भासल्यास आपण युरोप, आफ्रिकेपर्यंतदेखील झेप घेऊ शकतो.

शेजारील देशांनी शांतता आणि सद्भावाचे धोरण अंगीकारले असते, तर क्षेपणास्त्रनिर्मितीवर खर्च करण्याची गरज भासली नसती. परंतु, आपल्याला चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. संरक्षणाच्या द‍ृष्टीने चीन आणि पाकिस्तान ही भारतासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. भारत आणि चीनदरम्यान सुमारे 3,488 किलोमीटर एवढी मोठी सीमारेषा आहे. यातील अनेक ठिकाणी दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू आहेत. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील आर्थिक आणि लष्करी क्षेत्रातील दोस्ती भारतासाठी आणखी धोकादायक ठरत आहे. चीन स्वतः भारताशी आगळीक न करता पाकिस्तानच्या माध्यमातून भारताचे नुकसान घडवून आणू शकतो. या पार्श्‍वभूमीवर भारताला आपली संरक्षण प्रणाली सातत्याने अद्ययावत आणि तयार ठेवावी लागते. ती अधिकाधिक मजबूत करीत राहावे लागते.

भारताने अग्‍नी-1, अग्‍नी-2 आणि अग्‍नी-3 या जमिनीवरून जमिनीवर प्रहार करणार्‍या क्षेपणास्त्रांची निर्मिती पाकिस्तानविरुद्धच्या रणनीतीचा एक भाग म्हणून केली होती. अग्‍नी-4 आणि अग्‍नी-5 या क्षेपणास्त्रांची निर्मिती मात्र चीनकडून असलेला धोका डोळ्यांसमोर ठेवून केली. अग्‍नी-5 हे भारताजवळ असलेले आतापर्यंतचे सर्वाधिक तंत्रसमृद्ध बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची खासीयत अशी की, हे क्षेपणास्त्र जमिनीवरून आधी हवेत जाते. अंतरिक्षात जाऊन पॅराबोलिक पाथमध्ये प्रवेश करते आणि तेथून पुन्हा पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश करून जमिनीवरील दिलेल्या लक्ष्याचा अचूक भेद करते. अग्‍नी-5 मालिकेतील क्षेपणास्त्राची ही सहावी यशस्वी चाचणी आहे.

इंटर बॅलेस्टिक जातीचे अग्‍नी-5 हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत दीड टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. एवढ्या अफाट वजनासह अंतरिक्षात जाऊन, तेथून पुन्हा पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश करून 5 हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्यभेद हे क्षेपणास्त्र अचूकरीत्या करू शकते. म्हणजेच, निम्मे जग या क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात आहे. भारताच्या या सर्वाधिक शक्‍तिशाली क्षेपणास्त्राच्या टप्प्यात संपूर्ण पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, इराक, इराण, सुमारे अर्धा युरोप, चीन, रशिया, मलेशिया आणि फिलिपीन्स हे देश सामावू शकतात. भारताने अग्‍नी-5 चाचणी केल्यामुळे चीनने संताप व्यक्‍त केला आहे. चीन जेव्हा स्वत: शस्त्र उपकरणाची चाचणी करतो तेव्हा आशियात शांतता भंग होत नाही; मात्र भारताने चाचणी करताच चीनला जागतिक शांततेची आठवण येते. भारताने अग्‍नी क्षेपणास्त्राची चाचणी करत दीड हजार किलो वजनाचे अण्वस्त्र वहन करण्याची आणि डागण्याची क्षमता प्राप्त केली आहे. त्यामुळे चीन आणखीच अस्वस्थ झाला आहे. वास्तविक, चीनने ऑगस्ट महिन्यातच लाँग मार्च नावाचे हायपरसॉनिक ग्लाईड क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. अमेरिका आणि युरोपीय देशदेखील चीनच्या या चाचणीवरून चिंतेत आहेत. परिणामी, अमेरिका भारताला अण्वस्त्रसज्ज राहण्याबाबत प्रोत्साहन देऊ शकतो. क्षेपणास्त्रांबरोबरच भारताने रणगाडे, लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रे या सर्वच क्षेत्रांत आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. गरज पडल्यास अग्‍नी-5 या क्षेपणास्त्राच्या साह्याने चीन आणि पाकिस्तानच्या धोक्यापासून बचाव करण्याची आणि चोख प्रत्युत्तर देऊन मोठा प्रहार करण्याची सज्जता भारताने केली आहे, असाच संदेश या दोन देशांना या यशस्वी चाचणीद्वारे देण्यात आला आहे.

Back to top button